आयपीएल’च्या पटरीवर ‘रो-को एक्सप्रेस’ !
‘इंडियन प्रीमियर लीग’ म्हणजे तुफानागत धडकणाऱ्या अनेक उदयोन्मुख, युवा खेळाडूंचा डंका वाजणारं व्यासपीठ...वय बाजूनं नसताना त्यांच्या स्पर्धेत उतरून आपलं महत्त्व टिकवून ठेवणं ही चेष्टा नव्हे...पण रोहित शर्मा व विराट कोहलीनं ही महामुश्किल गोष्ट सहज साध्य करून दाखविलीय अन् चालू हंगामातही या ‘रो-को’ जोडीनं किमान सुरुवात तरी सुसाट पद्धतीनं केलीय...आगामी एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक खेळण्याचं त्यांचं ध्येय पाहता यंदाच्या ‘आयपीएल’ला लाभलंय ते प्रचंड महत्त्व...
28 मार्च, 2026...बेंगळूरचा चिन्नास्वामी स्टेडियम अन् यंदाच्या ‘इंडियन प्रीमियर लीग’मधील पहिलीवहिली लढत...‘चेजमास्टर’नं 38 चेंडूंत पाच चौकार नि पाच षटकारांच्या साहाय्यानं नाबाद 69 धावा हाणल्या...‘स्ट्राईक रेट’ 181.57...त्यामुळं ‘रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर’ला तब्बल 26 चेंडू बाकी असताना ‘सनरायझर्स हैदराबाद’ची 201 धावसंख्या ओलांडणं शक्य झालं...
29 मार्च, 2026...मुंबईचा वानखेडे स्टेडियम...भारताच्या ‘त्या’ दिग्गज माजी कर्णधारानं 23 चेंडूंत अर्धशतक फटकावलं अन् 38 चेंडूंच्या साहाय्यानं प्रत्येकी सहा चौकार व षटकार लगावत झंझावती खेळी केली ती 78 धावांची...‘स्ट्ईाक रेट’ 205.26...ही करामत अजूनही दम कायम असलेल्या ‘रो-को’ जोडीची म्हणजेच रोहित शर्मा व विराट कोहलीची...
2007 साली आयोजित करण्यात आलेल्या ‘टी-20 जागतिक करंडक’ क्रिकेट स्पर्धेनंतर फक्त एकदिवसीय सामन्यांत खेळलेल्या एखाद्या खेळाडूला 50 षटकांच्या विश्वचषकात सहभागी होण्याची संधी मिळालेली नाहीये...येऊ घातलेल्या एकदिवसीय लढतींच्या जागतिक स्पर्धेच्या आयोजनाचा मान मिळालाय तो नामिबिया, दक्षिण आफ्रिका नि झिम्बाब्वे या त्रिकुटाला...रोहित शर्मा व विराट कोहली यांनी खात्रीनं विचार केलेला असेल तो जुन्या नियमाचे तीन तेरा वाजविण्याचा. दोन्ही दिग्गज खेळाडू कसोटी अन् टी-20 मधून निवृत्त झालेत नि सध्या त्यांनी लक्ष केंद्रीत केलंय ते फक्त एकदिवसीय सामन्यांवर. हळूहळू त्यांची संख्या कमी होऊ लागल्यानं रोहित-विराट जोडीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची ठरेल ती ‘इंडियन प्रीमियर लीग’ (आयपीएल)...
दोघांनाही संघाच्या व्यवस्थापनाला व निवड समितीला सिद्ध करून दाखवावी लागेल ती त्यांची अजूनही शिल्लक राहिलेली ताकद. कारण सध्या व्यवस्थापन आणि समिती प्रत्येकाचं विश्लेषण करताहेत ते खेळाडू किती कठोरपणे मैदानात आव्हानांना सामोरं जातात या दृष्टिकोनातून...‘मुंबई इंडियन्स’चं प्रतिनिधीत्व करणारा रोहित शर्मा नि ‘रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर’चा विराट कोहली यांच्या दृष्टीनं ‘आयपीएल’चे येऊ घातलेले आठ आठवडे फार फार महत्त्वाचे. या दोन्ही कर्तृत्ववान खेळाडूंवर मात करणं फारच कमी भारतीयांना जमलंय. परंतु 2027 सालच्या एकदिवसीय सामन्यांच्या जागतिक करंडक स्पर्धेच्या दिशेनं होणाऱ्या वाटचालीत मागील कामगिरी वा जुने विक्रम यांना फारसं महत्त्व राहणार नाहीये. तिथं विचार होईल तो फक्त वर्तमानकाळातल्या पराक्रमांचा...
