For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाऊस गेला... गोव्यावर जलसंकटाचे सावट पसरवून!

06:09 AM Oct 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाऊस गेला    गोव्यावर जलसंकटाचे सावट पसरवून
Advertisement

या जलसंकटावर मात करण्यासाठी केवळ सरकारला दोष देऊन, निसर्गावर नाराज होऊन चालणार नाही. लोकांनी स्वत:हून परिस्थितीला तोंड देण्यासाठी भानावर येऊन पाण्याचा वापर करावा लागेल. खुल्या ऑक्सिजनची किंमत माणसांना कळत नाही, पण ती कोरोनाने दाखवून दिली. पाण्याचीही किंमत काही माणसांना कळत नाही, ती त्यांना कळावी म्हणून दुष्काळाने घाला घालावा काय?

Advertisement

गोव्यातील अधिकृत चार महिन्यांचा पावसाळा काल 30 सप्टेंबर रोजी संपुष्टात आला. यंदा पाऊस जाताना गोव्यावर जलसंकटाचे सावट पसरवून गेला. दरवर्षीच्या सरासरीनुसार यंदा पाऊस कमी पडलेला असल्याने यावर्षी गोव्यावर जलसंकट येण्याची शक्यता बळावली आहेच, पण त्याचबरोबर पावसाळ्याच्या सरतेशेवटी सप्टेंबरमध्ये भात शेतीसाठी आवश्यक असलेला पाऊसही पडलेला नसल्याने भातशेतीचे उत्पन्न बऱ्याच प्रमाणात खालावणार आहे. या संकटाची जाणीव झाल्याने सरकारने नुकसान भरपाईसाठी अहवाल तयार करण्याच्या कामास प्रारंभ केला आहे. त्याचाच भाग म्हणून उद्या 2 ऑक्टोबर रोजी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान गोव्यात येत आहेत. सप्टेंबरमध्ये भातशेतीला आवश्यक असलेला पाऊस न पडल्याने दाण्यातील दुधाचे रुपांतर तांदळात होण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही, परिणामी दाण्याऐवजी ‘पोल’ झाले आहे. अशा या भातपिकाच्या सद्यस्थितीचा आढावा मंत्री चौहान घेणार आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून आर्थिक मदतीचे मोठे पॅकेजही कदाचित मिळेल. मात्र फेब्रुवारी 2027 पासून गोव्यातील संभाव्य जलसंकटाला तोंड देण्यासाठी काय करणार? तांदुळ व इतर वस्तू दुसऱ्या ठिकाणांहून आणता येतील, पण पाणी कुठुन आणणार? सध्या विविध धरणांमध्ये असलेला जलसाठा तरी पुरेसा आहे काय?

गोव्यात वार्षिक सरासरी अधिकृत (हिशोबास धरण्यात येणारा) 120-130 इंचपर्यंत पाऊस पडतो. याशिवाय मान्सूनपूर्व व मान्सूनोत्तर पाऊस वेगळा असतो, तो हिशोबास धरला जात नाही, परंतु तो धरल्यास साधारणपणे 150 इंचपर्यंत पाऊस पडतो. देशभरातील अनेक राज्यांमध्ये दरवर्षी जसे भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागते, तसे गोव्याला सहजा कधी जावे लागत नाही. परंतु तसेच चित्र यावर्षीही असणारच नाही, अशी हमी कोण देऊ शकतो?

Advertisement

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नोंदीनुसार गोव्यात पाऊस तसा कधी कमी पडत नाही. गेल्या केवळ पाच वर्षांच्या पावसाकडे नजर टाकली, तरीही लक्षात येते की 2020 साली पडलेला 162 इंच पाऊस या शतकातील दुसरा सर्वाधिक पाऊस ठरला होता. 2021 साली 120 इंच पडून पाऊस सरासरी सामान्य राहिला होता. 2022 साली 129 इंच पाऊस पडला. 2023 साली 110 इंच म्हणजे सरासरीपेक्षा थोडा कमी पडला. 2024 साली तब्बल 173 इंच, म्हणजे गेल्या 124 वर्षांतील सर्वाधिक विक्रमी पाऊस पडला. 2025 साली 123.4 इंच पाऊस पडला होता. याशिवाय मान्सूनपूर्व व मान्सूनोत्तर पडलेला पाऊस अधिक धरल्यास एकूण पाऊस 157 इंच पडला होता. पण 2026 या वर्षी पडलेला पाऊस एकूणच गोव्यावर जलसंकटाचे सावट पसरवून गेला.

