कोकण मार्गावर गणपती स्पेशल गाड्यांची धडधड अखेर थांबली !
खेड / राजू चव्हाण :
गणेशोत्सव कालावधीत कोकण मार्गावर चालवण्यात आलेल्या गणपती स्पेशल गाड्यांनी गर्दीचा अन् उत्पन्नाचाही विक्रम प्रस्थापित केला. शेवटच्या दिवसापर्यंत रेटारेटीच्या प्रवासातही गणेशभक्तांनी सर्वच गणपती स्पेशल गाड्यांना सर्वाधिक पसंती दिली. गणेशभक्तांच्या मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर २२ ऑगस्टपासून चालवण्यात आलेल्या गणपती स्पेशल गाड्यांची धडधड अखेर २० दिवसानंतर बुधवारपासून थांबली. कोकण रेल्वे प्रशासनाच्या नेटक्या नियोजनामुळे गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्यास मदत झाली.
गणेशोत्सवासाठी मध्य, कोकण व पश्चिम रेल्वेने तब्बल ३६७ फेऱ्या चालवल्या. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५३ गणपती स्पेशल गाड्यांची जादा भर पडली. गतवर्षी ३१४ गणपती स्पेशलच्या फेऱ्या चालवण्यात आल्या होत्या.
पश्चिम रेल्वेच्या बडोदरा-रत्नागिरी, उधना-रत्नागिरी, उधना मंगळूर, विश्वामित्रा-रत्नागिरी, वांद्रे-रत्नागिरी या वसईमार्गे धावलेल्या गणपती स्पेशल गाड्यांमुळे पश्चिम उपनगरातील गणेशभक्तांच्या मार्गातील अडथळे दूर होवून प्रवास सुखकर होण्यास मदत झाली. गणेशोत्सवात सर्वप्रथम धावण्याचा मान उधना-रत्नागिरी गणपती स्पेशलसह वांद्रे-रत्नागिरी स्पेशलला मिळाला. उधना-रत्नागिरी गणपती स्पेशल आणि वांद्रे-रत्नागिरी गणपती स्पेशल दर गुरुवारी ४ सप्टेंबरपर्यंत वसईमार्गे चालवण्यात आली.
या पाठोपाठ २२ ऑगस्टपासून दिवा-चिपळूण अनारक्षित मेमू स्पेशल, दिवा-खेड अनारक्षित मेमू स्पेशल, सीएसएमटी-सावंतवाडी, सीएसएमटी-रत्नागिरी, सीएसएमटी-सावंतवाडी, सीएसएमटी-सावंतवाडी, मुंबई-सावंतवाडी गणपती स्पेशल कोकण मार्गावर धावल्या. या फेऱ्यांही २५ ते २७ ऑगस्टपर्यंत विक्रमी गर्दीने धावल्या. या पाठोपाठ २३ ऑगस्टपासून धावलेली पुणे-रत्नागिरी गणपती स्पेशल आणि २६ ऑगस्टपासून धावलेल्या पुणे-रत्नागिरी वातानुकूलित स्पेशलमुळेही पुणेस्थित गणेशभक्तांची गावी येण्याची मोठी गैरसोय दूर झाली.