पण त्यांना 2027 पर्यंत टिकणं शक्य होईल का ?...30 एप्रिल या दिवशी रोहित शर्मा प्रवेश करणार तो 39 व्या वर्षात, तर विराट कोहली झालाय 37 वर्षांचा. सध्या सुरू झालेली ‘इंडियन प्रीमियर लीग’ परीक्षा घेईल ती त्यांच्या तंदुरुस्तीची व फलंदाजीची. ‘रो-को’ म्हणून साऱ्या विश्वात प्रसिद्ध असलेल्या या जोडीला या पार्श्वभूमीवर सिद्ध करावी लागेल ती त्यांच्यातील प्रचंड तीव्रतेच्या सामन्यांना तोंड देण्याची क्षमता. तंदुरुस्ती हा खेळाचा 50 टक्के भाग, तर उर्वरित सारं अवलंबून असेल ते फॉर्मवर. कुठल्याही भारतीय क्रिकेटपटूला त्यांच्यापैकी एकाची निवड करण्यास सांगितल्यास तो खात्रीनं आधार घेईल बॅटमधून निघणाऱ्या धावांचा. ‘इंडियन प्रीमियर लीग’ महत्त्वाची ठरेल ती त्यामुळंच...
प्रेक्षक खात्रीनं त्यांची तुलना करतील ती काही दिवसांपूर्वी झालेल्या अन् भारतानं जिंकलेल्या ‘टी-20 विश्वचषक’ स्पर्धेतील खेळाडूंशी...‘टी-20’च्या हाणामारीनं हल्ला चढविलाय तो एकदिवसीय लढतींच्या लोकप्रियतेवर. याचं एक उदाहरण म्हणजे भारत फेब्रुवारी-मार्च, 2019 नंतर पाच सामन्यांची एकही मालिका खेळलेला नाहीये. हे मोठं अंतर गोलंदाजांपेक्षा खतरनाक ठरतंय ते फलंदाजांच्या दृष्टीनं. कारण त्यांना एखाद्या मालिकेत अपयशी ठरल्यास आपल्या गुणवत्तेचं दर्शन घडविण्याची संधी लवकर मिळत नाहीये...रोहित शर्मा व विराट कोहली यांचा विचार केल्यास दोन्ही खेळाडूंच्या पायांच्या हालचाली अजून फारशा मंदावलेल्या नाहीत हे मान्य करावंच लागेल. खेरीज त्यांच्यात मैदानावर वेगवान हालचाली करण्याची क्षमता लपलेली असून ते आव्हानांना भिडण्याच्या बाबतीत देखील मागं राहत नाहीत...
एकदिवसीय सामन्यांचं वर्णन ‘सात तास चाललेली परीक्षा’ असं करावं लागेल. या पार्श्वभूमीवर ‘टी-20’ म्हणजे तुलनेनं कमी कलावधीचा प्रकार असला, तरी गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण या साऱ्यांचंच जबरदस्त कस पाहणारं स्वरुप...रोहित शर्माचा विचार केल्यास त्याची एकदिवसीय कारकीर्द सुरक्षित वाटत असली, तरी वय आणि संघातील भूमिका यांच्या अडथळ्यांना सामोरं जाऊ लागू शकतं. तुलना मोठ्या प्रमाणात होऊ लागलीय ती वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन, संजू सॅमसनसारख्या तुफानी फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंमुळं...शर्माचे चाहते त्याच्या फटकेबाजीच्या नादात लवकर बाद होण्याला तसंच प्रसंगी निघणाऱ्या कमी धावांना फारसं महत्त्व देण्याच्या मनस्थितीत नाहीत. ते त्यानं नोंदविलेल्या 20-30 धावांच्या वेगवान खेळींचं वर्णन ‘नि:स्वार्थ डाव’ असं करतात. परंतु असे प्रकार कधी अंगवळणी पडतात ते खुद्द फलंदाजाला देखील कळत नाही. रोहित शर्माच्या बाबतीत काहीसं असंच घडलंय...कसोटी सामन्यांत सुद्धा तो त्याच पद्धतीनं फलंदाजी करू लागला, तंत्र पाठीमागं पडलं आणि त्याच्यावर पाळी आली ती निवृत्त होण्याची...
‘इंडियन प्रीमियर लीग’मध्ये खेळताना रोहितवर निवड समिती नि प्रशिक्षक गौतम गंभीर यांचं बारीक लक्ष राहील यात शंकाच नाही. या पार्श्वभूमीवर पाठीराख्यांना वेध लागलेत ते त्याच्या जुन्या फटक्यांचं दर्शन घेण्याचे. रोहित शर्माला फटके हाणताना, धावा चोरताना, क्षेत्ररक्षण करताना उच्च कोटीची तंदुरुस्ती दाखवावी लागेल. ‘आयपीएल’चा विचार केल्यास त्याला 500 धावांचा टप्पा ओलांडणं जमलंय ते फक्त 2013 साली. त्यामुळं पुन्हा कमी धावा नोंदविल्यास टीकाकारांचा आवाज वाढण्यास फारसा वेळ लागणार नाहीये...शिवाय गेल्या तीन एकदिवसीय लढतींत रोहितनं नोंद केलीय ती 3, 11 व 24 धावांची...
