सावंतवाडी टर्मिनसचे उर्वरित काम केंद्राच्या अमृत भारत स्थानक योजनेतून करावे
कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे मिहिर मठकर आणि भूषण बांदिवडेकर यांचे प्रतिपादन.
सावंतवाडी
गेली अनेक वर्षे सावंतवाडी येथे प्रस्तावित रेल्वे टर्मिनसचे काम अर्धवट स्थितीत आहे ते पूर्ण होण्याबरोबरच येथे अजून एक प्लॅटफॉर्म व्हावा, पाणी भरण्याची सोय व्हावी जेणेकरून येथून अधिकच्या गाड्या या ठिकाणावरून सोडता येतील, अशी विविध प्रवासी संघटना आणि स्थानिक जनतेची मागणी आहे. त्यामुळे सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे उर्वरित असलेले काम केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी असलेल्या अशा अमृत भारत स्थानक योजनेतून करावे असे प्रतिपादन कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे मिहिर मठकर आणि भूषण बांदिवडेकर यांचे प्रतिपादन यांनी केले आहे .
२३ डिसेंबर २०२२ ला रेल्वे मंत्रालयाने अमृत भारत स्थानक योजना जाहीर केली, ही योजना रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी दीर्घकालीन दृष्टिकोनातून तयार केली आहे.यामध्ये त्या त्या स्थानकांचा आराखडा तयार करणे आणि त्याला टप्प्याटप्प्याने अंमलात आणणे हे समाविष्ट आहे. यामध्ये स्थानकात पुरेशी आगमन निर्गमन व्यवस्था, अद्यावत प्रतीक्षालय, शौचालय, लिफ्ट, आवश्यकतेनुसार सरकते जिने,मोफत वाय-फाय सुविधा, स्थानिक उत्पादनांसाठी किओस्कची स्थापना आणि एक स्थानक एक उत्पादन या योजनेचे स्टॉल्स, प्रवासी माहिती प्रणालींचा विकास,व्यवसाय बैठकीसाठी जागा निश्चित करणे,आणि प्रत्येक स्थानकाच्या विशेष आवश्यकतांची पूर्तता करणे, आवश्यकतेनुसार नवीन प्लॅटफॉर्मची बांधणी, त्यावर असणारा निवारा, फूट ओवर ब्रीज आदी कामांचा समावेश आहे. याच बरोबर, या योजनेत स्थानकांच्या संरचनांचे अद्ययावतन करणे, स्थानकांना दोन्ही बाजूंना शहरी भागांशी जोडणे, बहु-उद्देशीय कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन देणे, अपंग व्यक्तींसाठी (दिव्यांगजन) सुविधा प्रदान करणे, शाश्वत आणि पर्यावरणपूरक उपाययोजना लागू करणे, बॅलास्टलेस ट्रॅकची बांधणी करणे, आवश्यकतेनुसार रूफ प्लाझाचे बांधकाम आदी कामांवर जोर दिला आहे.अंतिम उद्दिष्ट म्हणजे या स्थानकांना दीर्घकालीन दृष्टिकोनातून शहरी केंद्रांमध्ये रूपांतरित करणे आहे.
कोकण दुर्लक्षितच..!
२५ हजार कोटींच्या या योजनेत देशभरातील एकूण १२७५ स्थानकाचा समावेश करण्यात आला परंतु, दुर्दैवाने कोकणातील एकाही स्थानकाचा समावेश या योजनेत करण्यात आला नाही. कोकण रेल्वे मार्गावरील गोव्यातील मडगाव आणि काही महिन्यांनी कर्नाटक येथील लोक प्रतिनिधी आणि प्रवाशांचा हट्टापायी उडुपी स्थानकाचा समावेश या योजनेत करण्यात आला.
परंतु कोकणच्या वाट्याला पाने पुसली गेली. कोकण रेल्वे महामंडळ संचलित या कोकण रेल्वे मार्गावरील मुख्यत्वे कोकणातील स्थानकाचा समावेश या योजनेत न करणे हे कुठेतरी क्लेशदायक आहे अशी भावना मुंबई स्थित कोकणी चाकरमानी आणि कोकणवासीय व्यक्त करत आहेत, त्यामुळे हे महामंडळ नकोच अशी धारणा येथील जनतेमध्ये झाली आहे. हे महामंडळ भारतीय रेल्वेत विलीन करा अशी मागणी जनतेमधून होत आहे.
सावंतवाडी टर्मिनसचा समावेश या योजनेत व्हावा
गेली अनेक वर्षे सावंतवाडी येथे प्रस्तावित टर्मिनस चे काम अर्धवट स्थितीत आहे. येथे अजून एक प्लॅटफॉर्म व्हावा, पाणी भरण्याची सोय व्हावी जेणेकरून येथून अधिकच्या गाड्या या ठिकाणावरून सोडता येतील, अशी विविध प्रवासी संघटना आणि स्थानिक जनतेची मागणी आहे.प्लॅटफॉर्म ३ हा टर्मिनस प्लॅटफॉर्म असून या ठिकाणाहून फक्त तुतारी एक्सप्रेस सोडण्यात येते. तसेच या एक्स्प्रेसची साफसफाई देखील याच प्लॅटफॉर्म वर केली जाते, ही गाडी दिवसभर या प्लॅटफॉर्म वर उभी ठेवली जाते. त्यामुळे या ठिकाणाहून अधिकच्या गाड्या सोडण्यावर बंधने आहेत. यासाठी या ठिकाणी अजून एक प्लॅटफॉर्म ची नितांत आवश्यकता आहे जेणेकरून अतिरिक्त गाड्या सोडण्याची क्षमता वाढली जाईल. वरील कारणांमुळे सावंतवाडी स्थानकाचा समावेश हा केंद्राचा अमृत भारत स्थानक योजनेत करून या ठिकाणी टर्मिनस बिल्डिंग, नवीन प्लॅटफॉर्म, परिपूर्ण शेड, सरकते जिने,आवश्यकते नुसार लिफ्ट, नवीन टर्मिनस लाइन, सध्याचा ब्रीज चा विस्तार, आदी कामांना या योजनेतून थेट केंद्राचा निधी मिळेल. या साठी आपले खासदार, आमदार यांनी याचा आवश्यक तो पाठपुरावा करावा ही कोकणवासियांची अपेक्षा, जेणेकरून भविष्यात कोकणसाठी स्वतंत्र गाड्या सोडण्यात येतील.त्यामुळे सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे उर्वरित असलेले काम केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी असलेल्या अशा अमृत भारत स्थानक योजनेतून करावे असे प्रतिपादन कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे मिहिर मठकर आणि भूषण बांदिवडेकर यांचे प्रतिपादन यांनी केले आहे .