For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाराष्ट्र हद्दीपर्यंतचा रस्ता हरवला खड्ड्यात

11:22 AM Jul 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
महाराष्ट्र हद्दीपर्यंतचा रस्ता हरवला खड्ड्यात
Advertisement

अपघाताला निमंत्रण : दोन दिवसांत पाच वाहनांचे अपघात : अनेकजण गंभीर जखमी : रस्ता दुरुस्त न केल्यास आंदोलनाचा इशारा

Advertisement

वार्ताहर /उचगाव

बाची गावाशेजारील कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीजवळ असलेल्या वळणावरील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. बेळगाव आणि शिनोळी रस्त्यावरुन धावणाऱ्या वाहनचालकांना रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने तसेच रस्त्याला वळण असल्याने चालकांचा वाहनावरील ताबा सुटून अवघ्या दोनच दिवसांत पाच वाहनांचे अपघात घडले. या घटनेत चालकासह अनेकजण गंभीररीत्या जखमी झाले असून, वाहनांचेही मोठे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी आणि बुधवारी घडली आहे. सदर घटनेमुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवासी वर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. बांधकाम खात्याने तातडीने या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अन्यथा रास्ता रोको करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. बेळगाव-वेंगुर्ले हा तीन राज्यांना जोडणारा एक महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्याने रात्रंदिवस हजारो वाहनांची ये-जा असते. मात्र लोकप्रतिनिधी तसेच बांधकाम खात्याच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. मात्र याकडे अद्याप कोणाचेही लक्ष नाही. अनेक वेळा या रस्त्यासंदर्भात वृत्तपत्रातून वृत्त प्रसिद्ध करूनही बांधकाम खात्याचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे या भागातील प्रवासी वर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

अपघातात काहीजण जखमी, कारचे नुकसान

मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसात चार कार गाड्या व एक ऑटो रिक्षाला अपघाताला सामोरे जावे लागले आहे. बाची ते कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या शंभर मीटर अंतराचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. रस्त्यावर खड्डे अधिक असल्याने खड्डे चुकविण्याच्या नादात वाहने रस्त्याच्या कडेला जाऊन मोठे अपघात घडले आहेत. आंध्राच्या एका कार गाडीला मोठा अपघात होऊन एकजण दगावल्याचे समजते. इतर वाहनातील प्रवासीही गंभीररीत्या जखमी झाले आहेत. आंध्रची कारगाडी बाची येथील गॅरेजमध्ये दुऊस्त करण्यासाठी सोडण्यात आल्याचेही कळते. मंगळवारी रात्री गोव्याच्या दिशेने जाणारी कारगाडी खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने आणि भरधाव असल्याने कारवरील चालकाचा ताबा सुटून कारगाडी शेतवाडीत गेल्याने चालकासह काहीजण जखमी झाले आहेत. कारचेही मोठे नुकसान झाले आहे. तरी सदर रस्त्याची तातडीने दुऊस्ती करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी या भागातील असंख्य प्रवासी आणि नागरिकांतून करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.