आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण करणार
आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव यांची माहिती, 1,500 डॉक्टरांची होणार नियुक्ती
बेळगाव : राज्यातील समुदाय आरोग्य केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे व तालुका इस्पितळातील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, फार्मासिस्ट पदांसाठी महिनाभरात भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडूराव यांनी दिली. गुरुवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात कुष्टगीचे आमदार दोड्डण्णगौडा पाटील यांच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना दिनेश गुंडूराव म्हणाले, आरोग्य खात्यात 337 तज्ञ वैद्य, 250 सामान्य कर्तव्य वैद्याधिकाऱ्यांची कंत्राटी पद्धतीवर नेमणूक करण्यासाठी परवानगी दिली आहे. सरकारी कोट्यामध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या डॉक्टरांना एक वर्ष सरकारी रुग्णालयांत सेवा सक्तीची आहे. या नियमांतर्गत 1,500 डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
आरोग्य खात्यात मंजूर झालेल्या व सध्या रिक्त असलेल्या 120 तज्ञ डॉक्टर व 100 सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकाऱ्यांची थेट भरती करून घेण्यासाठी अर्थ खात्याने संमती दिली आहे. ही प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. तज्ञ डॉक्टरांच्या नियुक्तीसंबंधी न्यायप्रविष्ट असलेला विषयही अंतिम टप्प्यात आहे. लवकरच त्याचा निकाल लागणार आहे, असे दिनेश गुंडूराव यांनी सांगितले. राज्यात 600 सुश्रुषा अधिकारी व 400 कनिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, 400 फार्मासिस्ट भरती करून घेण्यात येत आहेत. जेथे गरज आहे तेथे कौन्सिलिंगच्या माध्यमातून भरती प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करण्यात येणार आहे. विविध खात्यात सेवा बजावत असलेले आरोग्य खात्याचे डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांच्या इतर खात्यातील नियुक्त्या रद्द करून त्यांना आरोग्य खात्याला बोलावून घेण्यात येणार आहे, असेही दिनेश गुंडूराव यांनी सांगितले.
इस्पितळांची संख्या वाढवणार
सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी जेथे जेथे प्राथमिक आरोग्य केंद्र, समुदाय आरोग्य केंद्रे नाहीत, तेथे ते सुरू करण्यासंबंधी राष्ट्रीय आरोग्य निकषांनुसार शास्त्राrय पद्धतीने अध्ययन करून अहवाल सादर करण्यासाठी डॉ. हिमांशू भूषण यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. शिरहट्टीचे आमदार डॉ. चंद्रू लमाणी यांच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली असून डॉ. हिमांशू भूषण यांच्या मार्गदर्शनानुसार पहिल्या टप्प्यात कल्याण कर्नाटक भागात इस्पितळांची संख्या वाढवण्यात येणार आहे, असेही मंत्री दिनेश गुंडूराव यांनी सांगितले.