आर यू शुअर प्रश्न गरजेचा...
पती पत्नी, भाऊ-बहीण, भाऊ-भाऊ, पालक-मूल अशी अनेक नाती विस्कटताना दिसतात. दोन माणसं वेगळी आहेत म्हटल्यावर मतभेद हे असणारच! परंतु या ‘मतभेदांचा प्रवास जर मनभेदांच्या दिशेने होत असेल’ तर त्या नात्यासंदर्भात कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी आर यू शुअर ? हा प्रश्न स्वत:ला विचारणे आणि आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. कोणतंही नातं तुटणं, केवळ गैरसमजाच्या वादळामुळे नात्यांमध्ये दुरावा येणं हे क्लेषकारक ठरू शकतं.
परवा व्हाट्सअप वर एक मेसेज वाचनात आला ‘आज मी माझ्या मोबाईलमधील काही गोष्टी डिलीट करत होतो. तेव्हा प्रत्येकवेळी फोन मला विचारत होता Are you sure ? मला मोठे आश्चर्य वाटले की निर्जीव मशीनही आपल्या आज साठवलेल्या आठवणी काढून टाकण्यापूर्वी तुम्हाला नक्की ना? असे विचारते. मग एक जिवंत माणूस ज्याला भावना आहेत असे म्हटले जाते तो इतका भावना शून्य कसा राहतो? जो नातेसंबंध तोडण्यापूर्वी स्वत:ला एकदाही विचारत नाही Are you sure ? तसं पाहायला गेलं तर हा छोटासा संदेश! परंतु विचार करायला लावणारा.. समुपदेशनाच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना कधी माणसामाणसांतील संवादाचा अभाव, अहंकार, इर्ष्या तर अनेकदा गैरसमजांच्या भिंतींमुळे दुरावणारी अनेक नाती पाहायला मिळतात.
पती पत्नी, भाऊ-बहीण, भाऊ-भाऊ, पालक-मूल अशी अनेक नाती विस्कटताना दिसतात. दोन माणसं वेगळी आहेत म्हटल्यावर मतभेद हे असणारच! परंतु या ‘मतभेदांचा प्रवास जर मनभेदांच्या दिशेने होत असेल’ तर त्या नात्यासंदर्भात कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी Are you sure ? हा प्रश्न स्वत:ला विचारणे आणि आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. कोणतंही नातं तुटणं, केवळ गैरसमजाच्या वादळामुळे नात्यांमध्ये दुरावा येणं हे क्लेषकारक ठरू शकतं. त्यामधून निर्माण होणाऱ्या ताणामुळे मानसिक आरोग्य व पर्यायाने शारीरिक आरोग्य धोक्यात येऊ शकतं.
व्हाट्सअपवर हा मेसेज समोर आला आणि साधारणत: वर्ष सव्वावर्षापूर्वी भेटायला आलेले एक सद्गृहस्थ आठवले!
विनायकरावांना त्यांच्या पत्नी मालतीताई माझ्याकडे घेऊन आल्या होत्या. विनायकराव, मालती ताई, त्यांचे दोन मुलगे, धाकटा भाऊ सुजय, त्याची पत्नी आणि दोन मुली असा सारा परिवार अनेक वर्षे सुखाने एकत्र नांदत होता. जावा-जावांचे नातेही छान होते. कधी मतभेद झाले तरी ते तेवढ्यापुरतेच असायचे. हे भाऊ म्हणजे राम-लक्ष्मणाची जोडी म्हणून पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध होते. साऱ्यांचा एकोपा, कष्ट, मेहनत या बळावर या कुटुंबाने समृद्धीचे नंदनवन फुलवलं होतं. एक दिवस सुजयच्या मुलीला मालतीताई थोड्या रागावल्या. काहीतरी बोलणं सुरू होतं आणि तेवढ्यात सुजय तिथे आला. पाचच मिनिटे उभा राहिला आणि त्या मुलीचा हात पकडून तिला ओढतच घराबाहेरच्या झाडाखाली जाऊन बसला. रागानेच पत्नी आणि दुसऱ्या मुलीलाही बाहेर बोलावलं. कुणीही आत पाऊल टाकायचं नाही असं बजावलं. सगळे त्याचा हा रुद्रावतार प्रथमच पाहत होते. कुणाची काही बोलायची हिंमतच होईना! थोडा वेळ गेल्यानंतर त्याच्या पत्नीने, मुलींनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु तो हट्ट सोडेचना.
विनायकराव आणि मालती ताईंनी समजूत घालून त्याला घरात नेलं. त्याच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला परंतु सुजय गप्पच होता. त्याचं नेमकं काय बिनसलंय हे समजत नव्हतं. चार दिवसांनी सुजयने त्याचे कुटुंब शेतावरच्या घरात राहायला जाणार आहे हे सांगितलं आणि ‘वेगळं व्हायचंय’ या कल्पनेने सारेच धास्तावले. सुजय व्यतिरिक्त कुणालाच ते नको होतं. अखेर सुजयने आपला निर्णय खरा केला आणि सततच्या मानसिक तणावामुळे अवघ्या चार महिन्यातच विनायक रावांना आजवर नसलेल्या गोळ्या चिकटल्या!
त्यांची मनोवस्था ही नाजूक झाली होती. मॅडम वेगळे होण्याचं कारण तरी कळायला हवं तर ना? असं म्हणत ते हमसून हमसून रडत होते. अर्थातच मदतीची अपेक्षा घेऊन आले होते.
