For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवाजी चौक ते पापाची तिकटी रस्ता विसर्जन मिरवणूकीसाठी होणार खुला

05:40 PM Sep 10, 2024 IST | Abhijeet Khandekar
शिवाजी चौक ते पापाची तिकटी रस्ता विसर्जन मिरवणूकीसाठी होणार खुला
KMC
Advertisement

कॉक्रीटीकरणाचे काम पुर्ण, गटारीचे काम युद्धपातळीवर; विसर्जन मिरवणूकीपुर्वी होणार रस्ता खुला

कोल्हापूर प्रतिनिधी

शिवाजी चौक ते पापाची तिकटी हा रस्ता काँक्रीटकरणाचे काम पुर्ण झाले आहे. सद्या रस्त्याकडेच्या गटारीचे काम युद्धपातळीवर सुरु असून, हे काम चार दिवसांत पुर्ण करण्याचे नियोजन महापालिकेच्या वतीने सुरु आहे. गणेश विसर्जन मिरवणूकीपूर्वी हा रस्ता खुला करण्याचे नियोजन महापालिकेच्या वतीने असून गणेश विसर्जन मिरवणूक जुन्या मार्गावरुनच होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिवाजी चौक ते पापाची तिकटी हा रस्ता शहरातील प्रमुख रस्त्यांपैकी एक आहे. या मार्गावरून कोकणात जाणाऱ्या वाहनांची संख्या सर्वाधिक असते. शिवाय येथे कोल्हापुरी चप्पल विक्रीची मोठी बाजार पेठ आहे. या ठिकाणी देशभरातील पर्यटक कोल्हापुरी चप्पल खरेदीसाठी येतात. परंतू येथील रस्त्याची स्थिती दयनीय झाली होती. रस्ता कमी आणि खड्डे जास्त अशी परिस्थती होती. पॅचवर्क केल्यानंतर पुन्हा रस्ता खराब होत होता. यामुळे महापालिकेने 2020 मध्ये या ठिकाणी 35 लाखांच्या निधीतून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत इको फेंड्रली रस्ता केला. परंतू सहा महिन्यातच रस्त्यावर खड्डे पडले. महापालिकेने शिवाजी चौक ते पापाची तिकटी रस्त्याचे क्राँक्रिटीकरणाचा निर्णय घेतला. 10 जूनपासून या रस्त्याचे काम सुरु झाली, या कामास 60 दिवसांची मुदत होती. मात्र या रस्त्याखालील महावितरणची विजपुरवठा करणारी वाहिनी, ड्रेनेज लाईन व पाणीपुरवठा करणारी लाईनचे काम हाती घेण्यात आल्यामुळे या कामास विलंब झाला. रस्ता केल्यानंतर पुन्हा काही अडचणी आल्यास हा रस्ता खोदावयास लागू नये यासाठी महापालिकेच्या वतीने नियोजनपुर्वक काम करण्यात आले. रस्त्याखालील ड्रेनेज, पाणीपुरवठा लाईन बदलण्यात आली. तसेच या रस्त्यावर भूमिगत विद्युत वाहिनी आहे. ती पुवीं 1 फुट खोल होती. मात्र सिमेंट कॉक्रीटचा रस्ता केल्यामुळे हीच लाईन 3 फुटापर्यंत खाली नेण्यात आली. यामुळे या कामाला अधिकचा विलंब झाला. आता विद्युतपुरवठा करणाऱ्या लाईनचेही काम पुर्ण झाले आहे. रस्त्याच्या कॉव्र्रीटीकरणाचे काम पुर्ण होवून 20 दिवस झाले आहेत.

Advertisement

गटारीचे काम अंतिम टप्प्यात
कॉक्रिटचा रस्ता झाल्यानंतर त्याची पुन्हा खुदाई करावी लागू नये. यासाठी महापालिकेने रस्त्याखालील विद्युत वाहिनी, ड्रेनेज लाईन आणि पाणी पुरवठा लाईनचे काम पुर्ण करण्यात आले. पहिल्यांदाच महापालिकेने अशा पद्धतीने नियोजन करुन रस्ता व त्याखालील सर्व कामे पुर्ण केली आहेत. सोबतच या रस्त्याशेजारी गटरचेही काम पुर्ण केल्याने रस्त्या चांगल्या पद्धतीने टिकण्यास मदत होणार आहे. रस्त्याभोवतीच्या गटारीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

मिरवणूकीचा मार्ग खुला
गणेश विसर्जन मिरवणूकीमध्ये या रस्त्याची भूमिका महत्वाची असते. उद्यमनगर, मटण मार्केटसह जी मंडळे मुख्य विसर्जन मिरवणूकीमध्ये सहभागी होत नाहीत अशी 150 हून अधिक सार्वजनिक तरुण मंडळे या मार्गाचा वापर करतात. यामध्ये 21 फुटी गणेश मुर्तींचाही समावेश असतो. हा रस्ता अपुर्ण राहिला असता तर गणेश विसर्जन मिरवणूकीवेळी अन्य पर्यायी मार्ग शोधण्याचे काम महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने सुरु होते. मात्र आता या रस्त्याचे काम पुर्ण झाल्यामुळे दरवर्षीप्रमाणेच विसर्जन मिरवणूकीचे नियोजन करण्यात येणार आहे.

Advertisement

शिवाजी चौक ते पापाची तिकटी या रस्त्याचे काँक्रीटचे काम पुर्ण झाले आहे. रस्त्याखाली असणाऱ्या ड्रेनेज लाईन, पाणीपुरवठा लाईन तसेच विद्युत वाहिनीचेही काम पुर्ण करण्यात आले आहे. रस्त्याकडेच्या गटारीचे काम 4 दिवसांमध्ये पुर्ण होवून हा रस्त्या वाहतूकीस खुला करण्यात येणार आहे.
शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत

Advertisement
Tags :

.