For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाऊस

06:22 AM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाऊस
Advertisement

उत्तरार्ध

Advertisement

‘ती गेली तेव्हा पाऊस निनादत होता’ या ग्रेस यांच्या ओळी आपल्या मनात कुठेतरी रुंजी घालायला लागतात. पाऊस उधळतो, निथळतो अगदी पाघोळतोसुद्धा. टपटपतो तडतडतो पण रिपरिपत काहीतरी सांगत राहतो. वाऱ्याबरोबर झुलत राहतो. मनामध्ये हिंदकळत बसतो आणि ओलेतेपणाने मृदगंध साऱ्या चराचरात पेरत बसतो. त्यासाठी चातकाची तहान मात्र आम्हाला लागायला हवी. विचारांच्या सुरपारंब्या या सरींच्या बरोबर खेळायला एक वेगळीच मजा येते. पण विजेसारखा एखादा विचार आम्हाला नेमका टाळ्यावर आणतो. एखादी गोष्ट मनात राहून गेलेली मात्र पावसाचा थेंब बनून पानावर रेंगाळते ना, तसं होतं. त्या राहून गेलेल्या गोष्टींचे गोफ असे काही मोत्यासारखे लगडतात की त्याची एक वेगळीच क्षणभंगुर श्रीमंती मनाला मोहून जाते. मृदगंधी सौरभाबरोबरच गवताचा कडवट वास पावसाचं ओलेपण जाणवून देतो.

पावसाळ्यात हमखास दरवळणारा वास म्हणजे कांद्याच्या भज्यांचा आणि वड्यांचा. त्याचबरोबर गोडाच्या पुऱ्यांचा देखील. हे नुसते वास आले तरी जिभेवरती स्वाद नकळत लोळायला लागतो. अशा कितीतरी प्रकारांनी आम्हाला पाऊस हवासा वाटत असला तरी गरिबाला मात्र तो नकोसा वाटतो. त्याच्या रोजच्या जगण्याचं गणितच बिघडवतो. इंदिरा संतांनी ते नेमकं वर्णन कवितेत केलंय......

Advertisement

‘नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी,

माझे घर चंद्र मौळी, अन् दारात सायली...’

माझ्या लहानपणी खेड्यातल्या घरांमध्ये उजेडासाठी घरांना झरोके असायचे. त्या झरोख्यातून येणारे कवडसे हातात पकडणं हा एक खेळ असायचा. पण हेच झरोके पावसाळ्यात मात्र नकोसे व्हायचे. कारण घराला लाकडी पट्टया, खांब आणि त्यावर शहाबादी फरशांची गच्ची असल्यामुळे घर कुठून कोणत्या वेळेला गळायला लागेल हे सांगता येत नसायचे. त्याच्यामुळे पावसाळा आला की, गळणाऱ्या पागोळ्या खाली छोट्या छोट्या पातेल्या ठेवतांना आम्हाला मज्जा यायची. पण आईची मात्र काळजी डोळ्dयावाटे दिसायला लागायची. पावसामुळे आलेली ओल, भिंतीचे पोपडे निघायला सुरुवात व्हायची आणि दिवाळीला रंग द्यायला हवा म्हणून कुठेतरी आम्हाला नकळत निरोप मिळायचा. या सगळ्यात भर पडायची ती लाईट जाण्याची, अंधारातला पाऊस का कुणास ठाऊक पण भयंकर वाटायचा. उगीचंच निराश व्हायला लागलोय असं वाटायचं. रात्र मोठी झाली की काय असंही वाटून जायचं. अशा वेळेला नेमकी पालीची उपस्थिती तिच्या आवाजावरून कळायची, ती कोणत्या दिशेला आहे हेही अंधारात नेमकं लक्षात यायचं. झाडांच्या फांद्यांचे अक्राळ विक्राळ  रूप नकोसे वाटायचे. अशावेळी मुठीपेक्षाही डोळे जास्त घट्ट मिटून घ्यायचो आणि मग सकाळीच जाग यायची. अगदी लख्ख आंघोळ करून स्वच्छ झालेली पृथ्वी पाहताना एक वेगळाच आनंद व्हायचा.

Advertisement
Tags :

.