पवित्र ब्रह्मपुत्रा ड्रॅगनच्या मायाजालात
हिमालयात उगम पावणारी पवित्र ब्रह्मपुत्रा नदी सध्या चीनी ड्रॅगनच्या मायाजालात सापडली आहे. त्याच्या या मायावी धोरणाची काळी बाजू समजून घेतली पाहिजे. जणू ब्रह्मपुत्रेच्या वैभवाला नजर लावण्याचा ड्रॅगनचा हा एक प्रयत्न आहे. चीनचा नियोजित तिबेटमधील मेगा प्रकल्प त्याच्या वसाहतवादी प्रवृत्तीचे द्योतक आहे.
ब्रह्मपुत्रा नदीच्या जलसाधनेवर चीनचा डोळा ही चिंतेची बाब आहे. ब्रह्मपुत्रा ही सिंधू, गंगा, यमुना, सरस्वती प्रमाणे भारतातील सर्वात मोठी नदी आहे. जी पूर्वोत्तर भारतास संपन्नतेचे वरदान आहे. ब्रह्मपुत्रा या नदीची भारतात वाहण्याची एकूण लांबी 1800 मैल (2900 कि.मी.) एवढी असून ती भारताच्या अरुणाचल प्रदेश, आसाम या राज्यातून प्रवास करते व पुढे बांग्लादेशमध्ये जाते. ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात संपन्न, सांस्कृतिक आणि सामाजिक तसेच आर्थिक जीवन विकसित झाले आहे. परंतु भारताची महानदी असलेल्या या ब्रह्मपुत्रेवर अनेक दिवसांपासून चीनचा डोळा आहे. सुमारे 20-30 दशकांपूर्वी चीनने आपल्या सीमावर्ती भागात अनेक ठिकाणी अंतर्गत अणुस्फोट करून ब्रह्मपुत्रेचा प्रवाह वळविण्याचा खूप प्रयत्न केला. पण एवढी आदळआपट आणि डोकेदुखी करूनही चीनला त्यामध्ये काही यश आले नाही. हे पाहता चीनने आता दुसरा प्रकल्प आखला आहे व ब्रह्मपुत्रा नदीवरील तिबेटमधील या नियोजित धरणाद्वारे चीन भारताला हिमालयाच्या सीमेवर असलेल्या पूर्वोत्तर राज्यासाठी आणि बांग्लादेशसाठी डोकेदुखी ठरत आहे.
अवाढव्य असा प्रकल्प?- पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आरामात चीन तिबेटच्या घशात टाकला. ते आमचे घटक राज्य नाही, तेथे चीनी आले तरी चालतील. आम्हाला त्याचे काहीही दु:ख वाटण्याचे कारण नाही. असे भारताचे इंग्लंडमधील त्यावेळचे उच्चायुक्त पणीकर यांनी पत्रकारांना सांगितले होते. यावरून त्यावेळच्या सरकारची धोरणे किती चुकीची होती ही गोष्ट लक्षात येते. आता काळ उलटल्यानंतर त्या चुकांची गोळाबेरीज करावी लागत आहे. त्याचे कारण म्हणजे चीनने तिबेट या स्वायत्त प्रदेशात जगातील एक सर्वात मोठे धरण बांधण्याचा प्रकल्प आखला आहे आणि हा प्रकल्प ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी आडविणार आहे. 137 बिलीयन डॉलर्स एवढ्या खर्चाचा हा प्रकल्प आहे. चीनी कम्युनिस्ट पक्षाने त्यांच्या 14 व्या पंचवार्षिक योजनेत या प्रकल्पाला मान्यता दिली असे 25 डिसेंबरच्या ठरावात म्हटले जाते. पण चीनच्या या प्रकल्पामुळे भारतामध्ये असलेला जलस्रोत कमी होईल. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताच्या नैऋत्य भागात वायव्य सरहद्द प्रदेशात तसेच उत्तर भागात जलसाठा निर्माण झाल्यास भूकंपाचे तीव्र धक्के बसण्याची शक्यता आहे. पण चीनी ड्रॅगनला त्याची पर्वा काय? त्यांना त्यांचा विकास वेग वाढवावयाचा आहे. अमेरिकेला मागे टाकावयाचे आहे. भारताला उध्वस्त केले तरी चालेल. आम्ही आमचा कार्यक्रम राबवूच राबवू अशा स्वरुपाच्या हेकेखोर भूमिकेमुळे चीन सध्या जगामध्ये नवा वसाहतवाद पुढे आणीत आहे आणि या चीनी वसाहतवादाची शिकार ब्रह्मपुत्रा नदी होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प जगातील सर्वात मोठा प्रकल्प आहे असा चीनचा दावा आहे. आयजीच्या जिवावर बायजी उदार या म्हणीप्रमाणे भारताच्या ब्रह्मपुत्रेवर धरण बांधून चीन जगामध्ये स्वत:ची शेखी मिरवित आहे. चीनी प्रजासत्ताकचे अध्यक्ष माओत्से तुंग यांच्या काळापासून चीनचा ब्रह्मपुत्रा आणि उत्तर पूर्वेच्या प्रदेशावर डोळा होता. एकीकडे सीमेवरचे युद्ध बंद केले आणि आता भारताच्या नैसर्गिक साधनसामुग्रीवर डल्ला मारण्यासाठी दुसरे गनिमी युद्ध चीन सुरू करीत आहे ही अत्यंत दुर्दैवाची आणि खेदाची तशीच चिंतेची बाब आहे. चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोने बुधवारी आपल्या बैठकीत या धरणाच्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यामुळे आता हे भारताच्या मानगुटीवर बसलेले भूत कसे उतरविणार हा मोठा प्रश्न आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, बांग्लादेश इ. राज्यातून ब्रह्मपुत्रा नदी वाहते. अरुणाचल प्रदेशात भारताचा ब्रह्मपुत्रेचा प्रकल्प बांधण्याचा प्रस्ताव कृतीत आहे, त्याचा पोटशूळ होऊन चीनने तिबेटमध्ये वरच्या टापूवर दुसरे धरण बांधण्याची योजना आखली आहे. चीनी ड्रॅगनच्या नाकात आता दोऱ्या कशा बांधावयाच्या हा खरा प्रश्न आहे.
