एकत्र की एकट्याने लढायचे हाच सर्वांना प्रश्न
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र येऊन लढायच्या की एकट्याने लढायच्या हा प्रश्न राज्यातील प्रत्येक राजकीय पक्षासमोर उभा आहे. ठाकरे बंधूंची एकत्र येण्याची दाखवलेली तयारी, त्याला छेद देण्यासाठी शरद पवार यांनी केलेली खेळी, त्याला अजित पवारांकडून झीडकारले जाणे, एकनाथ शिंदे यांच्याकडून एकत्र लढण्याची घोषणा तर काही ठिकाणी समोरासमोर लढावे लागेल ही फडणवीस यांची भूमिका लक्षात घेतली तर राज्यातील सर्वच पक्ष आपल्या मित्र पक्षाचे किंवा संभाव्य जोडीदाराची शक्ती आजमावतांना दिसत आहे. या जोडतोडीच्या राजकारणाची अनेक रूपे या चार महिन्यात दिसतील. विरोधी तंबूतले एकत्र आले तरच दुसरेही एकत्र लढतील.
गेल्या आठवड्यात याच सदरामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यावर दोन्ही राष्ट्रवादीच्या एकीकरणाची जबाबदारी टाकल्या बद्दल चर्चा करण्यात आली होती. यामध्ये पवारांच्या या वक्तव्यावर अजित दादांकडून कोणता प्रस्ताव येतो हे महत्त्वाचे अशी स्पष्ट भूमिका मांडली होती. याच काळात राज्यातील अनेकांनी ही काका पुतण्याची समजून केलेली खेळी आहे इथे पासून वेगवेगळ्या प्रकारे मांडणी केली. मात्र या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांचा प्रस्ताव जवळपास झिडकारलाच. अजित दादांना आता पवारांचे सहकारी नको आहेत किंवा पवारांच्या सहकाऱ्यांचाच अजित पवारांशी जोडून घेण्यास विरोध आहे असा या गोष्टीचा अर्थ होत नाही.
याबाबत राजकीय क्षेत्रात चर्चा काही सुरू असली तरीसुद्धा जळगाव, नाशिक, सांगली, सोलापूर अशा अनेक जिह्यांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांच्या तंबूत असणारे जुने, जाणते, ज्येष्ठ (पण अलीकडच्या काळातील सगळे अपयशी) नेते आपल्या पक्षात घेण्यासाठी धडपडत आहेत. दादा सत्तेवर असल्यामुळे अशा मंडळींना त्यांच्या तंबूत जाणे गरजेचे वाटणे स्वाभाविक आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या मंडळींना देखील पुन्हा एकदा आपले नशीब आजमावायचे आहे. एका बाजूला राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील स्पर्धक नेत्यांचे आव्हान आणि दुसऱ्या बाजूला भाजप आणि शिंदे सेनेचे आव्हान यामुळे अशा मंडळींना अजित पवार हेच एक आधार होणार होते. त्यांनी शरद पवारांची वाट न पाहता परस्पर अजितदादांशी संधान साधले. दादांनी सुद्धा त्यांच्यासाठी आपल्या पक्षात जागा करून दिली.
मागच्या दाराने अनेकांशी चर्चा करून त्यांना आपल्या पक्षात खेचून आणण्याचे काम दादांची टीम करतच आहे. पवारांचे असे अनुयायी चालत असतील तर पवार आणि त्यांचे आमदार का नकोत? अजित पवार यांनी ऐनवेळी एकीच्या चर्चांना पूर्णविराम देत काय साधले? हे नजीकच्या भविष्यात समजेलच. केवळ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचा दादांशी युती करण्याला विरोध आहे म्हणून फिस्कटली असे होऊ शकत नाही. पवारांना जर अजित पवारांशी संधान साधायचे असेल आणि अजित दादांना सुद्धा त्यांची गरज वाटत असेल तर दोन्ही पक्षातील कोणत्याही नेत्याला या दोन नेत्यांचे मत बदलता येणार नाही. इतका दोघांचाही आपापल्या पक्षावर पगडा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील इतर लोकांच्या प्रयत्नाने कुटुंबातील हे दोन सदस्य एकत्र येण्यापासून राहिले असे म्हणता येणार नाही.
या उलट भाजपकडून अजित पवारांना या युतीपासून रोखण्यासाठी अंतर्गत काही हालचाली झाल्या असण्याची दाट शक्यता आहे. दोन शक्ती एकत्र याव्यात असे भाजपला ना ठाकरेंच्या बाबतीत वाटेल, ना पवारांच्या बाबतीत! भाजपला शह द्यायचा तर त्यासाठी ठाकरे किंवा पवार या दोन्ही नावांची गरज महाराष्ट्राच्या राजकारणात आवश्यक ठरते. अशा काळात या पंधरवड्यातच ठाकरे बंधूंची एकत्र येण्याची चर्चा, व्यापक हितासाठी एकत्र यायची दोघांनी व्यक्त केलेली तयारी आणि त्यांच्या निकटवर्तीयांनीच एकमेकांवर केलेले शाब्दिक हल्ले हे लक्षात घेतले तर ठाकरेंचे अद्याप सुद्धा एकत्र येणे अशक्य कोटीतले वाटते आहे. एकीची चर्चा उठली तेव्हा भाजपने राज ठाकरे यांच्यावरही तोंडसुख घेण्यास मागेपुढे पाहिले नव्हते. आता मात्र खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे मुक्त विद्यापीठ वाटते. ते कोणालाही प्रवेश देऊ शकतात हा त्यामागील एक अर्थ आणि आम्ही कोणत्याही वेळी राज ठाकरे यांना आपल्याकडे खेचून घेऊ शकतो हा भाजपचा आत्मविश्वास राज ठाकरे यांच्या पक्षाला घातक ठरू शकणार आहे.
ठाकरे बंधू एकीचे बोलले असले तरी एकत्र येऊ शकतील असे वाटत नसल्याने शिंदे सेनेने पुन्हा त्यांच्याशी संधान साधणे सुरू केले. वैशिष्ट्या म्हणजे उदय सामंत यांना चर्चेला पाठवण्यात आले. त्यांची आस्तेकदम वाटचाल यशस्वी होऊ नये याची काळजी भाजप आणि ठाकरेसेनाही घेणार आहे. पवारांना ठाकरे बंधू एकत्र यावे असे वाटत नसावे. दुसरीकडे दुरावलेला काँग्रेस आणि ठाकरेसेना यांना संदेश द्यायचा होता. पवारांच्या वक्तव्यानंतर अजित दादांशी त्यांची मागणी धुडकावून लावली तरी पवारांचा फायदा झालाच आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी ते आले असताना विविध पक्षांचे लोक त्यांची वाट पाहत होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि शिवसेनेचे पदाधिकारी सचिन अहीर अचानक त्यांना भेटायला आले. त्यांची जी चर्चा झाली ती बाहेर येईलच. पण, महाविकास आघाडीचा रुतलेला गाडा अचानक चालू लागला याच्या मागेही पवारांचे ते वक्तव्य होते हे आता स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीतील राजकीय पक्ष जसे एकमेकाच्या शक्तीचा अंदाज घेत आहेत तसेच भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार यांच्या बाबत देखील होत आहे. या सगळ्यांची येत्या चार महिन्यातील वाटचाल, कृती आणि राजकारण मोठे रंजक ठरेल.
शिवराज काटकर