विराट कोहलीची बाबच वेगळी...त्याच्या पिढीतील तो सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाज असं म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाहीये. त्यामुळं त्याचं वर्णन नेहमी करण्यात येतंय ते ‘भारताच्या खेळांच्या इतिहासातील एक महान खेळाडू’ अशा शब्दांत...त्यानं कुठल्याही धावसंख्येचा पाठलाग करताना केलेली फलंदाजी म्हणजे तरुण खेळाडूंच्या दृष्टीनं आदर्श धडेच...दक्षिण आफ्रिका नि न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यांत खेळताना स्पष्टपणे दिसले ते त्याच्यातील बदल. त्यानं आक्रमणाला लवकर प्रारंभ केला आणि पहिल्या 10 चेंडूंत किमान एका चौकाराची नोंद करण्याच्या निर्धारानंच खेळला...विराटच्या फलंदाजीचं रहस्य लपलंय ते जास्त धोका न पत्करता धावा फटकावण्यात. त्या गुणाला त्यानं आता जोड दिलीय ती गतीची. ‘आयपीएल’च्या पहिल्या सामन्यात देखील दर्शन घडलं ते त्याचंच...कोहलीची खतरनाक गोलंदाजांवर वर्चस्व गाजविण्याची जिद्द अजूनही कमी झालेली नाहीये. संयम बाळगूनही गोलंदाजांचा खात्मा करण्याची कला अवगत असलेला तो अद्वितीय फलंदाज...
विराट कोहलीनं ‘इंडियन प्रीमियर लीग’च्या एका हंगामामध्ये 400 पेक्षा जास्त धावा जमविल्याहेत त्या तब्बल 11 वेळा. गेल्या तीन मोसमांत त्याचा ‘स्ट्राईक रेट’ राहिलाय तो 140 हून अधिक. विराटनं गेल्या वर्षी नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करताना धावा फटकावल्या त्या 147.8 ‘स्ट्राईक रेट’नं. ही गती या ‘चेजमास्टर’नं धावांचा पाठलाग करताना नोंदविलेल्या 142.18 ‘स्ट्राईक रेट’पेक्षाही जास्त....2025 वर्षापासून कोहलीनं एकदिवसीय लढतींत धावा फटकावल्याहेत त्या 98.45 या गतीनं. हा ‘स्ट्राईक रेट’ त्याच्या कारकिर्दीतील 93.41 पेक्षा अधिक...‘आयपीएल’ म्हणजे विश्लेषणाचा कीस काढली जाणारी स्पर्धा. क्रिकेटवर प्रेम करणारी प्रत्येक व्यक्ती स्वत:चं मत करण्यास मागंपुढं पाहत नाही...वेगानं धावणाऱ्या वयाला न जुमानता स्वत:चं महत्त्व टिकवून ठेवण्याचा संकल्प केलेल्या ‘रो-को’ जोडीला परीक्षा द्यावी लागेल ती या पार्श्वभूमीवर !
‘विराट’ पराक्रम...
? विराट कोहलीनं गेल्या नऊ एकदिवसीय लढतींत अन् विजय हजारे चषक स्पर्धेतील दोन सामन्यांत मिळून नोंदविल्याहेत त्या 821 धावा...
? ऑस्ट्रेलियात लागोपाठ दोन वेळा शून्यावर बाद झाल्यानंतर राजकोट इथं न्यूझीलंडविरुद्ध काढलेल्या 23 ही त्याची सर्वांत कमी धावसंख्या...
? ‘आयपीएल’च्या गेल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरला जेतेपद मिळविणं शक्य झालं ते त्याच्या 657 धावांमुळंच...
? विराट कोहलीनं लक्ष्याचा पाठलाग करताना ‘इंडियन प्रीमियर लीग’मध्ये 4027 धावा फटकावल्याहेत त्या 41.51 सरासरीनं. असा पराक्रम नोंदविणारा तो स्पर्धेतील एकमेव खेळाडू...
? विराटच्या मतानुसार, विश्रांती मिळणं अत्यंत महत्त्वाचं...जोपर्यंत एखादा खेळाडू शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त अन् मानसिकदृष्ट्या सक्षम असतो तोपर्यंत चिंता करण्याची गरज नाहीये...त्याचबरोबर त्यानं स्पष्टपणे सांगितलंय की, सातत्यानं चांगल्या कामगिरीचं दर्शन घडविल्याशिवाय संघातील जागा टिकविणं अत्यंत कठीण..

- राजू प्रभू