चीनच्या आव्हानाचा अर्थ?- तिबेटमध्ये पठारावर मोठे धरण बांधून ब्रह्मपुत्रेचे पाणी आडवायचे आणि भारताची पूर्वोत्तर राज्यातील जलशक्ती कमी करावयाची असे हे चीनी तंत्र मोठे धोकादायक आहे. त्यामुळे या प्रदेशातील भूराजनैतिक स्थिती चिंतेची बनेल. शिवाय नैसर्गिक परिसंस्था तेथील जीव, प्राणी, पक्षी हे सुद्धा संकटात येतील. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ब्रह्मपुत्रेवर जगातील सर्वात मोठे धरण बांधण्याचा चीनचा प्रकल्प महत्त्वाकांक्षी आहे. त्यांनी या प्रकल्पाची वकिली करून स्वत:चा बचाव केला आहे. त्यांच्या मते, या प्रकल्पामुळे काहीही वाईट परिणाम होणार नाहीत. उलट, सीमावर्ती भागातील पूरस्थिती नियंत्रणात येईल. तेथील महापूरामुळे होणारी क्षती म्हणजे नुकसान रोखता येईल वगैरे मुद्दे सांगून चीन आपल्या धोरणाचे समर्थन करीत आहे व आपली पाठ स्वत:च थोपटून घेत आहे. ब्रह्मपुत्रेला चीनमध्ये यारलुंग झांबो असे म्हणतात. यापूर्वी चीनचा यांगत्से नदीवरील सर्वात मोठा धरण प्रकल्प थ्री गॉर्जेस म्हणून ओळखला जातो. 2003 मध्ये या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. त्याचा अंदाजे खर्च 28 ते 34 बिलीयन डॉलर्स एवढा होता आणि त्यावरील यांगत्से जलविद्युत प्रकल्पाचे उत्पन्न जगात सर्वात जास्त आहे. या विद्युत प्रकल्पातून 22,500 मेगावॅट एवढी ऊर्जा निर्माण केली जाते. हा जुना रेकॉर्ड मोडून तिबेटमधील नव्या प्रकल्पाद्वारे नवा रेकॉर्ड तयार करण्याची चीनची महत्त्वाकांक्षा आहे. ‘वन बेल्ट वन रोड’ पुढाकारानुसार सारे जग पादाक्रांत करा, शेजाऱ्या पाजाऱ्यांनी आपण म्हणू तसेच चालावे अशी बंधने लादा या प्रकारच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेने चीन सध्या पेटलेला आहे. या प्रकल्पाच्या खालच्या भागातील लोकांच्या जीवनशैलीवर व पर्यावरणावर चीनच्या या संभाव्य प्रकल्पाचा मोठा प्रतिकूल परिणाम होणार आहे याकडे चीनी ड्रॅगन कानाडोळा करीत आहे. आपण करतो ते योग्यच आहे, बरोबर आहे असे म्हणून आपले प्रस्ताव इतरांवर लादण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही गोष्ट चिंतेची आहे. सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिकदृष्टीने चीनच्या या नव्या प्रकल्पाचे प्रदूषण, दुष्परिणाम भारतातील अरुणाचल प्रदेश, आसाम, तिबेट तसेच बांग्लादेशमधील लोकांनाही भोगावे लागणार आहेत. पण चीनला त्याची पर्वा नाही. भारताविरुद्ध कोल्हेकुई करणाऱ्या बांग्लादेशमधील नेत्यांनी आता चीनविरुद्ध ओरड करून हा प्रकल्प कसा हाणून पाडता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर, बांग्लादेशात पाण्याची मोठी टंचाई निर्माण होईल व तेथील लोकांचे जगणे कठीण होईल. विकास प्रकल्पाच्या नावाखाली चीन आशिया खंडात जी पुंडाई करीत आहे त्यामुळे समस्यांची मोठी मालिका उभी रहात आहे. पण चीनच्या या वाढत्या मुजोरीला नियंत्रण कसे घालणार? मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? हा खरा प्रश्न आहे. भविष्यकाळात चीनचा हा प्रकल्प रोखण्यासाठी दक्षिण आशियातील सर्व देशांनी सामुदायिक जागृती केली नाही तर चीन यापुढे अशा प्रकारची पुंडाई करून आण्विक साधनांच्या आधारे भारतातील जलप्रवाह वळविण्याचा प्रयत्नही करू शकेल. भारताचा वाढता विकास वेग, भारताच्या अर्थव्यवस्थेचे स्थैर्य आणि भारतातील शांतता व सुरक्षा या गोष्टी चीनच्या डोळ्यात सलत आहेत. त्यामुळे चीनी अशा प्रकारचे उपद्व्याप करून भारताच्या नैसर्गिक साधनसामुग्रीला हानी पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहेत ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे.
