For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आला पाऊस आला

12:20 PM May 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
आला पाऊस आला
Advertisement

सरकार कुणाचे येणार, भाजपा बहुमत राखणार की गमावणार, जोड-तोड करून सरकार साकारावे लागले तर नरेंद्र मोदी सर्व संमतीचे नेते निवडले जातील का, नितीन गडकरी,योगी आदित्यनाथ असे अन्य नेते पंतप्रधानपदी विराजमान होतील अशा चर्चांना उधाण आले असले तरी देशभर आनंदाची लहर निर्माण झाली आहे ती पावसाच्या वार्तेने. यंदा मान्सून वेळेवर येणार, चांगला बरसणार आणि दुष्काळ, पाणी टंचाई, धरणे कोरडी या संकटातून मुक्ती होणार या वार्तेने अवघा देश आनंदला आहे. मान्सून पूर्व पावसाने काही ठिकाणी जमिनीला ओलेचिंब केले आहे. काही ठिकाणी वादळाचा फटका बसला आहे. तर विदर्भ अजूनही पोळून निघत आहे. धरणे, तलाव, प्रकल्प तळी आटली आहेत आणि पाणी टंचाई ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे, आला पाऊस आला या वार्तेने सर्वांनाच आनंद झाला आहे. मे महिन्याची अखेर आणि जूनचा प्रारंभ हा खरीप हंगामासाठी महत्वाचा असतो. वळवाचे दोन चार चांगले पाऊस झाले की नांगरलेली जमीन कूळवून, खुरटून तयार केली जाते. आणि पावसाची प्रतीक्षा केली जाते. पावसाच्या अंदाजासाठी शास्त्रज्ञांची वेगवेगळी मॉडेल्स आहेत. पण, मोर नाचू लागला, मुंग्या, मुंगळे जमिनीखालून वर आले, पक्षांनी घरटी बांधली, बहावा फुलला की शेती व शेतकऱ्यांना जाग येते व शास्त्रज्ञ, हवामान विभाग, बंगालचा उपसागर तेथील तापमान, वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग, एल निनोचा प्रभाव वगैरे अनेक निकषावर जून ते सप्टेंबर या चार महिन्याचे पावसाचे अंदाज वर्तवतात. आता सोशल मीडियावरही काही मंडळी आपले अंदाज व मार्गदर्शन अपलोड करून लाईक मिळवतात. पण, बळीराजाला आणि त्यांच्या जमिनीला ओढ असते ती चिंब भिजण्याची, तृप्त होण्याची तहानपूर्तीची त्यासाठी तो या शुभवार्तासाठी आणि पावसासाठी आभाळाकडे डोळे लाऊन असतो. यंदाही प्रतीक्षा सुरू असताना बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ सुरू झाले व तेथे एन.डी. आर. एफ. ची पथके रवाना झाल्याचे वृत्त थडकले आहे. पण, या वादळाचा मान्सूनच्या आगमनावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. मान्सूनचे आगमन वेळेवर होईल व यंदा मान्सून चांगला बरसेल असे हवामान विभागाने म्हटले आहे. पाऊस चांगला पडणार ही आनंदवार्ता असली तरी या वार्तेने अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा येतो. कारण पूर, महापुराचे फटके आणि महानगरात तुंबणारे पाणी, मुंबईत तर समुद्राला भरती असताना अतिवृष्टी झाली की मुंबईची तुंबई होणे. तिच गोष्ट बेळगाव, सांगली, कोल्हापूर, पुणे भागात निदर्शनास येते. हा सारा माणसांचा अशोभनीय कृत्यांचा प्रताप आहे. प्लास्टीकचा प्रचंड वापर, मोकळ्या बाटल्या, पिशव्या नाल्यात टाकणे, नैसर्गिक नाले, ओढे मुजवणे, डोंगर पोखरून शहरात सखल भागात भर घालणे, लघु बंधारे म्हणावेत असे उंच हाय वे बांधणे, नदीचे तीर कापून माती काढणे, वृक्षतोड, शहरांची अमर्याद वाढ अशी अनेक कारणे आहेत. पर्यावरणाचा नायनाट आणि अमर्याद प्रदुषण यामुळे अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. भाजून काढणारी उष्णता, अतिवृष्टी, गोठवून टाकणारी थंडी यांचे