ग्रामीण भागातील शाळांचा दर्जा सुधारणार!
राज्य सरकारचा पुढाकार : शाळांमध्ये मूलभूत सुविधा देण्याचा उद्देश : जि.पं.कार्यकारी अधिकाऱ्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना विविध सूचना
बेळगाव : बेळगाव आणि चिकोडी या शैक्षणिक जिल्ह्यांमधील ग्रामीण भागातील शाळांचा दर्जा शहरातील खासगी शाळांप्रमाणे सुधारावा. यासाठी अधिकाऱ्यांनी आवश्यक उपाययोजना हाती घ्याव्यात अशी सूचना जि. पं.चे कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी केली. येथील जि. पं. कार्यालयामध्ये बेळगाव, चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. ग्रामीण भागातील शाळांमध्ये दर्जात्मक शिक्षण देऊन मूलभूत सुविधा पुरविल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शहराकडे होणारे स्थलांतर रोखता येणे शक्य आहे. यासाठी राज्य सरकारकडून ग्रामीण भागातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा महाविद्यालयांमध्ये सुधारणा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
पटसंख्या वाढविण्यास मदत
दोन्ही शैक्षणिक जिल्ह्यातील निवड झालेल्या शाळांमध्ये मूलभूत सुविधा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी नेमणूक करण्याचा या योजनेचा मूळ उद्देश आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यास मदत होणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील 14, चिकोडी जिल्ह्यातून 16 शाळांची या योजनेअंतर्गत निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या शाळांचा सर्वेक्षण करून तेथील भौगोलिक परिस्थिती, सध्या असलेली शाळेची इमारत, याचा नकाशा तयार करणे, मातीचे परीक्षण करून अहवाल देण्याची सूचना अधिकाऱ्यांना यावेळी करण्यात आली.
निकाल वाढीसाठी उपाययोजना राबवा
2023-24 च्या परीक्षेच्या निकालाच्या आधारावर 2024-25 मध्ये इयत्ता दहावी बारावी निकालाच्या वाढीसाठी उपाययोजना राबविण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली. यावेळी बेळगाव व चिकोडी शाळा शिक्षण खात्याचे उपसंचालक मोहन कुमार हंचाटे, डायटचे डीडीपीआय बी. एम. नलतवाड, जिल्हा योजना उप समन्वय अधिकारी बी. एम. मुल्लानटी, रेवती मठद, एईओ सुजाता बाळेकुंद्री, बीओ अजित मनिकिरी आदी उपस्थित होते.