धनाढ्यांनी स्वत:हून बीपीएल कार्डे जमा करावीत
न केल्यास दंडात्मक कारवाई : अन्न-नागरी पुरवठा खात्याचे आवाहन
बेळगाव : खोट्या कागदपत्रांची पूर्तता करून बीपीएल कार्डे मिळविलेल्या सरकारी नोकर आणि धनाढ्यांनी स्वत:हून रेशनकार्डे जमा करावीत अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल, असे आवाहन अन्न व नागरीपुरवठा खात्याने केले आहे. दुर्बल घटकांसाठी तसेच 1 लाख 20 हजार रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबीयांसाठी बीपीएल कार्डे दिली जातात. मात्र, काहींनी खोटी कागदपत्रे पुढे करून बीपीएल कार्डे मिळविली आहेत. यामध्ये धनाढ्यांना बीपीएल कार्डे मिळाली असली तरी अनेक दारिद्र्या रेषेखालील कुटुंबीय बीपीएलपासून वंचित असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे बीपीएल कार्डे धनाढ्यांसाठी की गरिबांसाठी? असा प्रश्नही सर्वसामान्यांतून उपस्थित होऊ लागला आहे. याला आळा घालण्यासाठीच खात्याने आता स्वत:हून बीपीएल कार्डे जमा करण्याची हाक दिली आहे.
खात्याचा आता कारवाईचा बडगा
धनाढ्यांनी वेळेत बीपीएल कार्डे जमा न केल्यास आतापर्यंत घेतलेल्या गृहलक्ष्मी, अन्नभाग्य आणि तांदळाचे पैसेही वसूल केले जाणार आहेत. शिवाय स्वत:हून बीपीएल कार्डे जमा करणाऱ्यांना तातडीने एपीएल कार्डे दिली जाणार आहेत. सरकारी नोकर, रेल्वे कर्मचारी, निवृत्त लष्करी जवान, आयकर भरणारे, चारचाकी वाहन असणारे यासह इतर अनेकांनी बीपीएल कार्डे घेतली आहेत. मध्यंतरी एजंटांकरवी ही कार्डे मिळविली आहेत. मात्र, अशांसाठी खात्याने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. अन्न व नागरीपुरवठा खात्याने आयकर भरणाऱ्या लाभार्थ्यांसाठी नोटीसा धाडल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 7 हजार 57 जण आयकर भरणारे सापडले आहेत. अशांनी स्वत:हून कार्डे जमा करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई होणार आहे.
अन्न निरीक्षकांकडून कारवाई करणार
गॅरंटी योजनांच्या लाभासाठी बीपीएल कार्डे मिळविणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामध्ये बेकायदेशीर कार्डे अनेकांनी मिळविली आहेत. त्यामुळे अशांची कार्डे रद्द करण्याचे आव्हानही खात्यासमोर आहे. याबाबत रेशनदुकानदारांना माहिती जमविण्याच्या सूचना दिल्या आहेत. रेशनदुकानदारांनी धनाढ्यांची माहिती दिल्यानंतर साहाय्यक निर्देशक, अन्न निरीक्षकांकडून कारवाई केली जाणार आहे.
बीपीएल जमा केल्यास त्वरित एपीएल कार्डे देणार
बेकायदेशीरपणे ज्यांनी बीपीएल कार्डे मिळविली आहेत, त्यांनी स्वत:हून खात्याकडे कार्डे जमा करावीत. अशांना तातडीने एपीएल कार्डे देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वेळेत कार्डे जमा न केल्यास अशांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
नजीर अहमद कनवळी (साहाय्यक निर्देशक अन्न व नागरीपुरवठा खाते)