भयंकर रूप प्रतिवर्षी अनुभवास येते आहे. आणि  नोटा साठवून माणसे श्रीमंत भासत असली तरी श्वास घेता येत नाही. चांगले अन्न पाणी मिळत नाही म्हणून दरिद्री होतानाही दिसत आहेत. चांगला पाऊस या शब्दाची अनेकांना धास्ती वाटते आहे. ती त्यामुळेच. कारण पूर, महापूर यामुळे अनेकांचे होत्याचे नव्हते झाले आहे. मोठा आर्थिक फटका आणि त्यानंतर महामारी, आजार, साथी यामुळे चांगल्या पावसाची दहशत वाटावी अशी स्थिती आहे. पण, आजही ग्रामीण भागात, गावे, वस्ती, शेती, बागा यांना पावसाची गरज असते. पावसाची 9 नक्षत्रे नीट बरसली की चराचर आनंदते, अर्थव्यवस्थेला गती येते. पक्षी, प्राणी, माणूस यांचा अन्नपाण्याचा प्रश्न मिटतो. त्यामुळे चांगला पाऊस गरजेचा आहे आणि निसर्ग रक्षणही गरजेचे आहे. पाऊस चांगला झाला पाहिजे. पावसाचे पाणी अडवता, जिरवता आले पाहिजे आणि पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत स्वच्छ राखले पाहिजेत. आज घराघरात पाणी स्वच्छ करायची मशिन्स आहेत. त्यावर दरवर्षी हजारो रूपये खर्च होतात. ही गोष्ट सरकारला आणि कोणालाच भूषणावह नाही. या पातळीवर नेमके, नेटके काम झाले पाहिजे पण, कोणालाच कशाचे भान नाही आणि उत्तरदायित्व नाही. दरवर्षी वृक्षारोपण होते पण, डोंगर उघडे बोडके आहेत. जंगलाचा नाश सुरू आहे. बिबटे व अन्य वन्य प्राणी मानववस्तीवर दिसू लागले आहेत. तथाकथित भौतिक प्रगती माणसांना त्यांच्या पुढील पिढ्यांना अडचणीत आणत आहे. या सर्व प्रश्नांवर सजगतेने स्वत: काही कृती केली पाहिजे. चांगल्या सवई अंगीकारल्या पाहिजेत आणि पावसाचे स्वागत करून पेरणी पूर्ण करून पंढरीच्या वारीत सहभागी झाले पाहिजे. गतवर्षी पावसाने ओढ दिली होती. पावसाचे वेळापत्रकही बिघडले होते. अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी यांचे फटके बसले होते. या पार्श्वभूमीवर यंदा चांगल्या व एक जूनपासून पाऊस आणि सात जूनच्या दरम्यान मान्सून महाराष्ट्र व्यापणार अशा वार्ता आहेत. आला पाऊस आला यांचे मंगलगान हवामान खात्याने गायले आहे. तर सर्वांच्या नजरा चार जूनच्या मतमोजणीकडे लागल्या असल्या तरी आला पाऊस आला या वार्तेने, खरीप हंगामाला जाग आली आहे. मुख्यमंत्री व सरकारी पातळीवर बी बियाणे, खते, औषधे यांची तजवीज केली आहे. काही भागात भाताच्या धुळवाफ पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. शेतीमालाला दर नाही आणि खर्च वाढला आहे. रोगराई वाढली आहे. या पार्श्वभूमीवर नगदी पिकेही अडचणीत आहेत. बियाणे,औषधे यांचे तगडे दर शेतकऱ्यांना कर्जाच्या सापळ्यात ढकलत आहेत. सारेच पक्ष व नेते शेतकरी कल्याणाच्या घोषणा करत असले तरी एका हाताने द्यायचे दुसऱ्या हाताने काढून घ्यायचे यामुळे दरवर्षीची तीच कहाणी सर्जा कायम कर्जात अशी अवस्था व त्यातून नवनवी दु:खे निर्माण होत आहेत. कडधान्ये लावा, भरडधान्ये पिकवा आणि तीच खा, असा सरकारचा प्रचार आहे. पण पगारापुरते अधिकारी आणि भरमसाठ दरापुरते बियाणे, बोगस खते, बोगस बियाणे या सर्वांतून शेतकरी मुक्त झाला पाहिजे. बियाण्याच्या उगवण क्षमतेबरोबर उत्पादन क्षमताही तपासली पाहिजे. या साऱ्या गोष्टींवर नियंत्रण असले पाहिजे. तूर्त आला पाऊस आला ही आनंदवार्ता रानोमाळी शिळ घुमावी अशी घुमते आहे आणि पाखरू पेरते व्हा, पेरते व्हा, म्हणू लागले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.