या दोन्ही भावांना एकत्र आणण्यासाठी नेमकं बिनसलंय कुठे हे शोधून काढणे गरजेचे होते. कुणाच्याही मनाची दार उघडणं हे तसं कठीणच काम परंतु प्रयत्न करायचा पक्क ठरलं. थोडं चौकटीच्या बाहेर जाऊन काम करावं लागणार होतं. सुजयच्या पत्नीची भेट घेतल्यानंतर गेले दोन-तीन महिने सुजयही खूप अस्वस्थ वाटत असल्याचे तिने सांगितले. तिने त्याबाबत अनेकदा विचारणाही केली परंतु तो कधी काही बोललाच नाही. साऱ्यांनी परत एकत्र यावं यासाठी त्याची पत्नी, दोन्ही मुली लागेल ते सहकार्य करायला तयार होत्या. अखेर सुजयच्या पत्नीने मोलाचं सहकार्य करत सुजयला मला भेटण्यासाठी तयार केलं. तीन चार भेटीनंतर आणि खूप प्रयत्नानंतर सुजयच्या बंद मनाची कवाडे उघडण्यात यश मिळालं! ‘अरे तुला दोनच तर मुली आहेत. तू एवढं करतोयस कुणासाठी? एवढी मेहनत का करतोस? ज्या प्रॉपर्टीला आमची म्हणतोस ती अखेर भावाकडेच राहणार! मुली म्हणजे परक्याचं धन. तुझे पुतणे थोडेच तुला महत्त्व देणार? अशा प्रकारची जनमानसाची अनेक वाक्य, शेरेबाजी यामुळे गैरसमजाचं वादळ मनात तयार झालंच होतं. मनातल्या मनात ते धुमसत होतं. मालती ताईंनी ओरडण्याची निमित्त मात्र.. ठिणगी पडली आणि त्या अस्वस्थतेच्या, रागाच्या, अविचाराच्या गर्तेत अख्ख कुटुंब ओढलं गेलं.
आपण चुकलो तर नाही ना? या विचाराने सुजय ही वारंवार अस्वस्थ होत होता. झोप गायब झाली होती. परंतु आता माघार घेतली तर हसं होईल. मीच का माघार घ्यावी? या विचारामध्ये तो अडकला होता. ज्यावेळी दोन भावांना समोरासमोर बसवलं आणि विनायकरावांना त्याने कारण सांगितलं त्यावेळी, ‘बाबा रे तुला जे हवं ते घे! सगळं नावावर करतो हवंतर. परंतु कुटुंब मोडू नको रे!’ अशी विनंती केल्यावर सुजय त्यांच्या गळ्यात पडून रडू लागला. कुणाचेही डोळे भरून येतील असा भावाभावांच्या भेटीचा तो अविस्मरणीय क्षण होता. क्षणात सारं वातावरण बदललं. दुरावा संपला होता. परंतु भविष्यात असे काही होऊ नये म्हणून परस्पर समजूतीने प्रॉपर्टी संदर्भात आवश्यक आणि योग्य ते निर्णय घेण्याचे सुचवले.
वरच्या उदाहरणासारख्या नात्या नात्यातल्या दुराव्याच्या अनेक केसेस समोर येत असतात. एक लक्षात घ्यायला हवे की आपण सगळी माणसे आहोत म्हटल्यावर वेगवेगळे स्वभाव, मतमतांतरे तर कधी आयुष्यात समज गैरसमजाचे टप्पेही येणार आहेत.
परंतु माणसाला विवेकाचे आणि व्यक्त होण्याचे वरदान लाभले आहे याचे भान प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे. संवाद ही नात्याची गरज तर आहेच परंतु ती एक सपोर्ट सिस्टीमच आहे.
ज्यावेळी नाते ताणले जाऊ लागते, घुसमट होऊ लागते त्यावेळी संवाद ऑक्सिजनचे काम करतो आणि तो असेल तर नातं सशक्त करतो. ते नात्याच्या जोपासनेला साहाय्यभूत ठरतं.
याउलट केवळ ईर्ष्या, अहंकार, सततची तुलना या गोष्टी गैरसमजाच्या भिंतीला गिलावा करून ती भिंत अधिक पक्की करतात. त्यामुळे नात्याचं ओझं वाटू लागतं. नात्यातील सहजता संपुष्टात येते आणि नातं संपुष्टात येण्याचा वेदनादायी प्रवास सुरू होतो. जसा मोबाईलमधील अनावश्यक डेटा आपण डिलीट करतो तसे विचारांच्याबाबतीत सजगता आवश्यक आहे. आपल्या मनात डोकाउन पहात अनावश्यक विचार भावनांच्या फाईल्स डीलीट करण्याचे कौशल्य आत्मसात करायला हवे.
भक्कम भावनात्मक आधार ही माणसाची मूलभूत गरज आहे आणि त्यासाठी नात्याचं संगोपन आवश्यक आहे. नातं दुरावण्याची शक्यता निर्माण झाली असेल तर शांतपणे विचार करुन आत्मपरिक्षण करत कोणतंही पाऊल उचलण्यापूर्वी Are you sure ? हा प्रश्न स्वत:ला विचारणे गरजेचे आहे हे मात्र नक्की!
अॅड. सुमेधा देसाई