For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चीनी ड्रॅगनचा वाढता विळखा

06:44 AM Jan 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
चीनी ड्रॅगनचा वाढता विळखा
Advertisement

सारा देश हा अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा समारंभाकडे आतुरतेने बघत असताना देशाच्या प्रतिष्ठेला आणि सुरक्षेला बाधा आणणारी एक गंभीर घटना घडलेली आहे. ‘येत्या 15 मार्चपर्यंत भारतीय सेना मालदीवमधून हटवा’, असा आदेश मालदीवचे नवीन राष्ट्रपती मुइझ्झू यांनी देऊन नवी दिल्लीला एक जबर हिसका दिलेला आहे.

Advertisement

जगाच्या नकाशावर दिसून देखील येऊ न शकणारे हे हिंद महासागरातील छोटे बेटवजा राष्ट्र तिथे नुकत्याच झालेल्या सत्ताबदलानंतर चीनच्या पूर्ण कच्छपी गेले आहे. तेथील निवडणूक ही ‘इंडिया आऊट’  (भारताला हाकला)  या मुद्यावर लढवली गेली होती.  ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. मुइझु हे नुकतेच चीनच्या ‘यशस्वी’ दौऱ्यावरून परतले आहेत त्यानंतर त्यांनी हा आदेश जारी करून एकच खळबळ माजवून दिलेली आहे

भारताचे फार मोठे सैन्य मालदीवमध्ये आहे असे नाही. पण ज्या पद्धतीने त्यांच्या हकालपट्टीचे राजकारण इवल्याशा मालदीवने मूद्दामून चालवले आहे ते चीनला खुश करण्यासाठी आहे असे मानणे फारसे अनुचित नाही. राजीव गांधी पंतप्रधान असताना मालदीववर समुद्री चाचांनी अचानक हल्ला केला होता. तेव्हा तेथील राष्ट्रपती अब्दुल गयुम यांनी लपतछपत राजीव गांधींना फोन केला होता आणि सहाय्यता मागितली होती. भारतीय लष्कराने काही तासांच्या आतच तिकडे धावा बोलून मालदीवला आझाद केले होते. गेल्या तीन-चार दशकात मालदीववर कोणत्याही प्रकारचे संकट आले तेव्हा भारत धावून गेला आहे. एकदा तरी तिथे पिण्याच्या पाण्याचे अभुतपुर्व संकट निर्माण झाले होते तेव्हा भारताने विमानाने पाणी त्याला पुरवले होते.

Advertisement

हिंद महासागरात फार मोक्याच्या ठिकाणी मालदीव असल्याने रणनीतीक दृष्ट्या भारताकरता ते महत्त्वाचे आहे. छोटेखानी असले तरी त्याला 800 किलोमीटरचा किनारा (एक्सकॅलुसिव्ह इकॉनॉमिक झोन) असल्याने तो आर्थिकदृष्ट्या देखील महत्त्वाचा आहे. ज्यापद्धतीने सर्व शेजारी राष्ट्रात चीन सक्रिय झालेला आहे ते म्हणजे भारताला ड्रॅगन विळखा घालत आहे असेच जाणकार मानतात. श्रीलंकेमध्ये चीनने हातपाय पसरायला सुरुवात केलेली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली वाकलेला श्रीलंका हा चीनचा मिंधा झालेला आहे आणि त्याच्यामुळे भारताच्या हितांकडे दुर्लक्ष करत आहे अशी भावना वाढीला लागली आहे.

पाकिस्तानचे  देखील आर्थिक दिवाळखोरीने हाल सुरु आहेत. बदलत्या परिस्थितीत सौदी अरेबिया सारखी धनाढ्या तेलसंपन्न राष्ट्रे पाकिस्तानला मदत करेनाशी झाल्याने ते देखील चीनच्या आर्थिक मदतीशिवाय तग धरू शकत नाही. अफगाणिस्तानमधून आता अमेरिकन फौज हटल्यामुळे पाकिस्तानचे बारा वाजू लागले तरी वॉशिंग्टनला आता त्याची फारशी फिकीर नाही. दुष्काळात तेरावा महिना या न्यायाने इराणने पाकिस्तानमधील काही दहशतवादी ठिकाणांवर रॉकेटचा हल्ला चढवून इस्लामाबादला जबर धक्का दिलेला आहे. इराण असा अचानक हल्ला करेल याची सुतराम कल्पना नसलेला पाकिस्तान हादरून गेला आहे. अलीकडील काळात चीन आणि इराणचे गुळपीठ वाढले असल्याने या वादामुळे चीन आपले वजन दोन्ही देशात वाढवू शकतो.

युक्रेन युद्धात अडकलेला रशिया अलीकडे पाकिस्तानला मित्र म्हणू लागला असला तरी त्याची कोणत्याही पद्धतीने मदत करण्याच्या परिस्थितीतच नाही. सध्याच्या काळात रशिया आर्थिक निर्बंधांचा सामना करत असताना भारत मोठ्या प्रमाणावर तेल आयात करून त्याची मदत करत असल्याने त्याला या मदतीला जागावे लागत आहे. बदलत्या जगात चीन रशियाचा ‘मोठा भाऊ’ झाला आहे, काल परवापर्यंत हिंदू राष्ट्र राहिलेल्या नेपाळमध्ये देखील एक भारतविरोधी सूर दिसत आहे. तेथील चीनधार्जिण्या तत्वांनी देखील वेळोवेळी भारत विरोधी भावना तिथे भडकावलेल्या आहेत. गेल्या दशकभरात चीनचे सामर्थ्य प्रचंड वाढल्याने नेहमी भारताचा मित्र राहिलेला भूतानदेखील आता सावध झाला आहे. चीनबरोबरील त्याचा सीमावाद सोडवताना त्याने भारताचे हित बाजूला करून नवी दिल्लीला धक्काच दिला. चीनबरोबरील सीमावादावरील चर्चेबाबत देखील भुतानने भारताला अंधारात ठेवले होते.

