पर्वरी फ्लायओव्हरसाठी दोन महिने रस्ता बंद
पर्यायी मार्गाने वाहतूक वळविणार : जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी
प्रतिनिधी/ पणजी
पर्वरीत सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामासाठी येत्या 2 जानेवारीपासून तेथील विद्यमान रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यासंबंधी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केला आहे. आदेशानुसार दि. 2 जानेवारी ते 2 मार्च या कालावधीत हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार असून त्यातील दामियान दी गोवा, ते कदंब हॉटेलपासून ओ कोकेरो जंक्शनपर्यंतचा रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्या दरम्यान पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
पुलाच्या कामासाठी बंद ठेवण्यात येणारा रस्त्याचा सदर भाग हा प्रखर चढणीचा असल्याने अवजड वाहनांसाठी अवघड बनणार आहे. त्याची दखल घेऊन गिरवडे बाजूने नवीन ओडीपी रस्ता ते दामियान दी गोवा आणि पर्वरी बाजूने कदंब हॉटेलपासून ओ कोकेरो जंक्शनपर्यंत या महामार्गाचे दोन भाग बंद ठेवण्यात येणार आहेत. उर्वरित भागामधून वाहतूक चालू ठेवण्यात येणार आहे.
अवजड वाहनांची समस्या लक्षात घेऊन विद्यमान रस्त्यावरील एक लेन खुली ठेऊन त्यांना म्हापसा पणजी प्रवास करण्यास मोकळीक देण्यात आली आहे.
त्याशिवाय ऊ़ग्णवाहिका, अग्निशामक बंब आदी आपत्कालीन वाहनांसाठीही हा रस्ता खुला ठेवण्यात येणार आहे. या मार्गावर एखादे वाहन नादुऊस्त झाल्यास ते हटविण्यासाठी कंत्राटदाराने क्रेनची व्यवस्था तैनात ठेवावी तसेच बंद ठेवण्यात येणाऱ्या मार्गाच्या दोन्ही बाजूंनी किमान प्रत्येकी दोन ट्राफिक मार्शल नियुक्त करावे. त्यांना योग्य गणवेश, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट, दांडे आदी साहित्य पुरवावे. त्याशिवाय एक पर्यवेक्षक नियुक्त करून त्याचा मोबाईल क्र. पर्वरी वाहतूक पोलीस निरीक्षकांना पुरवावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
रहदारी वळविण्यात आलेल्या सर्व हंगामी मार्गांवर उजेडाची व्यवस्था करण्यात आली आहे. रस्ता बंद ठेवण्यात येत असला तरीही सकाळच्या वेळी उ•ाण पुलासाठी लागणाऱ्या सेगमेंटची वाहतूक करता येणार नाही. त्याचबरोबर पर्वरी वाहतूक पोलिसांकडून सूचना येत नाही तोपर्यंत कंत्राटदाराने रस्ता बंद किंवा वाहतूक वळवू नये, असे आदेशात सांगण्यात आले आहे.