For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज गर्जनेने सत्ताधाऱ्यांना घाम तर विरोधकांना उकळ्या

06:31 AM Apr 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
राज गर्जनेने सत्ताधाऱ्यांना घाम तर विरोधकांना उकळ्या
Advertisement

महाराष्ट्राचे राजकारण गेले काही दिवस जनतेच्या प्रश्नापेक्षा नको त्या प्रश्नांभोवतीच फिरत होते. त्यात प्रामुख्याने औरंगजेबाची कबर हा विषय चांगलाच गाजला. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा विषय गाजला, इतकेच नव्हे तर औरंगजेबाच्या कबरीच्या निमित्ताने राज्यात कोणकोणत्या महापुरूषांच्या कुठे कुठे कबर आहेत आणि त्या कोणत्या स्थितीत आहेत, हे त्या त्या मतदारसंघातील आमदारांनी विधानसभेत सांगितले. मात्र सगळ्यात जास्त विषय गाजला तो औरंगजेबाच्या कबरीचा, कबर असावी म्हणणारे आणि कबर उखडून टाकावी म्हणणारे असे सरळ दोन गट या निमित्ताने आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. आता मात्र हा विषय काल राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट कऊन गाडला असेच म्हणावे लागेल. राज ठाकरेंच्या या भूमिकेने केवळ राजकारण करण्यासाठी हिंदू धर्माचा पुळका असलेल्या सत्ताधाऱ्यांना घाम तर राज्याच्या राजकारणात दखलपात्र झालेल्या विरोधकांना उकळ्या फुटल्या आहेत.

Advertisement

मनसेचा 19 वा वर्धापन दिन पुण्यात 9 मार्च रोजी झाला. यावेळी राज ठाकरे यांनी फक्त बाळा नांदगांवकर यांनी कुंभमेळ्याला जाऊन आल्यानंतर आणलेल्या गंगेच्या तिर्थाबाबत भाष्य केले, बाकी मी गुढीपाडव्याला बोलेल असे राज म्हणाले होते. दरम्यान राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होत असताना अनेक विषयांवऊन राळ उठली होती. औरंगजेबाची कबर, मराठी भाषेचा मुद्दा आणि नागपूर येथे दोन गटात झालेली दंगल, त्यात मध्येच आले दिशा सालियन मृत्यु प्रकरण आणि कुणाल कामराचे विडंबन गाणे, मात्र या सगळ्यात जो विषय गाजला तो म्हणजे औरंगजेबाच्या कबरीचा विषय. तो कालपर्यंत गाजत होता, मात्र आता तो पुन्हा चर्चेला येईल असे वाटत नाही. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेनंतर आता याबाबत कोणी बोलेल असे वाटत नाही. राज ठाकरे यांनी रविवारी केलेल्या भाषणात हिंदुत्व आणि मराठी भाषा याबाबत बोलताना सत्ताधारी आणि या नको त्या गोष्टींना खतपाणी घालणाऱ्या लोकांवर टीका केली. राज यांनी कुठल्याही नेत्याचे किंवा पक्षाचे नाव न घेता ज्यांना द्यायचा होता, त्यांना इशारा दिला आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज यांनी पुन्हा एकदा मराठी भाषेचा मुद्दा घेताना, धर्माच्या आधारावर देश उभा करता येत नाही अशी रोखठोख भूमिका घेतली. हीच भूमिका जर शिवसेना, काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जर मांडली असती तर आत्तापर्यंत त्यांच्या घरासमोर औरंगजेबाची प्रातिनिधीक कबर बनवत सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी आंदोलन केले असते. राज यांच्या भूमिकेवर एक चकार शब्द कोणी काढला नाही हे विशेष म्हणावे लागेल. राज्यातील सत्ताधारी यांच्याकडे पाशवी बहुमत आहे, सध्या सरकारला कोणताही धोका नसताना गेल्या 100 दिवसातील सरकारच्या कामगिरीचा विचार केला तर सरकार आहे कुठे असा प्रश्न पडतो. गेल्या अर्थसंकल्पात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट लाभ देणाऱ्या भरमसाठ योजना जाहीर करणाऱ्या या सरकारने या बजेटमध्ये एकही लक्षवेधी घोषणा केलेली नाही हे विशेष म्हणावे लागेल. त्यामुळेच नको त्या व्यक्ती आणि गोष्टींभोवती राजकारण फिरत असल्याचे दिसले, हाच धागा राज यांनी पकडून मुळ प्रश्न बाजुला ठेवुन लोकांना जाती पातीच्या राजकारणात अडकवले जात असल्याचे राज म्हणाले. राज यांनी मांडलेल्या या भूमिकेने अनेक वाचाळवीर नेते हे बॅकफुटवर गेले आहेत. मराठी भाषा बोलणार नाही त्यांना कानफटात बसणारच असे राज यांनी बोलताना मनसैनिकांना त्यांनी पुढचा कार्यक्रमच दिला आहे. मराठा आरक्षणाचे राज यांनी कधीच समर्थन केलेले नाही, मात्र काल त्यांनी मराठा समाजाचे इतके आमदार व मुख्यमंत्री होऊन गेलेले असतानाही हे आरक्षण का मिळाले नाही असा सवाल विचारताना पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांनाच लक्ष केले. बीड येथील सरपंच संतोष देशमुख प्रकरणावर बोलताना त्यांनी हे प्रकरण कोणते मात्र त्याला मराठा विरूध्द वंजारी असे रंगवण्याचा प्रयत्न झाला, एकुणच राज ठाकरे यांनी जाती, धर्म व भाषेच्या नावावर राजकारण करणाऱ्यांचा बुरखा कालच्या सभेत फाडला.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पोलखोल

