For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तालुक्याच्या प. भागात पावसाचा जोर वाढला

10:32 AM Jul 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
तालुक्याच्या प  भागात पावसाचा जोर वाढला
Advertisement

नदी-नाले प्रवाहित : शिवारात पाणी, बळीराजा सुखावला : खरिपातील पिके घेण्यासाठी उपयुक्त : रताळी लागवड जोमात

Advertisement

वार्ताहर /किणये

यंदा मृग नक्षत्र काळात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. आर्द्रा नक्षत्राला सुरुवात होऊन आठ दिवस झाले. तरीही दमदार पाऊस नव्हता. यामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र गेल्या पाच सहा दिवसापासून तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे बळीराजा सुखावला आहे. या पावसाचा खरिपातील पिके घेण्यासाठी उपयोग होणार आहे. गुरुवारी मात्र तालुक्यात पावसाचा जोर वाढला होता. पाच सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नदी नाले प्रवाहित झाले आहे. तसेच शिवारामध्ये पाणी साचले आहे. हवामानात गारवा निर्माण झाला असून, सध्या असणारे वातावरण सर्वांनाच आनंददायी वाटू लागले आहे.

Advertisement

रताळी लागवड जोमात

मृग नक्षत्रात केवळ पावसाची रिमझिम झाली. यामुळे शेतकऱ्यांनी भात पेरणी व भुईमूग पेरणी इतकीच कामे केली. रताळी लागवड व अन्य कामकाजासाठी शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत होते. सध्या होत असलेल्या पावसामुळे तालुक्याच्या पश्चिम भागात रताळी लागवड जोमाने सुरू आहे.

...तर मुंगेत्री नदीवरील जुना पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता

किणये, संतिबस्तवाड परिसरातील मुंगेत्री नदी गेल्या चार दिवसांपासून प्रवाहित झाली आहे. या भागात बुधवारी व गुरुवारी पावसाचा जोर वाढला. यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली पहावयास मिळाली. सध्या सुरू असलेल्या पावसाचा जोर असाच राहिल्यास येत्या तीन चार दिवसात संतिबस्तवाड येथील मुंगेत्री नदीवरील जुना पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

दि. 21 पासून आर्द्रा नक्षत्राला सुरुवात झाली. मात्र या नक्षत्राची सुरुवातही कोरडीच झाली पण पाच सहा दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. यामुळे या नक्षत्राने शेवटच्या टप्प्यात सर्वत्र पाणी केले. दि. 5 जुलैपासून पुनर्वसू नक्षत्राला सुरुवात होणार आहे.

सर्वच भातपिकाला उत्कृष्ट पाऊस

दमदार पाऊस होत असल्याने शिवारात पाणी साचले आहे. रोप लागवडीच्या मशागतीसाठी पॉवर ट्रेलर व बैलजोडीच्या साहाय्याने शेतकरी मशागत करू लागले आहेत. धूळवाफ पेरणी केलेल्या पिकाची बऱ्यापैकी उगवण झाली आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी कोळपणी केली आहे. या भात पिकातही पाणी साचल्यामुळे रान उगवून येण्याचे प्रमाण कमी होणार असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Advertisement
Tags :

.