For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रिसॉर्ट राजकारणाचा डाव; काँग्रेसची फजिती

06:22 AM Jun 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
रिसॉर्ट राजकारणाचा डाव  काँग्रेसची फजिती
Advertisement

मध्यप्रदेशातील काँग्रेसचे आमदार बेंगळूरला शिफ्ट होणे टळले : ऑपरेशन कमळची होती भीती

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेंगळूर

Advertisement

देशाच्या राजकारणात रिसॉर्ट राजकारण पुन्हा एकदा चर्चेत येण्यापूर्वीच काँग्रेसची फजिती झाली आहे. आगामी राज्यसभा निवडणुकीत क्रॉस-व्होटिंग आणि ऑपरेशन कमळच्या भीतीमुळे, मध्य प्रदेशातील सर्व काँग्रेस आमदारांना बेंगळुरात सुरक्षितपणे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु मध्यप्रदेशातील काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्जच बाद ठरला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदारांचे बेंगळूरला येणे टळले आहे. त्यांना भोपाळच्या विमानतळावरून बेंगळूरला येण्याऐवजी आपल्या मतदारसंघात परतावे लागले. डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री झाल्यावर राज्यात काँग्रेसकरता राजकीय दृष्ट्या सुरक्षित वातावरण असल्याचा विचार करता मध्य प्रदेशातील पक्षाच्या आमदारांना येथे आणण्याचा निर्णय झाला होता.

राज्यसभा निवडणुकीला रंगत आल्याने मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदार क्रॉस व्होटिंग करतील, अशी गंभीर भीती पक्षाला होती. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या हायकमांडच्या निर्देशानुसार, सर्व आमदारांना बेंगळूर येथे एकत्र आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच त्यांच्या राहण्याची व्यवस्था येथील एका प्रतिष्ठित खासगी रिसॉर्टमध्ये करण्यात आली होती. त्यानुसार सर्व आमदार भोपाळ येथील विमानतळावर दाखलही झाले होते. मात्र, तेथील काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्जच बाद ठरला आहे.

सूत्रांनुसार, विरोधी पक्ष आपल्या आमदारांना आकर्षित करण्यासाठी किंवा त्यांना क्रॉस-व्होटिंगसाठी आमिष दाखवून ‘ऑपरेशन’ राबवू शकतात, असा दाट संशय काँग्रेस नेत्यांना होता. त्यामुळे आमदारांचा बाहेरील कोणताही संपर्क टाळण्यासाठी आणि एकता टिकवून ठेवण्यासाठी हा खबरदारीचा उपाय हाती घेण्यात आला होता. बेंगळूरमधील एका रिसॉर्टमध्ये या आमदारांना कडक सुरक्षा पुरवण्यात येणार होती. तसेच स्थानिक काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या आदरातिथ्याची आणि देखरेखीची जबाबदारी स्वीकारली होती. मतदान प्रक्रिया संपेपर्यंत आमदारांना इतरत्र कुठेही न पाठवता येथेच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्यसभा निवडणुकीच्या दिवशी या सर्व आमदारांना बेंगळूरहून थेट मध्य प्रदेशात परत नेले जाण्याची योजना होती. मात्र, तत्पूर्वीच काँग्रेसची फजिती झाली आहे.

Advertisement
Tags :

.