For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘किंग मोमो’ ची राजवट सुरू!

07:42 AM Mar 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘किंग मोमो’ ची राजवट सुरू
Advertisement

राजधानीत कार्निव्हलचा जल्लोष

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

कार्निव्हलच्या आयोजनाने राज्यात शनिवारपासून ‘किंग मोमो’ ची राजवट सुरू झाली आहे. ‘खा, प्या, मजा करा’, असा संदेश देत किंग मोमो ने पणजीतून पहिल्या मिरवणुकीची सुरूवात केली. हजारो लोकांनी चित्ररथ मिरवणुकीतील भव्यता आणि कलाकारांच्या नृत्याचा अविष्कार यांचा जल्लोषी वातावरणात अनुभव घेतला.

Advertisement

गोवा पर्यटन खात्यातर्फे आयोजित या कार्निव्हल महोत्सवाची काल शनिवार दि. 1 मार्चपासून सुरूवात झाली. पहिली मिरवणूक पणजीत मांडवी किनारी पार पडली. त्यासाठी दिवजा सर्कल, सांता मोनिका जेटी, जुने सचिवालय ते कला अकादमीपर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गांवरून वळविण्यात आली होती.मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दुपारी बावटा दाखवून चित्ररथ मिरवणुकीला सुऊवात केली. त्यावेळी अभिनेत्री वर्षा उसगांवकर, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, महापौर रोहित मोन्सेरात यांच्यासह पर्यटन महामंडळ आणि पर्यटन खात्यातील अधिकारी उपस्थित होते.

यंदाच्या कार्निव्हलमध्ये गोंयकारपणाची गौरवशाली व वैभवशाली परंपरा दर्शविणारे एकापेक्षा सरस चित्ररथ पाहण्यास मिळाले. त्यात खास करून लक्षवेधी ठरले ते  गोव्यातील पारंपरिक व्यवसाय तसेच कला आणि संस्कृतीचे दर्शविणारे पोदेर, कार्रेर, काजू मळणी, फेणी भट्टी, रेंदेर, मासळी विक्रेती, कुणबी यांचा समावेश असलेले चित्ररथ. त्याशिवाय अभियांत्रिकी-शैक्षणिक संस्थांचे चित्ररथ, तसेच भारतीय नौदलाचे संचालन आणि त्यांचा चित्ररथ, पोलीस, अग्निशामक दल, आरोग्य खाते, रेबीज मिशन, डोनेट ऑर्गन आदींचे सामाजिक संदेश देणारे चित्ररथही दिसून आले. मिरवणुकीत सुमारे 50 चित्ररथ सहभागी झाले होते. त्याशिवाय वेशभूषा स्पर्धेमध्ये असंख्य कलाकारांनी भाग घेतला. मिरवणुकीदरम्यान या कलाकारांनी नृत्याचा अविष्कार घडविला. स्थानिकांसह देशी विदेशी पर्यटकांनी चित्ररथ मिरवणुकीत सहभाग घेऊन मनसोक्त आनंद लुटला.

यंदा पर्वरीत कार्निव्हल मिरवणूक नाही

पर्वरी भागात उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असल्याने तेथील वाहतूक व्यवस्थेवर जादा ताण पडण्याची शक्यता गृहित धरून यंदा तेथे कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले नाही. त्यामुळे काल 1 मार्चपासून राज्यात कार्निव्हलची सुऊवात झाली. आज दि. 2 रोजी मडगाव, उद्या दि. 3 रोजी वास्को आणि दि. 4 रोजी म्हापसा व मोरजी येथे कार्निव्हल चित्ररथ मिरवणूक व अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :

.