For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साक्षात ‘यमराज’ शिकविताहेत नियम

06:22 AM Jan 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
साक्षात ‘यमराज’ शिकविताहेत नियम
Advertisement

झारखंड राज्याच्या जमशेदपूर शहरात वाहतूक प्रशासन लोकांना वाहतुकीचे नियम शिकविण्यासाठी आणि लोकांचे प्रबोधन करण्यासाठी एक अनोखा प्रयोग करत आहे. विशेषत: दुचाकी चालविणाऱ्यांनी शिरस्त्राण, अर्थात, हेल्मेट परिधान करणे किती आवश्यक आहे, हे समजावण्यासाठी प्रत्यक्ष ‘यमराजां’नाच पाचारण करण्यात आले आहे. हे यमराज भर मार्गात लोकांना हेल्मेटसंबंधी जागरुक करत असतात. ‘अगर हेल्मेट नही पहनोगे, तो तुम्हे मै आपने साथ ले जाऊंगा’ असा स्पष्ट इशारा हे यमराज हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांना देताना दिसतात.

Advertisement

हे अभियान या शहरातील पोलिस आणि वाहतूक अधिकारी यांनी संयुक्तरित्या चालविलेले आहे. यमराजांची भूमिका आशुतोष नामक व्यक्तीकडे देण्यात आली आहे. हे आशुतोष यमराजाच्या पौरणिक वेषभूषेत मार्गांवरुन संचार करतात. त्यांच्या हाती एक गदाही देण्यात आली आहे. पौराणिक चित्रपटांमध्ये जशी यमराजांची वेषभूषा असते, तशीच या यमराजांचीही असते. या आधुनिक यमराजांच्या समवेत अर्थातच वाहतूक पोलीस अधिकारी आणि कॉन्स्टेबलही असतात. हे यमराज हेल्मेट न परिधान केलेल्या दुचारीस्वारास आडवतात आणि त्याला थोडक्यात हेल्मेटचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करतात. ‘हेल्मेट नही पहनोगे, तो मेरे साथ आना होगा’ असा संदेश हे यमराज या स्वाराला देतात.

हे अभियान आतापर्यंत बऱ्यापैकी यशस्वी झाले आहे, असा अधिकाऱ्यांचा अनुभव आहे. यमराजांच्या संबंधी आजही लोकांच्या मनात भीती असते. यमराज ही मृत्यूची देवता मानली जाते. साक्षात यमराज जेव्हा नियम मोडणाऱ्या दुचाकी स्वारांना गाठून त्यांना इशारा देतात तेव्हा तो त्यांच्या मनावर परिणाम करणारा ठरतो, असे दिसून आले आहे. मार्गांवर हेल्मेटधारी दुचाकीस्वारांची संख्या वाढली, तर अपघातात गंभीर जखमी होणाऱ्यांचे किंवा अपघाती मृत्यूचेही प्रमाण पुष्कळसे कमी होईल, असा या अधिकाऱ्यांचा कयास आहे. त्यामुळे हा प्रयोग यापुढेही अनेक दिवस करत राहण्याचा निर्णय जमशेदपूरच्या प्रशासनाने घेतला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.