म्यानमारमध्ये तेथील लष्करी प्रशासन विविध प्रदेशात बंडाळीचा सामना करत असल्याने या बंडखोर गटांचा बिमोड करण्यासाठी त्याला चीनचा आधार घेणे भाग पडत आहे. म्यानमारमधील चीनच्या या वाढत्या प्रभावाला कमी करण्याचे अमेरिकी प्रयत्न आत्तापर्यंत निकामी ठरलेले आहेत. भारताच्या मणिपूर सारख्या पूर्वोत्तर भागात सक्रिय होऊन आपण चीनला शह देऊ शकतो असे वाटल्याने मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी मदत करण्याची आपली तयारी आहे असे सांगून अमेरिकेने भारतात वादळ माजवले होते. अंदमान आणि निकोबार बेटे म्यानमारपासून फारशी दूर नसल्याने तेथील चिनी प्रभाव भारताची चिंता वाढवणारा आहे. फिलिपिन्सने तर त्याच्या काही बेटाजवळ चीन अतिसक्रिय झाल्याने अमेरिकेला तिथे एक नाविकी तळ बसवण्याची परवानगी दिलेली आहे.  इंडोनेशिया, थायलंड, व्हिएतनाम, कंबोडिया असे म्यानमार आणि फिलिपिन्सच्या जवळ असणारे देश देखील चीनच्या या वाढत्या सक्रियतेने चिंतातूर झालेले आहेत. जपान आणि चीनचे हेवेदावे फार जुने आहेत. चीनपासून धोका उत्पन्न झालेल्या या देशांना भारत मजबूत झाला तर फार बरे होईल असे वाटते. पण गेल्या दशकात चीन आपल्यापुढे फार गेलेला आहे.

अफगाणिस्तानमधून अमेरिकेने अचानक गाशा गुंडाळून जी परिस्थिती निर्माण केली आहे तिचा पुरेपूर फायदा चीन उपटत आहे. आर्थिक ताकद प्रचंड वाढल्याने चीन अमेरिकेच्या जागी जगाचा ‘पोलीस’ बनू पाहत आहे. शी जीन पिंग यांचे चीनच्या राजकारणातील वाढते वर्चस्व हे त्याला जास्त आक्रमक बनवत आहे. भारत अमेरिकेच्या कळपात गेलेला आहे असा चीनचा ठाम विश्वास असल्याने त्याला वेळोवेळी धडा शिकवण्याचे राजकारण त्याने सुरु ठेवले आहे. गल्वान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर भारत आणि चीनच्या फौजा गेली तीन वर्षांपासून पूर्व लडाखमध्ये समोरासमोर उभ्या ठाकल्या आहेत. भाजपचे असंतुष्ट नेते आणि चीनविषयीचे तज्ञ सुब्रमण्यम स्वामी यांनी चीनने लडाखच्या चार हजार चौरस किलोमीटर भारताच्या भागात घुसखोरी केलेली आहे असे सोशल मीडियावर  नुकतेच सांगितले आहे. आपण वेळोवेळी विविध प्रकारे हा मुद्दा उठवत आहोत पण सरकार आपल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे टाळत आहे असा आरोप केलेला आहे.

गल्वान  खोऱ्यातील चकमकीनंतर भारताला मित्र म्हणवणारा अमेरिका हा सळाळून पेटला पाहिजे होता. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला असे म्हणायला पाहिजे होता आणि तद्वत त्याने कृती करावयास हवी होती. इस्राईलवरील हमासच्या हल्ल्याने पेटून उठलेला अमेरिका गल्वानमधील घटनेनंतर यथातथाच बोलला. बोलाचाच भात, बोलाचीच कढी असा तो प्रकार होता. याचा अर्थ चीन बरोबर दोन हात करण्यासाठी भारताच्या मदतीला कोणीही धावून येणार नाही.

गल्वानमधील भीषण चकमकीनंतर देखील चीनने दोनवेळा मोक्याच्या जागी भारतावर चढाई केली होती अशी माहिती आता पुढे येत आहे. चीनच्या या चढाया आपण हणून पडल्या. पण याचा अर्थ असा की चीनच्या खोड्या या वाढणारच आहेत. त्याकरिता दुप्पट तयारीने देशाने उभे राहिले पाहिजे.  ‘कोई आया नही, कोई गया नही’, असे केवळ म्हणून चालणार नाही. रात्र वैऱ्याची आहे. डोळ्यात तेल घालून जागे राहण्याला पर्याय नाही. पाकिस्तानला शह दिला की मिशीला पीळ देणारे चीनसमोर कसे उभे ठाकणार यावर त्यांना इतिहास परखणार आहे.

सुनील गाताडे

Advertisement
Tags :

.