खऱ्यांची दुनिया ?
आज शाळेत बाईंनी ‘नेहमी खरे बोलावे’ असं वाक्य पटवून दिलं. अगदी पाठ सुद्धा करून घेतलं. खरं बोलणारे लोक देवाला पण किती आवडतात अशा अनेक कथाही सांगितल्या. मी अगदी मनाशी ठरवूनच घर गाठलं आणि आईला शाळेतून आल्या आल्या सगळ वृत्तांत सांगितला. श्यामच्या आईच्या गोष्टीतले प्रसंग महात्मा गांधींचे ‘माझे सत्याचे प्रयोग’ अशा कितीतरी गोष्टी शाळेत ऐकल्यामुळे माझं अगदी नक्की ठरलं होतं, नेहमी खरं बोलायचं. त्यातच एक टीव्हीवर मालिका सुरू झाली होती. ‘चिमणरावांचा स्पष्टवत्तेपणा’ मला ती फार आवडायची अगदी त्यांच्या बोलण्यामुळे अनेकांची कशी पंचाईत व्हायची, भांडणं लागायची, अगदी गोंधळ निर्माण व्हायचे, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा सात्विक भाव, निष्पापपणा मनाला अगदी भावून जायचा. त्यामुळेच मी पण मनोमन सत्याच्या मार्गावर चालायचंच असं ठरवलं.
घरात मात्र माझे बाबा फोनवर बोलतांना समोरच्याला चक्क खोटं सांगायचे, की मी आता दिल्लीहून बोलतोय म्हणून.. पुढच्या आठवड्यात आल्यानंतर तुमचे पैसे देईन.. मला अगदी राग यायचा बाबांचा. पैसे नाहीतर नाही म्हणून सांगायचं ना.. पण खोटं कशाला बोलायचं .? ताईचंसुद्धा तेच. एका मैत्रिणीकडे जाताना दुसरीला कळायला नको म्हणून काय काय कारणं आणि खोटं सांगायची? तिचं तिलाच ठाऊक ...दादा तर या सगळ्यात तज्ञच... कोणाला काय थाप मारायची आणि हसून कसं साजरं करायचं हे त्यालाच कळो जाणे. पण खोटं बोलून शेंड्या कशा लावायच्या हे त्याच्याकडून मात्र आवर्जून शिकण्यासारखं आहे. मी शेवटी कंटाळून आजीकडे गेले तर आजी या सगळ्यांची गुरु निघाली.... काल केलेले लाडू कुठे ठेवलेत? असं आजोबांनी विचारलं तर.. सरळ संपलेत म्हणाली. मी रात्री सहजच तिच्या खोलीत कपाट उघडून काहीतरी बघायला गेले ..तर तो लाडूचा डबा तिने पातळाच्या मागे लपवून ठेवलेला होता. मी तिच्यावर चिडलेच तेव्हा ती समजावत म्हणाली...,अगं आजोबांना डायबिटीस आहे त्यांना सारखे येताजाता गोड खाऊ नका म्हणून रागवावं लागतं. त्यांनीच ते खाल्लं तर त्रास होईल की नाही? म्हणून मी खोटं बोलले.
आता तिचं म्हणणं मला थोडंसं पटलं पण माझ्या मनात खरं बोलण्याचा गोंधळ आता वाढत चालला. खरं बोलावं की खोटं बोलावं, कोणच्या वेळेला खोटं बोलावं, कधी बोलू नये असे अनेक विचार तरंग मनात उठत असतानाच मी तशीच झोपी गेले. सकाळी उठायला थोडा उशीर झाला. इतक्यात दारावरची बेल वाजली म्हणून आईने आतूनच ओरडून सांगितलं की अगं झोपलीस काय उठ, दार उघड आणि हो त्या शेजारच्या काकू जर उसनं मागायला आल्या असतील तर त्यांना मी घरात नाही असं सांग. झोपेतच दार उघडलं. शेजारच्या काकू समोर वाटी घेऊन उभ्या होत्या. मी त्यांना सरळ सांगितलं ...आईने सांगितलंय.. आई घरात नाही म्हणून सांग...काकू जोरात तोंड वाकडं करून ठसक्यात निघून गेल्या. मला काही कळलच नाही असं काय करताहेत त्या. मी दार लावून आत वळणार इतक्यात आईने धापकन पाठीमध्ये जोराचा धपाटा घातला. आता मी नेमकं काय चुकले हे अजून माझं मलाच काही कळलं नव्हतं. पण मग लक्षात आलं की आपण खरं बोलण्याचा प्रयोग इथे केल्यामुळे, जशाच्या तसा निरोप सत्यपणाने दिल्यामुळे त्याचं फळ तात्काळ मिळालेले आहे. आणि त्याच क्षणी मी ठरवलं आपण अजिबात खरे बोलायचं नाही... हा विचार मनामध्ये मी नक्की करून टाकला आणि खोटं बोलण्याच्या क्लासची चौकशी करायला आईला खोटं कारण सांगून निघून गेले.