For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नंदगड येथील संत मेलगे शाळेचे छप्पर नादुरुस्त

10:17 AM May 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
नंदगड येथील संत मेलगे शाळेचे छप्पर नादुरुस्त
Advertisement

धोकादायक स्थितीतील छपरामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात : त्वरित दुरुस्त करण्याची मागणी

Advertisement

खानापूर : नंदगड येथील नावलौकीक असलेली संत मेलगे मराठी शाळेची दयनिय अवस्था झाली असून गेल्या चार वर्षापासून या शाळेचे छप्पर निकामी झाले आहे. गळतीमुळे वर्गात पाणी साचत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे धोकादायक बनले आहे. याबाबत गेल्या तीन-चार वर्षापासून शाळेवर पत्रे घालण्यात यावेत, अशी मागणी करूनदेखील याकडे लोकप्रतिनिधी तसेच शिक्षण खात्याने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांना पाण्यात बसूनच शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यामुळे पालकवर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. नंदगड येथील जुना इतिहास असलेली संत मेलगे मराठी शाळा जुन्या नंदगड गावात असून या ठिकाणी 120 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र गेल्या चार-पाच वर्षापासून या शाळेचे छप्पर खराब झाल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. त्यामुळे वर्गखोल्यांतून पावसाचे पाणी साचत असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे धोकादायक बनले आहे. याबाबत मुख्याध्यापक, एसडीएमसी कमिटी यांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात तसेच ग्राम पंचायत अधिकाऱ्यांना वेळोवेळी छप्पर दुरुस्त करण्यासंदर्भात तसेच नव्याने पत्रे घालण्यासंदर्भात निवेदने, अर्ज दिले आहेत. मात्र याची दखल ग्रा. पं.ने अथवा गटशिक्षणाधिकाऱ्यांनी घेतलेली नाही.

शाळेच्या सुधारणेबाबत लोकप्रतिनिधीनाही निवेदन देवून मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप या शाळेसाठी निधीच मंजूर झाला नसल्याने यावर्षीही विद्यार्थ्यांना पावसात छपरातून गळणाऱ्या पाण्यातच शिक्षण घ्यावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आरोग्याचा धोका निर्माण झालेला आहे. याबद्दल मुख्याध्यापक मादार यांना विचारले असता ते म्हणाले, आम्ही वेळोवेळी शाळेच्या गळतीबाबत ग्राम पंचायत आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांना माहिती दिलेली आहे. मात्र याबाबत कोणताही क्रम घेण्यात आलेला नाही. यामुळे आम्हाला अशाच परिस्थितीत शाळा चालवावी लागत आहे. एसडीएमसी अध्यक्ष गंगाराम पाटील यांनीही ग्रा. पं.ने याकडे दुर्लक्ष केले आहे. इतर ग्राम पंचायतीच्या माध्यमातून शाळा दुरुस्ती, शाळा संरक्षक भिंतीसाठी मोठा निधी दिला जातो. मात्र नंदगड ग्रा. पं. ने याबाबत साफ दुर्लक्ष केल्याने संत मेलगे शाळेची अवस्था गंभीर बनली आहे. शाळेच्या सुधारणेसाठी ग्रा. पं. ला मोठ्या प्रमाणात निधी येतो. मात्र नंदगड ग्रा. पं. च्या अंतर्गत वादामुळे कोणताच विकास झालेला नाही. यात शाळाही सुटलेली नाही.

Advertisement

पंधरा दिवसात दुरुस्त न केल्यास उग्र आंदोलनाचा इशारा

म. ए. समितीचे कार्यकर्ते राजू पाटील यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षापासून आम्ही सातत्याने शिक्षण खात्याकडे आणि ग्राम पंचायत आणि लोकप्रतिनिधीकडे शाळेच्या सुधारणेबाबत मागणी करत आहोत. मात्र याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केल्याने शाळेची अवस्था गंभीर बनली आहे. यावर्षी विद्यार्थ्यांना पावसातच शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. यासाठी येत्या पंधरा दिवसात संबंधित खात्याने शाळेवर नव्याने पत्रे घालून छप्पर दुरुस्त केले नसल्यास विद्यार्थ्यांना घेऊन खानापूर गटशिक्षणाधिकारी कार्यालयात उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

-राजू पाटील

Advertisement
Tags :

.