बाजू आपल्या धरणाच्या?- आपल्या मागील तीन भेटींमध्ये भारतीय मुत्सद्दी अजित डोवाल यांनी सामायिक सीमापार जलस्रोताबाबत पारदर्शक धोरणाचे आवाहन केले होते. चीन खरोखरच ही पारदर्शकता पाळणार आहे काय? भारताच्या अरुणाचल प्रकल्पाला चीनच्या तिबेटमधील नियोजित प्रकल्पामुळे कोणते धोके निर्माण होतील हाही एक प्रश्न आहे.
अरुणाचल प्रदेशात ब्रह्मपुत्रेवर धरण बांधण्याचा भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लक्षात घेऊन चीनने व्यूहरचना केली आहे. चीनच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना रोखण्यासाठी भारत अरुणाचल प्रदेशातील ब्रह्मपुत्रा नदीवर धरण बांधत आहे. तांत्रिक पातळीवर सहकार्य यंत्रणा स्थापन करून सांख्यिकी माहितीचे आदानप्रदान करीत आहेत. त्याची स्थापना 2006 मध्ये करण्यात आली आहे. हे सर्व घडत असताना चीन सीमापार नदी व्यवस्थापनाचे नाटक करून ढोंगीपणा करीत आहेत. त्याचे कारण म्हणजे जलसुरक्षा व पुराचा धोका कमी करणे हा आहे.
भारत
अरुणाचल प्रदेशातील यिंगकिओंग येथे हे धरण बांधत आहे. यासाठी सुमारे 50,000 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. या धरणात सुमारे 10 अब्ज घनमीटर एवढा जलसाठा असेल. पाण्याची सुरक्षा, पुराचा धोका, जलविद्युत निर्मिती करून या प्रकल्पाद्वारे अरुणाचल प्रदेश आणि ईशान्येकडील अर्थव्यवस्था आणि पायाभूत सुविधांना चालना दिली जाईल. त्यातून स्थानिक लोकांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील. या प्रकल्पामुळे समस्यांचा गुंता लक्षात घेता टेक्टोनिक प्लेट सीमेवर भूकंप होण्याची शक्यता असल्यामुळे धरणाच्या बांधकामाला महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.
अजित डोवाल हे प्रथम श्रेणीचे मुत्सद्दी आणि मोठे आधुनिक युगातील कौटिल्य आहेत. त्यांनी भारत-चीन पाणी प्रश्नावर दूरदृष्टीने बोलणी केली आहे. भविष्यकाळात चीनने ब्रह्मपुत्रेच्या पाण्यावर अवाजवी अधिकार सांगू नये, भारताची कोंडी होऊ नये, बांग्लादेशची कोंडी होऊ नये म्हणून किती पाणी सोडावयाचे, केव्हा सोडावयाचे याबाबत समीकरण निश्चित केले पाहिजे. त्यामुळे अरुणाचलमधील भारताच्या धरणाला पुरेसा जलसाठा मिळेल. चीनने जर धरणाचे जास्तीचे दरवाजे खुले केले तर त्यामुळे भारतात महापुरामुळे नवे प्रश्न उभे राहतील. या सर्व बाबतीमध्ये धोरणात्मक चौकटी निश्चित करणे आवश्यक आहे. चीनी ड्रॅगनपासून जेवढे सावध राहता येईल तेवढे सावध राहिले तर ब्रह्मपुत्रेचे संकट कमी होऊ शकते.
प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर