For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ग्रामीण भागात गडकिल्ले बनविण्याची बालचमूंची लगबग

06:00 AM Nov 12, 2023 IST | Tarun Bharat Portal
ग्रामीण भागात गडकिल्ले बनविण्याची बालचमूंची लगबग
Advertisement

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर किल्ले बनविण्यात दंग

Advertisement

वार्ताहर/ किणये

दिवाळी हा सण आनंदाचा, नवचैतन्याचा. या सणांची सारेजण आतुरतेने वाट पाहत राहतात. दिवाळीच्या सणात ग्रामीण भागात शेतकरी विविध पूजाविधी करतात. आरती ओवाळणी असे कार्यक्रम होत असतात. तसेच घराघरांमध्ये फराळ बनविण्यात येतात, नवीन कपडे, सोने, विविध प्रकारची वस्तू खरेदी यामुळे सणाचा उत्साह सर्वत्र असतो. याच सणात ग्रामीण भागात बालचमू व काही तरुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती बनवितात. त्यामुळे शिवरायांचा जाज्वल इतिहास पुन्हा एकदा सर्वांच्या मनात रुजतो. ग्रामीण भागात सध्या गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती बनविण्याची बालचमुंची लगबग दिसून येत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सर्रास भागात बालचमू किल्ले बनविण्यात दंग होते.

Advertisement

शुक्रवारपासून वसुबारस पुजनाने दिवाळी सणाच्या पर्वाला प्रारंभ झाला आहे. रविवारी नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन होणार आहे. यानिमित्त नरकचुतर्थीच्या शुभमुहूर्तावर बहुतांशी गावामध्ये बालचमू किल्ल्यांच्या प्रतिकृतीचे उद्घाटन करणार आहेत. त्यामुळे शनिवारी रात्री उशिरापर्यंत किल्ले बनविताना दिसून आले.

छत्रपती शिवाजी महाराज व मराठ्याच्या शौर्याचे प्रतिक म्हणून गडकिल्ल्यांकडे पाहिले जाते. हाच इतिहास आठवणीसाठी आणि लहान मुलांना तो समजून घेण्यासाठी गडकिल्ले महत्त्वाचे आहेत. त्यासाठी बालचमूंना तरुण वर्गानी सहकार्य करणे गरजेचे आहे. गेल्या दहा बारा दिवसापासून ग्रामीण भागात गडकिल्ले बनविण्यासाठी लागणारी माती, दगड आणण्यात आली आहे. अगदी हुबेहूब किल्ल्यांच्या प्रतिकृती बनविण्यासाठी बालके तहान भूक विसरुन किल्ला बनविण्यात दंग झालेले पहावयास मिळत आहे.

प्रतापगड, रायगड, सिंहगड, पन्हाळगड, जंजिरा, सिंधुदुर्ग, शिवनेरी, तोरणा, राजगड, पुरंदर, तसेच बेळगावमध्ये राजहंसगड आदी किल्ल्यांच्या प्रतिकृती बनविण्यात येत आहेत. किल्यांच्या बाजुने बुरुज, प्रवेशद्वार, चार दरवाजे, संरक्षण भिंत, धान्यसाठा, किल्ल्यातील मंदिर, राजांचे सिंहासन आदी या किल्ल्यांमध्ये बनविण्याची धडपड सुरू आहे. इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईलमध्ये गडकिल्ल्यांची चित्रे पाहून बालकांनी तशा पद्धतीनेच हुबेहूब किल्ले बनविले आहेत.

बुरुजला रंग लावण्यात आलेला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासन विशेष स्वरुपाचे बनविण्यात येत आहे. या किल्ल्यांमध्ये ठेवण्यासाठी लागणारे मावळे, शिवरायांची मूर्ती गेल्या दोन दिवसापासून बालचमूंनी खरेदी केली आहे.

ग्रामीण भागात दिवाळी सणात आठवडाभर बालचमू व तरुणांनी बनविलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृती बघण्यासाठी गावातील व भागातील शिवप्रेमी येतात. या बालकांनाही प्रोत्साहन म्हणून काहीजण देणगीरुपाने मदत करतात. काही गावांमध्ये गडकिल्ले स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले आहे. यानिमित्त मनोरंजनाचे कार्यक्रम तसेच विविध स्पर्धाही भरविल्या जाणार आहेत.

Advertisement
Tags :

.