नंदगड महालक्ष्मी यात्रेच्या धार्मिक विधींना सुरुवात
वार्ताहर/हलशी
पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या नंदगड येथील महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी गाऱ्हाणे घालून वार पाळून धार्मिक विधीना सुरुवात करण्यात आली. यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष व पदाधिकारी पाटील, बनकरी, हक्कदार, वतनदार, पंचमंडळी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला श्री कलमेश्वर मंदिर, श्री सातेरी माउली देवस्थान, दुर्गादेवी मंदिर, लक्ष्मी देवस्थान, श्री मरेव्वा मंदिर व श्री रवळनाथ मंदिर येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत गाऱ्हाणा कार्यक्रम पार पडला. यानंतर गावच्यावतीने नैवेद्य ठेवण्यात आले. 30 ऑक्टोबरपर्यंत मंगळवार आणि शुक्रवार असे पाच वार पाळण्यात येणार आहेत. त्यानंतर धार्मिक विधीच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. दि. 12 फेब्रुवारी 2025 रोजी महालक्ष्मी यात्रेला सुरुवात होणार आहे. 24 वर्षानंतर यात्रा होत असल्याने नंदगड गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वजण यात्रेच्या तयारीत गुंतलेले आहेत. ही यात्रा भव्य प्रमाणात साजरा करण्यासाठी यात्रा कमिटीचे जोरदार नियोजन सुरू आहे.