रस्ते झाले...आता सायकल ट्रॅकची खोदाई!
रुक्मिणीनगर येथे एलअॅण्डटीचा कारभार : नागरिकांत तीव्र संताप
बेळगाव : स्मार्ट सिटी योजनेतून शहर व उपनगरात काँक्रीटचे रस्ते, त्याच बरोबर सायकल टॅकची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र एलअॅण्डटी कंपनीकडून जलवाहिनी घालण्यासाठी जिकडे तिकडे काँक्रीटचे रस्ते व सायकल टॅक फोडले जात आहेत. रुक्मिणीनगर (नंदिनी डेअरी) येथे सायकल टॅकची पूर्णपणे खोदाई करण्यात आल्याने स्मार्ट सिटी योजनेतून या कामासाठी खर्ची घालण्यात आलेले कोट्यावधी रुपये खड्ड्यात गेले आहेत. शहरात स्मार्ट सिटी योजनेची कामे राबविण्यापूर्वी ड्रेनेज त्याचबरोबर 24 तास पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी जलवाहिन्या घालणे गरजेचे होते. मात्र निधी परत जाईल या भीतीने घाईघाईने स्मार्ट सिटीची कामे पूर्ण करण्यात आली.
वराती मागून घोडे या म्हणीप्रमाणे नव्याने करण्यात आलेले काँक्रीटचे रस्ते आणि सायकल टॅक एलअॅण्डटी कंपनीकडून फोडले जात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. विविध गल्ली बोळात मुख्य जलवाहिनी घालण्यासह घरोघरी नळजोडणी करण्यासाठी ड्रीलद्वारे रस्ते खोदले जात आहेत. खोदण्यात आलेल्या चरीमध्ये भराव टाकण्यात न आल्याने सदर चरी धोकादायक बनल्या होत्या. गणेशोत्सवापूर्वी चरी बुजविण्यात याव्यात या मागणीसाठी नगरसेवक शंकर पाटील यांनी एलअॅण्डटी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. त्यानंतर चरीमध्ये चिपींग आणि खडी टाकून बुजविण्यात आल्या आहेत. यानंतर एलअॅण्डटीकडून रुक्मिणीनगर परिसरात जलवाहिनी घालण्यासाठी चक्क सायकल टॅक फोडण्यात येत आहे. सदर सायकल टॅकचा उपयोग होण्याआधीच तो उखडला जात आहे. त्यामुळे नागरिकातून एलअॅण्डटीच्या मनमानी कारभाराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.