‘बेटी बचाओ’चे वास्तव चिंताजनक
जिह्यात 0 ते 6 वयोगटातील दर हजारी मुलांमागे 934 मुली
सधन असलेल्या करवीर तालुक्यात सर्वात कमी 906 मुली
राधानगरी, कागल, आजरा, गगनबावड्यात मुलींचे कमी प्रमाण
आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष मुलींचे प्रमाण आणखी कमीची शक्यता
कोल्हापूरः कृष्णात चौगले
फुलेवाडी आणि जोतिबा डोंगर येथे अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या औषधांची विक्री केली जात असल्याच्या संशयावरून प्रशासनाने बोगस डॉक्टरांसह तिघांना ताब्यात घेतले. गर्भलिंगनिदान प्रकरणी तिघांना अटक केली असली तरी जिह्यात गर्भातच कळ्या खुडणारे शेकडो मोकाटच आहेत. प्रशासनाकडून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’च्या घोषणा दिल्या जात असल्या तरी जिह्यातील वास्तव चिंताजनक आहे. गेल्या 11 महिन्यांतील आकडेवारी पाहता मुलींच्या घटत्या जन्मदराचे गांभीर्य दर्शवत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून सुरु असलेली जनजागृती कमी पडते का, असा प्रश्न निर्माण होत आहे.
गेल्या काही वर्षांपासून मुलींच्या जन्मदरात घसरण सुरु आहे. याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाकडून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ‘चा उपक्रम राबवला जात आहे. पीसीपीएनडीटी कायदा आणि धडक मोहिमा राबवून स्त्राr भ्रुणहत्या रोखण्याचा प्रयत्न सुरु आहे. तरीही कायद्यातून पळवाटा काढत दुर्गम भागात गर्भलिंगनिदान आणि स्त्राr भ्रूणहत्यांचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यामुळे भविष्यात मुलींचा जन्मदर वाढण्याऐवजी कमी होण्याची शक्यता आहे. दर हजारी मुलांमागे मुलींच्या आकडेवारीमध्येही किती वास्तवता आहे? हा संशोधनाचा विषय आहे.
ओसाड माळ अन् सांकेतिक भाषा
पोर्टेबल सोनोग्राफी मशिनद्वारे शेतघर, दुर्गम भागातील रस्त्यावर चारचाकी गाडी थांबवून त्यामध्येच तपासणीची प्रक्रिया पूर्ण केली जाते. तपासणीमध्ये मुलगा किंवा मुलगी, हे सांगण्यासाठी सांकेतिक भाषा आणि संख्येचा वापर केला जातो. पहाटे अथवा रात्री संबंधित गर्भवतीला येण्यास सांगितले जाते. विशेषत: ज्या गर्भवतीची तपासणी करायची आहे, तिला एकटीलाच नेले जाते. तिच्यासोबत तिचा पती अथवा इतर कोणत्याही नातेवाईकास येण्यासाठी मज्जाव केला जातो. रस्त्यावर गाडी थांबवून गर्भलिंग निदानाचा गोरखधंदा केला जातो. तपासणापूर्वीच संबंधितांकडून पैसे घेतले जातात. यामध्ये केवळ गर्भलिंग निदान करण्यासाठी सुमारे 15 ते 20 हजार रूपयांचा दर आहे. तर तपासणीनंतर स्त्री भ्रुणहत्येसाठी पुन्हा सुमारे 20 हजारांचे गणित घातले जाते.
तर अवैध गर्भलिंग निदान दुसऱ्या मार्गाने
गर्भलिंग तपासणीवर आळा घालण्यासाठी 2012-13 मध्ये एन.आर.एच.एम अंतर्गतपी.सी.पी.एन.डी.टी.सेलची स्थापना करण्यात आली. या सेलमार्फत जिल्ह्यातील प्रत्येक सोनोग्राफी सेंटरची 3 महिन्यातून एकदा तपासणी करून तेथे आढळणाऱ्या त्रुटीबाबत सुचना दिल्या जातात. काही गंभीर बाब आढळल्यास कारवाईदेखील केली जाते. साधारणपणे 14 आठवड्यांत गर्भाचे लिंग लक्षात येत असल्यामुळे सेलमार्फत सोनोग्राफी सेंटरवरील तपासणी केलेल्या गर्भवतींची संबंधित आरोग्य केंद्रास सेलमार्फत माहिती दिली जाते. त्यानुसार गर्भवतीच्या प्रसुतीपर्यंत त्या केंद्रातील कर्मचाऱ्यांनी लक्ष ठेवणे बंधनकारक केले आहे. पण या तपासणीमध्ये आजतागायत एकही गैरकारभार आढळलेला आही. अनोंदणीकृत सोनोग्राफी मशिनद्वारे शेकडो स्त्राrभ्रुण हत्या होत असल्यामुळे कायद्याची वाटचाल एका मार्गाने व अवैध गर्भलिंग करणारे दुसऱ्या मार्गाने अशी अवस्था आहे.
बोगस डॉक्टर आणि एजंटांचे जाळे
बोगस डॉक्टर, एजंटांची साखळी असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण एका टोळीवर कारवाई झाली म्हणजे स्त्राrभ्रुणहत्या थांबणार नाही. कारण असे बोगस डॉक्टर आणि एजंटांची जिल्हाभर साखळी आहे. या गैरकृत्यामध्ये जलद आणि मुबलक पैसे मिळत असल्यामुळे अनेक अन्य वैद्यकीय शाखा पदवीधारकांनीही हा काळा धंदा सुरु केला आहे. गर्भलिंगनिदान करणारे बोगस डॉक्टर आणि एजंट मालामाल झाले आहे. रोज दोन ते तीन सावज शोधून त्यांची तपासणी करून काही तासांत लाखांची कमाई होत असल्यामुळे या टोळीतील कारभाऱ्यांची जीवनशैली एखाद्या उच्चपदस्थाला लाजवेल, अशी आहे.
0 ते 6 वयोगटातील मुलामुलींचे प्रमाण (जानेवारी ते नोव्हेंबरअखेर)
तालुका दर हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण
चंदगड 961
हातकणंगले 961
गडहिंग्लज 952
शाहूवाडी 947
शिरोळ 938
भुदरगड 929
पन्हाळा 929
गगनबावडा 920
आजरा 917
कागल 915
राधानगरी 914
करवीर 906
एकूण 934