For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डॉलरच्या तुलनेत रुपया गडगडला

06:23 AM Mar 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
डॉलरच्या तुलनेत रुपया गडगडला
Advertisement

एका डॉलरमागील भाव पहिल्यांदाच 95 पर्यंत घसरला

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

इराण युद्धामुळे रुपयाच्या मूल्याने सोमवार, 30 मार्च रोजी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत प्रथमच 95 चा टप्पा ओलांडला. दैनंदिन व्यवहारादरम्यान तो 95.58 च्या नीचांकी पातळीपर्यंत घसरला होता. तथापि, नंतर त्यात थोडी सुधारणा होऊन व्यवहाराच्या अखेरीस तो 94.78 वर बंद झाला. डॉलरच्या तुलनेत 94.85 च्या मागील बंद भावाच्या तुलनेत ही 7 पैशांची किंचित वाढ आहे. रुपयाच्या कमजोरीचा परिणाम सर्वसामान्य माणसावरही होणार असल्यामुळे मोबाईल फोन, सोने-चांदी, कच्चे तेल यांसारख्या परदेशातून आयात केलेल्या वस्तू खरेदी करणे महाग होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement

भारतीय रुपयाच्या मूल्यात सोमवार, 30 मार्च रोजी सर्वात मोठी घसरण झाली आहे. सुरुवातीला अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 88 पैशांनी कमजोर होऊन प्रतिडॉलर 95.58 वर पोहोचला. इराणसोबत सुरू असलेले अमेरिका-इस्रायल युद्ध आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे रुपया सलग तिसऱ्या दिवशी घसरला आहे. याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावरही होईल. दिवसभरातील व्यवहारात रुपयाने वाढीसह सुरुवात केली असली तरी, नंतर त्याने आपली सुरुवातीची वाढ गमावली.

इराणमधील सुरू असलेले युद्ध आणि मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारपेठा हादरल्या असून त्याचा थेट परिणाम भारतीय चलनावर झाला आहे. यापूर्वी शुक्रवारी रुपया 89 पैशांच्या मोठ्या घसरणीसह प्रतिडॉलर 94.85 च्या विक्रमी नीचांकी पातळीवर बंद झाला होता. रुपया कमकुवत झाल्यामुळे परदेशातून आयात होणाऱ्या वस्तू महाग होतील. याचा अर्थ भारताला आता कच्च्या तेलासाठी अधिक डॉलर्स द्यावे लागतील. साहजिकच येत्या काही दिवसांत पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या (एलपीजी) किमती वाढू शकतात.

Advertisement
Tags :

.