नंदगड येथील जलाशय भरला तुडुंब
वार्ताहर/नंदगड
गेल्या अनेक दिवसांपासून नंदगड भागात दमदार पाऊस पडत आहे. मुसळधार पाऊस पडल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे नंदगड गावच्या पश्चिमेला असलेला जलाशय पूर्णपणे पाण्याने भरला असून बुधवारपासून अतिरिक्त पाणी बाहेर जाताना दिसत आहे. हे पाणी पाहण्यासाठी नंदगड व परिसरातील लोकांची गर्दी वाढत आहे. नंदगड गावच्या पश्चिमेला तत्कालीन आमदार बसप्पाण्णा आरगावी यांच्या प्रयत्नाने शासनाच्यावतीने जलाशय बांधण्यात आला आहे. याला नंदगडचा डॅम म्हणून ओळखण्यात येतो. याच जलाशयाच्या बांधाजवळून नंदगड डोंगरावरील दुर्गादेवीच्या मंदिराला जाण्यासाठी वाट आहे. या जलाशयाच्या पाण्याचा उपयोग नंदगड, कसबा नंदगड, भुत्तेवाडी, चन्नेवाडी परिसरातील शेतीसाठी होतो.
पर्यटकांचा लोंढा वाढला
जलाशयातील अतिरिक्त पाणी जाण्यासाठी उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या अतिरिक्त पाणी वाहत असल्याने या पाण्यात अंघोळ करण्यासाठी अनेक जण येथे येताना दिसत आहेत. इतर अनेक ठिकाणच्या धबधब्यांवर बंदी घालण्यात आल्यामुळे आता लोक नंदगडच्या अतिरिक्त पाण्याचा आनंद घेण्यासाठी येत आहेत.