गोव्यातील धरणांमध्ये जे पाणी असते, ते कृषिसिंचनासाठी व पेयजलासाठी वापरले जाते. याशिवाय जलपुरवठ्याचे अन्य जलस्रोत विशेष आता राहिलेले नाहीत. शहरांतील बहुतांश विहिरी कधीच बुजवून टाकण्यात आल्या. काही अपवाद वगळल्यास बहुतांश गावांतील विहिरीही प्रदूषित झालेल्या आहेत. नद्या, तलावही प्रदूषणापासून आणि कचऱ्याचे उकिरडे बनण्यापासून वाचलेले नाहीत. माणसे कचरा नद्या, तलावांमध्ये टाकताना कसलाच विचार करत नाहीत. फक्त तो कचरा स्वत:च्या फ्लॅटमध्ये नको, एवढाच विचार असतो. धरणे वगळल्यास गोव्यासाठी जलपुरवठ्याचे दुसरे स्रोत नाहीत, हे वास्तव ध्यानात घ्यावे लागेल.

धरणांची सद्यस्थिती काय? साळावली धरणात 103 टक्के, तिळारी 82 टक्के, अंजुणे 90 टक्के, आमठाणे 93 टक्के, पंचवाडी 101 टक्के जलसाठा आहे. आजपासून आगामी काळात म्हणजे पुढचा पावसाळा येईपर्यंत हेच पाणी पिण्यासाठी, शेतीसाठी व अन्य कामांसाठी म्हणजे अगदी वाहने धुण्यासाठीही वापरले जाणार आहे. त्यामुळे ते कमी कमी होत जाईल, हे नक्की. त्याचबरोबर त्या साठवलेल्या पाण्याचे बाष्पिभवनही होणार आहे. म्हणजे पुरेसा जलसाठा आहे, या भ्रमात राहता येत नाही.

मनोहर पर्रीकर सरकारच्या काळात धरणांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी अनेक ठिकाणी बंधारे उभारुन वाहून जाणारे पाणी अडवून ठेवण्याचे कार्य झाले. असे कार्य गोवा मुक्तिनंतर पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या काळात व्यापक झाले होते. सावंत सरकार जेव्हा सत्तेवर आले तेव्हा जलस्रोतमंत्र्यांनी 350 बंधारे बांधण्याची घोषणा केली होती, आता सरकारचा कार्यकाळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. किती बंधारे बांधले? उलट लोकांना कोणतीच आवश्यकता नसलेला नियोजित मिराबाग बंधारा लादण्याचा प्रयत्न झाला. पिण्याच्या पाण्याची बाब बाजूला ठेवली तरी शेतीसाठी, भाजीलागवडीसाठी नद्या, तलाव, विहिरींच्या पाण्याची व्यवस्था करता येते. गेल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळ आपण म्हादईच्या पाण्यासाठी रडत बसलो आहोत. कर्नाटक पुढे पुढे जात आहे, त्यांनी म्हादईचे पाणी कधीच वळविल्याचे दाखले मिळत आहेत. म्हादईचा हा लढा लढत असतानाच गोव्यात जो शेकडो इंच पाऊस दरवर्षी पडतो, ते पाणी अडवून ठेवून वापरता आले असते. अनेक नद्यांवर असलेल्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करणे, आवश्यक व शक्य असेल तिथे उंची वाढविणे आणि अनेक ठिकाणी नव्याने बंधारे उभारता येऊ शकतात. तसे केले तर धरणांचे पाणी पिण्यासाठी पुरेसे राहू शकते. या जलसंकटावर मात करण्यासाठी केवळ सरकारला दोष देऊन, निसर्गावर नाराज होऊन चालणार नाही. लोकांनी स्वत:हून परिस्थितीला तोंड देण्यासाठी भानावर येऊन पाण्याचा वापर करावा लागेल. खुल्या ऑक्सिजनची किंमत माणसांना कळत नाही, पण ती कोरोनाने दाखवून दिली. पाण्याचीही किंमत काही माणसांना कळत नाही, ती त्यांना कळावी म्हणून दुष्काळाने घाला घालावा काय? साऱ्याच गोष्टींकडे अंतर्मुख होऊन पाहिले पाहिजे.

राजू नाईक

Advertisement
Tags :

.