ठाकरे बंधुंसाठी निकाल आत्मचिंतन करणारे
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्याच्या राजकारणातील ठाकरे बंधुंना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. उध्दव ठाकरे यांना केवळ 20 जागांवर तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे इंजिन यार्डातून बाहेरपण पडले नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फुट पडल्यानंतर भाजपने आता राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटाला सोबत घेत महायुती केली. या निवडणुकीत भाजपबरोबरच या दोन पक्षाला मिळालेल्या यशामुळे, यापुढे ठाकरे बंधुंच्या महाराष्ट्रातील राजकीय अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेना नेते संजय राऊत आणि मनसे नेते प्रकाश महाजन यांनी ठाकरे बंधु यांनी एकत्र येण्याचे सुचक वक्तव्य केल्याने, राज आणि उध्दव यांच्या एकत्र येण्याच्या पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत.
विधानसभा निवडणूक निकाल बघता ते महायुती वगळता सगळ्यांसाठीच धक्कादायक लागले, मात्र त्यात सर्वाधिक नुकसान जर कोणाचे झाले असेल तर ठाकरे बंधुंचे. काही दिवसापूर्वी राज ठाकरे यांनी यावेळी भाजपचा मुख्यमंत्री होईल आणि मनसे किंगमेकर ठरणार असल्याचे सांगितले होते. मात्र कालच्या निकालात मनसेला भोपळाही फोडता आलेला नाही. मनसे स्थापनेनंतर आजपर्यंतची ही सर्वात खराब कामगिरी मानली जात आहे. विशेष म्हणजे राज हे आपल्या मुलालाही निवडून आणू शकले नाहीत. तर दुसरीकडे उध्दव ठाकरे यांना केवळ 20 जागांवर यश मिळाले आहे. ठाकरे बंधुंच्या राजकारणातील वाताहतीमुळे आता या दोन्ही बंधुंनी एकत्र येण्याची चर्चा होऊ लागली आहे. महाराष्ट्रात समाजवादी पक्ष दोन जागा, एका जिह्यापुरता असणारा जनसुराज्य पक्ष दोन जागा जिंकत असताना, राज ठाकरे यांना 125 जागा लढताना एकाही जागेवर विजय न मिळणे हे धक्कादायक आहे. 2009 ला पहिल्याच निवडणुकीत तब्बल 13 जागा मिळवणाऱ्या मनसेला 15 वर्षानंतर आता अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या निकालानंतर राज-उध्दव नाही किमान दुसऱ्या पिढीतील आदित्य आणि अमित ठाकरे यांनी तरी आता काही तरी भूमिका घेतली पाहिजे. त्यांनी एकत्र आले पाहिजे, अशी मागणी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते कऊ लागले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे ब्रॅन्डचा एक वेगळा करिष्मा राहिला होता, ठाकरी शैली महाराष्ट्राच्या राजकारणात प्रसिध्द आहे. प्रत्येक निवडणुकीत कधी राज ठाकरे तर कधी उध्दव ठाकरे हे निकालानंतर गेमचेंजर ठरले, मात्र या निवडणुकीत ठाकरे ब्रॅन्डचा पुरता बँड वाजला. भाजप आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांना कोणत्याही राज्यात प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊनच निवडणूक लढावी लागते. महाराष्ट्रात देखील भाजपने शिवसेनेच्या माध्यमातून तर काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत नेहमीच आघाडी आणि युतीचे राजकारण केले, मात्र आता या दोन्ही प्रादेशिक पक्षांमध्येच फुट पडल्याने या निवडणुकीत सारी समीकरणे बदलली. भाजपला आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन प्रादेशिक पक्ष आणि त्यांचे नेते मिळाल्याने आता भाजपला कोणाची मदत लागणार नाही, राज ठाकरे यांचीसुध्दा आता भाजपला गरज भासणार नाही. राज ठाकरे यांनी भाजपशी केलेली जवळीक, राजकारणातील