Kolhapur : मावळत्या सूर्याची किरणे अंबाबाईच्या कानापर्यंत!
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात किरणोत्सवास प्रारंभ
कोल्हापूर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री अंबाबाईच्या किरणोत्सवाला प्रारंभ झाला असून रविवारी किरणाच्या मध्ये ढगाचा अडथळा नसलेने अंबाबाई मंदिरात दक्षिणायन किरणोत्सव सोहळा पार पडला.
सोनेरी किरणाने ०५:०५ मिनिटांनी मंदिर द्वारातून प्रवेश करून ०५:४७मिनिटांनी देवीच्या डाव्या कानापर्यंत पोहोचून हळूहळू लुप्त झालीत त्यानंतर मंदिरामध्ये देवीची आरती होऊन हा सोहळा पार पडला.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या वार्षिक किरणोत्सवाला ९ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत असतो तो ११ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहतो. त्याआधी शनिवारी ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.४२ वाजता मावळत्या सूर्यकिरणांनी महाद्वारातून प्रवेश करून देवीच्या चरणांना स्पर्श केला. त्यानंतर हे किरण देवीच्या खांद्यापर्यंत पुढे गेले आणि काही क्षणांत लुप्त झाले होते.
रविवारी सूर्यकिरणांनी मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी गाभाऱ्यातील दिवे बंद करून केवळ दोन समया तेवत ठेवण्याची प्रथा पाळली जाते. किरणोत्सवानंतर देवीची कर्पूरआरती आणि देवळातील घंटानादाने सोहळ्याची सांगता झाली. अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव वर्षातून दोनदा उत्तरायन आणि दक्षिणायन या कालखंडांत साजरा होतो. उत्तरायन ३१ जानेवारी, १ व २ फेब्रुवारी रोजी तर दक्षिणायन ९, १० व ११ नोव्हेंबर रोजी होते.
या दिवसांत मावळत्या सूर्यकिरणांचा प्रवास महाद्वारातून सुरू होऊन प्रथम दिवशी देवीच्या चरणांना, दुसऱ्या दिवशी कमरे पर्यंत आणि तिसऱ्या दिवशी मुखासह संपूर्ण मूर्तीला स्पर्श करतो. पण मागील काही वर्षापासून त्यात बदल झाला असून, दोन दिवस आधी आणि नंतरदेखील हा सोहळा होतो.
श्री अंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मावळतीची सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीच्या खांद्यापर्यंत आली. ठरलेल्या तारखेच्या एक दिवस आधीच म्हणजे शनिवारपासून किरणोत्सवाच्या सोहळ्याला प्रारंभ झाला असून, पुढील दोन दिवसांतच सूर्यकिरणे मूर्तीच्या चेहऱ्यावर येण्याची शक्यता आहे.
सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी मावळतीची सूर्यकिरणे महाद्वारातून अंबाबाई मंदिरात आली. गरूड मंडप, कासब चौक, पितळी उंबरा, चांदीचा उंबरा, संगमरवरी पायरी असा टप्पा पार करत किरणांनी ५ बाजून ४२ मिनिटांनी मूर्तीचा चरणस्पर्श केला. त्यानंतर ५.४५ गुडघ्यापर्यंत, ५.४६ कमरेपर्यंत आली. ५.४७ मिनिटांनी किरणे देवीच्या कानापर्यंत येऊन डावीकडे लुप्त झाली. नंतर आरती झाली व अंबा माता की जयचा गजर झाला.