देवसू शेंडोबा माऊली मंदिरात नवचंडी व दत्तयाग यज्ञ जपाला प्रारंभ
उद्या धार्मिक सोहळ्याची होणार सांगता
ओटवणे प्रतिनिधी
देवसू गावचे ग्रामदैवत शेंडोबा माऊली मंदिरात गुरुवारपासून धार्मिक सोहळ्यास विधिवत प्रारंभ झाला असुन शुक्रवारी नवचंडी व दत्तयाग यज्ञ जपाला ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात प्रारंभ झाला. तीन दिवसांच्या या धार्मिक सोहळ्याची सांगता शनिवारी २६ एप्रिल रोजी होणार आहे.या धार्मिक सोहळ्यासाठी शेंडोबा माऊली मंदिरात केसरी येथून येथील स्वयंभू मंदिरातुन सवाद्य मिरवणुकीने तरंग काठीसह पालखी व देवतांचे आगमन झाले. गुरुवारी सकाळी देवसु पंचक्रोशीतील शिमधड्यांचे विधिवत स्वागत करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी देवतांना नारळ ठेऊन आणि गणपती पूजनाने या धार्मिक सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर स्वस्तिवाचन, राक्षोघ्न विधान धार्मिक कार्यक्रम झाले. शुक्रवारी सकाळी प्रायश्चित्त विधी, पुण्यहवाचन, देवता स्थापना, दत्त याग आणि नवचंडी जपाला प्रारंभ झाला. दुपारी महाआरती, आटोपल्यानंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. गावात प्रथमच हा धार्मिक सोहळा होत असल्यामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण आहे. या उत्सवासाठी ग्रामदैवत शेंडोबा माऊलीला भरजरी वस्त्रांसह आकर्षक फुलांनी सजविण्यात आले होते. तसेच भाविकांच्या सोयीसाठी मंदिरासभोवताली भव्य सभा मंडप उभारण्यात आला. भाविकांनी सकाळपासूनच मंदिरात गर्दी केली होती. आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिराचा परिसर उजळून गेला. तसेच गावातील धार्मिक क्षेत्रात पताका लावल्यामुळे संपूर्ण गावात भक्तीमय वातावरण होते. चाकरमानीही या उत्सवासाठी आले. भाविकांच्या गर्दीने मंदिराचा परिसर गजबजुन गेला.
शनिवारी होणार सांगता
शनिवार २६ एप्रिल रोजी मंदिरात सकाळी ८ वाजल्यापासून प्राकार शुद्धी, स्थापित देवता पूजन, कुंकूमार्जन, कुमारिका पूजन दत्तयाग व नवचंडी यज्ञ, बलिदान (पायस कुष्मांड) पूर्णाहूती, अभिषेक, आशिर्वाद नैवेद्य, आरती महाप्रसाद त्यानंतर दुपारी २ वाजल्यापासून देवीची ओटी भरण्यास प्रारंभ होणार आहे. रात्री १० वाजता सांस्कृतीक कार्यक्रम होणार आहेत.शनिवारी या धार्मिक सोहळ्याची सांगता होणार असून समस्त भाविक भक्तांनी या धार्मिक सोहळ्यात उपस्थित राहून देवतांचा कृपाशीर्वाद घ्यावा असे आवाहन देवसू, दाणोली, केसरी या तीन गावच्या गाव मर्यादा व या तीन गावच्या ग्रामस्थांनी केले आहे.