For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विधानपरिषदेच्या 16 जागांसाठी आता चुरस

06:20 AM May 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
विधानपरिषदेच्या 16 जागांसाठी आता चुरस
Advertisement

विधान परिषदेच्या एकूण 78 सदस्य संख्येपैकी 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जातात. मात्र गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून निवडणूकाच न झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून जात असलेल्या आमदारकीच्या जागा रिक्त आहेत. सोमवारी विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या 16 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणूकीसाठी 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. 22 जूनपासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. पण, त्यापूर्वी विधान परिषदेच्या सदस्यसंख्येत आणखी भर पडणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडणुकांची रणधुमाळी पहायला मिळर आहे.

Advertisement

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांमधून विधानपरिषदेवर होणारी निवडणूक लढणारे हे, त्या भागातील प्रस्थापित आणि पैशांनी श्रीमंत असामी असत, महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या अशा अनेक निवडणूका गाजल्या त्यात सर्वात गाजली ती जळगाव स्थानिक संस्थेतील मनीष जैन विरूध्द निखिल खडसे, मनिष जैन यांनी एकनाथ खडसे यांचे चिरंजीव निखिल खडसे यांचा पराभव केला होता. या निवडणूकीसाठी नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषदेवर निवडून आलेले सदस्य मतदान करतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात घोडेबाजार या निवडणूकीत होत असतो. त्यामुळे ज्याच्याकडे पैसे खर्च करण्याची क्षमता अधिक तो या निवडणूकीत उतरतो, मात्र गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपने शत प्रतिशत वर्चस्व मिळवल्याने हे चित्र बदलल्याचे दिसत आहे.

16 जागांसाठी होणाऱ्या या निवडणूकीचा मागोवा घेतल्यास सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेतून भाजपचे प्रशांत परीचारक हे आमदार होते, त्यांची मुदत 1 जानेवारी 2022 ला संपली. परिचारक यांनी विधानपरिषदेवर आमदार असताना भारतीय सैन्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांची परिषदेची टर्म चांगली गाजली. सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपचे वर्चस्व असले तरी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे पण भाजपला अडचणीत आणण्याइतके संख्याबळ आहे. भाजपकडून विधानपरिषदेची टर्म संपलेले रणजितसिंह मोहीते-पाटील, राम सातपुते, प्रशांत परीचारक, राजेंद्र राऊत हे इच्छुक असू शकतात, मात्र या निवडणूकीसाठी होणारा घोडेबाजार बघता पैसा खर्च करण्याची क्षमता हेच मेरीट असणार आहे.

Advertisement

सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे भाऊ शेखर गोरे यांना संधी मिळू शकते, 2016 ला काँग्रेस विरूध्द राष्ट्रवादी लढली होती. आता मात्र या दोन्ही पक्षाचा एकही आमदार सातारा जिह्यात नाही. 2016 ला झालेल्या निवडणूकीत पतंगराव कदम यांचे बंधू मोहन कदम यांनी काँग्रेसकडून तर त्यांच्या विरोधात शेखर गोरे यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती, राष्ट्रवादीकडे अतिरीक्त मते असताना देखील गोरे यांचा पराभव झाला होता. शेखर गोरे यांनी 2024 ला झालेल्या विधानसभा निवडणूकीत आपली तलवार म्यान करताना बंधू जयकुमार गोरे यांचा प्रचार केला होता, त्यावेळी त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉल करत विधानपरिषदेवर पाठविण्याचे वचन दिले होते. मात्र परिषदेच्या दोन याद्यात काही त्यांचे नाव आले नाही.

पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेतून अनिल भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते, बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी ते तुरूंगात होते. आता पुण्यातील राजकीय समीकरण बदलले असून भाजप ठरवेल त्या उमेदवाराला लॉटरी लागू शकते. त्यामुळे भाजप कोणाला संधी देणार हे बघणे महत्त्वाचे आहे. ठाणे स्थानिक स्वराज्य संस्थेतून राजकारणातील अजातशत्रू म्हणून ओळखले जाणारे वसंत डावखरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या पाठिंब्याने नेहमी निवडून येत असत, मात्र गेल्या निवडणूकीत शिवसेनेच्या रवींद्र पाठकांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर काही दिवसातच डावखरे यांचे निधन झाले. ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वर्चस्व आहे, त्यामुळे ही जागा शिवसेनेला मिळू शकते. मात्र आऊटसाईड ठाण्यातून गणेश नाईक, नरेंद्र मेहता, किसन कथोरे, रवींद्र चव्हाण हे भाजपचे सुभेदार ठाण्यातूनच शिंदे यांचा गेम करू शकतात आणि तितकी भाजपची ताकद आहे, त्यात शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा कोणाला असणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदार संघातून सुनिल तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे हे आमदार होते, सध्या तटकरे यांचे राष्ट्रवादीत पंख छाटले जात असताना, अनिकेत तटकरे यांना पुन्हा संधी मिळणार का? या मतदार संघात भाजप आणि शिवसेनेची ताकद ही राष्ट्रवादीच्या तुलनेत मोठी असल्याने येथे राष्ट्रवादी ऐवजी शिवसेना निवडणूक लढू शकते. त्यातच रायगडमधील शिवसेनेचे तीनही आमदार हे तटकरेंच्या विरोधात आहेत. नांदेडमधून काँग्रेसचे उमेदवार अमर राजुरकर 2016 ला निवडून आले होते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे समर्थक असलेले राजुरकर यांनी देखील चव्हाणांसोबत भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजप चव्हाण समर्थकांना उमेदवारी देणार की भाजपचा उमेदवार देणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. औरंगाबाद-जालना मतदार संघातील अंबादास दानवे आणि भंडारा-गोंदियामधील डॉ. परिणय फुके यांना मुदत संपल्यानंतर पुन्हा विधानपरिषदेवर संधी मिळाली आहे. अमरावतीमधून माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांना संधी मिळणार की बच्चु कडू यांना विधानपरिषदेत आव्हान देण्यासाठी नवनीत राणा यांना भाजप संधी देणार का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. बीडमधून भाजपचे सुरेश धस परिषदेत आमदार होते, आता धस विधानसभेचे आमदार आहेत. बीडमधून डॉ. प्रीतम मुंडे यांचे नाव पुढे येऊ शकते. परभणी-हिंगोली मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाचे विप्लो बजोरीया हे आमदार होते, शिवसेनेत फुट पडल्यानंतर विधानपरिषदेची मुदत बाकी असताना शिंदे गटात प्रवेश करणारे ते परिषदेतील पहिले आमदार होते. त्यामुळे बजोरीया यांना संधी मिळू शकते, तर अहिल्यानगर आणि वर्धा-गडचिरोली येथील आमदार अरूणकाका जगताप आणि रामदास आंबटकर यांचे निधन झाले. अरूण जगताप हे अपक्ष म्हणून निवडून आले होते, तर आंबटकर हे भाजपचे आमदार होते. गेल्या दहा वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय समीकरणे बदलल्याने महाविकास आघाडीतील घटकपक्षांसाठी ही निवडणूक अवघड असणार आहे. त्यात महायुतीतील भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादीची स्थानिक स्वराज्य संस्थेत वाढलेली स्वतंत्र ताकद असल्याने महायुतीत जागांचा पेच निर्माण होऊ शकतो. या निवडणूकीसाठी थेट नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य मतदार असल्याने, मतदारांना लक्ष्मी दर्शन केले जाते. त्यामुळे कधी कधी पक्षांची अतिरीक्त मते असताना सुध्दा ऐनवेळी समीकरणे बदलतात, त्यात जवळपास आठ-दहा वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झाल्या. या निवडणूकीत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींसाठी निवडणूकीत खर्च झालेला पैसा वसुल करण्याची ही मोठी संधी असणार आहे.

प्रवीण काळे

Advertisement
Tags :

.