मावळतीच्या सूर्यकिरणांचा अंबाबाईला मस्तकाभिषेक
कोल्हापूर :
किरणोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी मावळतीची सूर्यकिरणे करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीवर पूर्ण क्षमतेने स्थिरावल्याचा आनंददायी क्षण भाविकांना शुक्रवारी पहायला मिळाला. सायंकाळी 6 वाजून 12 मिनिटांनी चरणस्पर्श करत किरीटापर्यंत पोहोचलेली सूर्यकिरणे अंबाबाईच्या संपूर्ण मूर्तीवर 6 मिनिटे म्हणजेच 6 वाजून 18 मिनिटांपर्यंत स्थिरावली होती. सूर्यकिरणांचे मूर्तीवर स्थिरावण्याच्या क्षणांमध्ये अंबाबाईच्या मूर्तीवर सहा मिनीटे सोनसळी अभिषेकच होत राहिल्याचे सुखद दृश्य भाविकांना पहायला मिळाले.
निरभ्र आकाश, स्वच्छ वातावरण, धुलीकण अत्यल्प आणि अंबाबाई मंदिरातील आद्रतेचे प्रमाण कमी या सर्व कारणांमुळे अंबाबाईचा किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होऊ शकला असे विवेकानंद महाविद्यालयाच्या पदार्थ विज्ञान विभागाचे अॅडज्कंट प्रोफेसर डॉ. मिलिंद कारंजकर यांनी सांगितले. दरम्यान, किरणोत्सवासाठी सूर्यकिरणे अंबाबाई मंदिराच्या महाद्वारावर सायंकाळी 5 वाजून 25 मिनिटांनी आली होती. यावेळी सूर्यकिरणांची तिव्रता गुऊवारच्या तुलनेत 18000 लक्स (एका स्क्वेअर मीटरच्या जागेत एका मेणबत्तीतून पडणारा प्रकाश हा एक लक्स अशा प्रमाणात मोजला जातो.) इतकी होती. यानंतर पुढील 37 मिनिटात सध्या उतऊण घेतलेल्या गऊड मंडपातील देवीची सदर, गणपती चौक, कासव चौक असा प्रवास करत सूर्यकिरणे मंदिरातील पितळी उंबरठ्याजवळ पोहोचली.
6 वाजून 4 मिनिटांनी सूर्यकिरणांनी अंबाबाईच्या गाभाऱ्याचा चांदीचा उंबरठा ओलांडून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी सूर्यकिरणांची तिव्रता 402 लक्स होती. ही सूर्यकिरणे जेव्हा (6 वाजून 11 मिनिटांनी) अंबाबाई ज्या चांदीच्या कटांजनावर उभी आहे, त्यावर पोहोचली होती तेव्हा त्यांची क्षमता 75 लक्सपर्यंत खालावली गेली होती. परंतू 6 वाजून 12 मिनिटांपासून ते 6 वाजून 16 मिनिटांच्या कालावधीत सूर्यकिरणांनी मोठ्या तिव्रतेने चरण स्पर्श करत गुडघा, कमर, खांद्यावऊन अंबाबाईच्या चेहऱ्यावर पोहोचत त्याला उजळून सोडले. यानंतर काहीच क्षणात सूर्यकिरणे अंबाबाईच्या कपाळी असलेल्या मळवटावर पोहोचली. तसेच 6 वाजून 17 मिनिटांनी सूर्यकिरणे चक्क अंबाबाईच्या जडावाच्या किरीटापर्यंत गेली. किरीटावर किरणे एक मिनीट स्थिरावली. त्यामुळे सहाजिकचा सूर्यनारायणाच्या किरणांनी चरणांपासून ते अगदी किरीटापर्यंत सोनसळी अभिषेक करत अंबाबाईच्या तेजस्वी ऊपाचे भाविकांना दर्शन घडवले. इतकेच नव्हे तर सूर्यकिरणांचे चरणांपासून किरीटावर 6 मिनिटे स्थिरावल्याचे दिसताच किरणोत्सव पाहण्यासाठी जमलेल्या भाविकांनी अंबा माता की जय असा अखंड गजर करत मंदिर गर्जुन सोडले.