वाढत्या उष्म्याने रसाळ लिंबूंची चलती
बेळगाव : वाढत्या उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे थंडगार पेय आणि फळांची मागणी वाढू लागली आहे. विशेषत: बाजारात वाढत्या उन्हामुळे रसाळ लिंबूंची चलती पाहावयास मिळत आहे. वाढत्या मागणीमुळे लिंबूंच्या दरातही वाढ झाली आहे. पाच ते सहा रुपयांना एक लिंबू याप्रमाणे विक्री होत आहे. किरकोळ बाजारात लिंबूची आवक वाढू लागली आहे. रखरखत्या उन्हात तहान भागविण्यासाठी लिंबूंची खरेदी होत आहे. त्यामुळे लिंबूंना अधिक पसंती मिळताना दिसत आहे. उन्हाचा पारा वाढल्याने नागरिकांकडून रसाळ फळांची खरेदी होऊ लागली आहे. त्याबरोबरच लिंबू सरबत, लिंबू सोडा आदींसाठी लिंबूंची खरेदी केली जात आहे. उन्हाळा वाढला की लिंबूंची आवक अधिक प्रमाणात होते. सध्या यात्रा-जत्रा व लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे लिंबूंची खरेदी होऊ लागली आहे. हॉटेल, रसवंतीगृहे, सरबत आदींसाठी लिंबूंचा वापर वाढला आहे. मागणी वाढल्याने बाजारात आवकही होऊ लागली आहे. मात्र, वाढत्या उष्म्याने लिंबूंचे दर चढेच असल्याचे दिसत आहे. शहराचा पारा 38 अंशांच्या पुढे जाऊ लागला आहे. त्यामुळे दुपारच्या उन्हात शरीराची लाही लाही होत आहे. त्याचबरोबर रसाळ फळांची मागणी वाढू लागली आहे.