बागल चौक ते रेल्वेफाटक भाजी मार्केट रस्ता खड्ड्यातच
कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
शहरातील अनेक रस्त्यावर खड्डे आहेत. परंतू बागल चौक ते रेल्वेफाटक भाजी मार्केट रस्ताच खड्ड्यात असल्याचे वाटते. या रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना उड्याच मारत जावे लागते. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी व्यवसायिकांचा वेढा आहे. तरीही बारा महिने रस्त्यावरील खड्डे जसेच्या तसेच दिसतात.

महापालिकेकडून रस्ते दुरूस्ती करताना खड्ड्यात मुरूम टाकूण बुजवले जाते. हा मुरूम काही दिवसातच पुन्हा निघतो आणि खड्डा आहे तसाच राहतो. बागल चौक ते रेल्वेफाटक भाजी मार्केट रस्त्यावर कायम वाहनांची रहदारी असते. एक खड्डा चुकवण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्या खड्ड्यात गाडी हमखास आदळते. ऐवढी या रस्त्याची चाळण झाली आहे. या परिसरातील रहिवासी आणि व्यवसायिकांनी अनेकदा महापालिकेकडे तक्रार केली आहे. तरीही तात्पुरती डागडुजी केली जाते. परिणामी काही दिवसातच पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होते. या रस्त्यावर अनेकदा वाहनांचे आपघातही झाले आहेत. तरीही महापालिका प्रशासन हा रस्ता दुरूस्त करीत नाही, अशा स्थानिकांच्या तक्रारी आहेत. एस. टी. बस स्थानक, रेल्वेने जाणारे अनेक लोक याच परिसरातून प्रवास करतात. तसेच शाहूपुरी गवत मंडई ते बागल चौक परिसरात गाड्या दुरूस्तीची बुतांश वर्कशॉप आहेत. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातूनही अनेक वाहनधारक गाडी दुरूस्तीसाठी याच रस्त्याने येतात. वर्दळीच्या परिसरातील रस्त्याकडेही महापालिका दुर्लक्ष करते, असा आरोप वाहनधारकांकडून केला जातो.
बागल चौक ते रेल्वेफाटकपर्यंतच्या रस्त्यावरून केएमटी, रिक्षा, दुचाकी, चारचाकीची वाहतुक मोठ्या प्रमाणात होते. याच परिसरात करवीर तहसिल कार्यालय स्थलांतरीत केले आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्र, बीएड कॉलेज, शहाजी लॉ कॉलेजसह एक नामवंत शाळा आणि दोन खासगी क्लासेस या परिसरात आहेत. शिवाय बाहेरगावी रेल्वे किंवा एस. टी. ने जाणाऱ्या लोकांसह विद्यार्थीही याच मार्गाने प्रवास करतात. असे असतानाही या रस्त्याची दुरूस्ती वेळोवेळी केली जात नाही. सध्या पाऊस आला की रस्त्यातील खड्ड्यांमध्ये पाण्याची तळीच तयार होतात. पाण्यामुळे खड्डा किती खोल आहे, याचा अंदाज येत नसल्याने गाडी खड्ड्यात आदळून स्लिप होते. सध्या तर रस्त्याची चाळण झाली आहे. अपघात होतात तरीदेखील याकडे कोणीही लक्ष देत नाही.
- ठेकेदारावर वचक नाही
महापालिकेने रस्ता दुरूस्तीचा ठेका ज्या ठेकेदाराला दिला आहे, त्याच्याकडू रस्ता पक्का करून घेणे महापालिकेची जबाबदारी आहे. रस्ते दुरूस्त करणाऱ्या ठेकेदाराकडून कशा प्रकारे रस्ता केला आहे. याची पाहणीदेखील महापालिका प्रशासन करीत नाही. त्यामुळेच ठेकेदार निकृष्ठ दर्जाचे साहित्य वापरून रस्ते करतात. ठेकेदारावर महापालिकेचा वचक नसतो. त्यामुळे रस्त्यावर आठ दिवसात पुर्वीप्रमाणेच खड्डे पडतात.
-महंमद बागवान (व्यवसायिक)