For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेसच्या पराभवाचे कारण अहंकार !

06:25 AM Oct 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेसच्या पराभवाचे कारण अहंकार
Advertisement

मित्रपक्षांकडूनच घराचा आहेर, विरोधी पक्षांच्या आघाडीतील खदखद झाली उघड

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव त्या पक्षाच्या नेतृत्वाचा अहंकार आणि अतिआत्मविश्वास या कारणांमुळे झाला आहे, असा ‘घराचा आहेर’ काँग्रेसच्या मित्रपक्षांकडून करण्यात आला आहे. हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या दोन प्रदेशांच्या विधानसभा निवडणुकीची मतगणना मंगळवारी पार पडली. हरियाणात सलग तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळवली आणि काँग्रेसचा दारुण पराभव केला. जम्मू-काश्मीरमध्ये मात्र नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांच्या युतीने पूर्ण बहुमत प्राप्त केले. हरियाणातील काँग्रेसच्या पराभवामुळे तो पक्ष आता त्याच्याच मित्रपक्षांकडून लक्ष्य केला जाऊ लागला आहे.

Advertisement

हरियाणा निवडणुकीतील पराभव स्वीकारण्यास काँग्रेसने नकार दिला असून पराभवाचे खापर इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रे आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांच्यावर फोडले आहे. मात्र, काँग्रेसच्या मित्रपक्षांनी या पराभवाला काँग्रेस स्वत:च जबाबदार आहे, असा आरोप केला आहे. ‘अतिआत्मविश्वास बरा नव्हे. आमच्याशी युती केली असती तर अशी वेळ आली नसती,’ अशी प्रतिक्रिया आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल आणि राघव चढ्ढा यांनी व्यक्त केली.

तृणमूलचा चौफेर हल्ला

तृणमूल काँग्रेसने काँग्रेसवर जोरदार टीका केली. अहंकार, स्वबळाचा गर्व आणि प्रादेशिक पक्षांना कमी लेखणे, ही काँग्रेसच्या पराभवाची कारणे आहेत. जेव्हा एखादा पक्ष अशी वृत्ती दाखवितो, तेव्हा त्याच्या वाट्याला पराभवाशिवाय दुसरे काही येत नाही. ज्या राज्यांमध्ये आम्ही विजयी होत आहोत, तेथे आम्ही मित्रपक्षांना सोबत घेणार नाही. पण जेथे आम्ही कमजोर आहोत, तेथे मित्रपक्षांनी आम्हाला सोबत घेतले पाहिजे, अशी काँग्रेसची भूमिका असते. हीच भूमिका काँग्रेसचा घात करत आहे, असा इशारा तृणमूल काँग्रेसने दिला आहे.

धोरणांचा फेरविचार करा

काँग्रेसने आपल्या धोरणांचा फेरविचार करावा. कारण ज्या राज्यांमध्ये काँग्रेसचा भारतीय जनता पक्षाशी थेट संघर्ष होतो, तेथे काँग्रेस पक्षाला हार पत्करावी लागते, अशी टीका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी केली आहे. हरियाणात भारतीय जनता पक्षाने कष्टाने विजय मिळविला. काँग्रेसचा घात मात्र अहंकाराने केला. हरियाणातील पराभवानंतरही महाराष्ट्रात काँग्रेसला स्वतंत्र लढायचे असेल तर त्या पक्षाने तशी भूमिका घोषित करावी, असा खोचक सल्ला याच पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही दिला आहे.

अखिलेश यादव यांचीही टीका

हरियाणाच्या अहीरवाल भागात काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. या भागात आम्हाला काही जागा काँग्रेसने सोडल्या असत्या, तर चित्र वेगळे दिसले असते. आम्ही आधी तसे स्पष्ट केले होते. पण काँग्रेसने आमच्या मताचा विचार केला नाही. त्यामुळे ही वेळ आली आहे, अशी टीका अखिलेश यादव यांनी केली.

काँग्रेसला स्वत:च्या घरचाही आहेर

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री मार्गारेट अल्वा यांनीही काँग्रेसला धारेवर धरले आहे. काँग्रेसने हरियाणातल्या सर्व समाजांना जोडून घेतले नाही. केवळ एकच समाज आणि दोन नेते यांच्यावर भिस्त ठेवली. माझ्यावर जेव्हा हरियाणाच्या प्रभारी पदाचे उत्तरदायित्व होते, तेव्हा काँग्रेसला 2004 आणि 2009 च्या निवडणुकांमध्ये सलग दोनदा विजय मिळाला होता, असे त्यांनी स्पष्ट केले. हरियाणातील काँग्रेसच्या दलित नेत्या कुमारी सेलजा यांनीही काँग्रेस नेते भूपिंदर हुड्डा यांच्यावर अप्रत्यक्ष शरसंधान केले. या पराभवाला कोण जबाबदार आहे, याचा  शोध पक्षश्रेष्ठींनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी पराभवानंतर केले आहे.

Advertisement
Tags :

.