धरसोड वृत्ती, लोकसभेला भाजपला न मागता बिनशर्त पाठिंबा द्यायचा तर दुसरीकडे महायुतीत न जाता विधानसभेला भाजपच्या विरोधातच निवडणूक लढवायची, जे कार्यकर्ते लोकसभेला भाजपला मतदान करा सांगत होते, तेच आता भाजपच्या विरोधात मतदान करा असे सांगत आहेत. अशा भूमिकेमुळे देखील लोकांनी वेगळाच पर्याय निवडला. राज जर भाजपसोबत महायुतीसोबत सहभागी झाले असते किमान ते त्यांच्या मुलाला तरी निवडुन आणु शकले असते. शिवडीत बाळा नांदगांवकर यांच्या विरोधात महायुतीने उमेदवार दिला नाही, मात्र दुसरीकडे सर्व ठिकाणी उमेदवार देणे अशा संभ्रमीत भूमिकेचा देखील शिवडीतील लोकांनी विचार केला. राज ठाकरे यांनी जरी ही निवडणूक गांभीर्याने घेतलेली असली तरी लोकांनी राज ठाकरे यांना अजिबात गांभीर्याने घेतले नसल्याचे या निवडणुकीच्या निकालाने दिसले. राज हे केवळ निवडणुकीच्या वेळी सभा घेतात आणि त्या त्या मतदार संघातील विरोधी उमेदवाराबद्दल भाषणात जोरदार टीका करतात, इतर वेळी मात्र ते कोणत्याच विषयावर काही बोलत नाहीत. काही विषयांवर राज ठाकरे यांनी बोलावे असे जनतेला वाटत असतानाच राज नेमके त्यावेळी भूमिका घेताना दिसत नाहीत. कर्नाटकमध्ये काँग्रेस जिंकल्यानंतर बोलायचे ‘हे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे यश आहे’, दुसरीकडे त्याच दरम्यान राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका करायची. भाजपचा एक खासदार राज ठाकरे यांना उत्तर प्रदेशात येतो कसा, असा दम देतो आणि त्याच दरम्यान राज ठाकरे काही बोलत नाहीत, भाजपची तळी उचलतात ही राज यांची एक खमका नेता म्हणून भूमिका पटली नाही. तिकडे उध्दव ठाकरे यांना एकुण 20 जागा मिळाल्या त्यातील 10 जागा या केवळ मुंबईतच मिळाल्या. कोकण, ठाणे या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा गड ढासळला. ठाकरे बंधुंच्या बदललेल्या भूमिकेमुळे त्यांच्या पक्षापेक्षा मराठी माणसाचे मोठे नुकसान होत असल्याची भावना दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते व्यक्त करताना दिसत आहेत. मनसे आणि शिवसेना एकत्र आल्यास मराठी मतांचे जे विभाजन झाले, मराठी लोकांनी जे इतर पर्याय शोधले ते पर्याय न शोधता या युतीला मतदान केले असते, असे आता कार्यकर्ते बोलत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रात भाजपला ठाकरे ब्रॅन्डच ठेवायचा नसून जे, आमच्यासोबत तेच आमचे ते पण आमच्या अटी आणि शर्थीवर जे आमच्याशिवाय त्यांना संपवणार हेच भाजपचे धोरण असल्याची टीका विरोधक करत आहेत. राजकारणात कोणाला तरी मोठं करण्यासाठी कोणाला तरी छोटं केलं जातं, मात्र इतकं पण छोटं होऊ नये की आपल्या अस्तीत्वाचाच प्रश्न निर्माण होईल. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तर मिळाला, पण आता मराठी भाषेसाठी लढणाऱ्या राजकीय पक्षाच्या दर्जाबाबत सवाल निर्माण झाला आहे. एकही आमदार निवडून न आल्याने तसेच एकुण मतांच्या आठ टक्के मते न मिळाल्याने निवडणूक आयोग राज ठाकरे यांच्या पक्षाची मान्यता रद्द करू शकते..मग राज यांचे चिन्हही जाऊ शकते, बाळासाहेबांच्या नंतर शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गेले आता मनसेचे देखील नाव आणि चिन्ह गेल्यास केवळ 18 वर्षात पक्ष आणि चिन्ह गेल्याची नामुष्की राज ठाकरे यांच्यावर येईल. ठाकरे बंधुंसाठी मात्र ही निवडणूक भविष्याच्या दृष्टीने आत्मचिंतन करायला लावणारी नक्कीच आहे.
प्रवीण काळे