Advertisement

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. मनसेने पहिल्यांदा शहरप्रमुख तर उपशहर प्रमुख या पदांबरोबरच काही नवीन पदांची रचना नुकतीच जाहीर केली. मुंबई महापालिकेत गेली 25 वर्षे शिवसेना आणि भाजपची सत्ता आहे. आगामी काळात राज ठाकरे यांच्याकडून मुंबईतील अनेक प्रश्नांचे व्हिडीओ बाहेर येण्याची शक्यता आहे, त्यामुळे महापालिकेतील राज्यकर्ते हे राज यांचे पुढचे टार्गेट असणार हे नक्की. राज यांनी रविवारी बोलताना ना उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली ना एकनाथ शिंदेंवर, त्यांनी केवळ देवेंद्र फडणवीसांचे नाव घेताना, मराठी माणसाचे हित पाहणार असाल तर तुम्हाला पाठिंबा देऊ असे सांगितले.

राज ठाकरे यांच्या मनसेचे वैशिष्ट्या म्हणजे मनसेने गेल्या 19 वर्षात कोणत्याच पक्षाशी निवडणूकपूर्व युती केली नाही, एक तर थेट निवडणूका लढवल्या किंवा कोणाला ना कोणाला पाठिंबा जाहीर केला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पराभवाचे विश्लेषण करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजपसोबत निवडणूपूर्व युती केली असती तर चित्र वेगळे दिसले असते असे सांगितले. शिवडी विधानसभा मतदारसंघात महायुतीने बाळा नांदगावकर यांच्या विरोधात उमेदवार दिलेला नसताना येथे मनसेचा उमेदवार पडला. कदाचित येथे भाजपसोबत मनसेने निवडणूकपूर्व युती केली असती तर किमान बाळा नांदगांवकर, राजू पाटील आणि अमित ठाकरे आज विधानसभेत आमदार असते. त्यामुळे राज ठाकरे हे निवडणूकपूर्व युती करणार का? की पाठिंबा देणार की स्वबळावर लढणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रवीण काळे

Advertisement
Tags :

.