शहरात वाढतोय अजगराचा वावर!
आठवड्यात दोन अजगर ताब्यात : नागरिकांमध्ये भीती
बेळगाव : शहर परिसरात सापांचा वावर वाढू लागला आहे. विशेषत: दुर्मीळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजगर सापाचा संचार वाढला आहे. केवळ एका आठवड्यात हिंडाल्को परिसरात दोन अजगर सापडले आहेत. त्यामुळे नागरिकांतही भीती निर्माण झाली आहे. स्थानिक सर्पमित्रांनी त्यांना पकडून वनखात्याकडे सुपूर्द केले आहे. मात्र, सापांच्या प्रजातीमध्ये सर्वात मोठा साप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजगराचा वाढता वावर शहरवासियांसाठी चिंताजनक आहे. शहर परिसरात विविध जातींचे 35 हून अधिक साप आढळून आले आहेत. त्यामध्ये नाग, धामण, घोणस, मण्यार, गवत्या, पानसर्प आदींचा समावेश आहे. मात्र, अलीकडे दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या अजगरचा वावर वाढला आहे. हिंडाल्को येथील दाट झाडी असलेल्या परिसरात आठवड्यापूर्वी 15 फूट लांबीचा अजगर सापडला होता. त्यापाठोपाठ गुरुवार दि. 7 रोजी पुन्हा हिंडाल्को परिसरात 9 फूट लांबीचा अजगर सापडला आहे. या दोन्ही सापांना त्यांच्या सुरक्षित अधिवासात सोडण्यात आले आहे. मात्र, शहरात अजगर सापांची संख्या वाढत असल्याचे अधोरेखित होऊ लागले आहे.
शास्त्रीनगर परिसरात 2019 साली नाल्याच्या खोदाई दरम्यान भला मोठा अजगर सापडला होता. त्यानंतर आता पुन्हा हिंडाल्को परिसरात दोन अजगर सापडले आहेत. मात्र, या सापांच्या संवर्धन आणि सुरक्षिततेसाठी समाजाने पुढे येण्याची गरज आहे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हिंडाल्को परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांसाठी हिंडाल्को परिसर सुरक्षित अधिवास ठरू लागला आहे. सापाला भक्ष्य म्हणून या परिसरात ससे, बेडूक, उंदीर, कीटक यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सापांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे हिंडाल्को परिसर सापांसाठी सुरक्षित अधिवास म्हणून पुढे येऊ लागला आहे. या परिसरात गर्द हिरवीगार झाडी आणि बारामाही पाणी असल्याने वन्यप्राण्यांचा वावर वाढू लागला आहे. रानमांजर, रानडुक्कर, मोर, ससा, बेडूक, उंदीर यांसह विविध दुर्मीळ पक्षांचे सातत्याने दर्शन होऊ लागले आहे. त्याबरोबर अलीकडे सापांमध्ये सर्वात मोठा समजला जाणारा अजगरही आढळून येऊ लागला आहे. विषारी साप म्हणून नाग, मण्यार, घोणस, फुरसे, चापड्या तर बिनविषारी साप म्हणून धामण, गवत्या, तस्कर, अजगर, पानसर्प यांसह इतर सापांची ओळख आहे.
गैरसमजुती-अंधश्रद्धेपोटी सापांचा बळी
वन्यप्राणी भक्ष्याच्या शोधार्थ फिरत असतात. हिंडाल्को परिसरात वृक्ष संपदा वाढली आहे. त्यामुळे ससा, बेडूक, मोर आदी पक्षांची संख्या वाढली आहे. यांना भक्ष्य बनविण्यासाठी साप येत असतात. अन्नसाखळीतील साप हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे सापांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. गैर समजुती आणि अंधश्रद्धेपोटी सापांचा विनाकारण बळी जातो.
- प्रा. सदाशिव पाटील (सर्पशाळा ढोलगरवाडी)
वन्यप्राणी आढळल्यास वनखात्याला संपर्क करा
हिंडाल्को परिसरात वृक्ष लागवड अधिक प्रमाणात झाली आहे. सापांसाठी सुरक्षित जागा असल्याने याठिकाणी साप येऊ लागले आहेत. भक्ष्यदेखील उपलब्ध होऊ लागले आहेत. जंगली प्राणी, पक्षी, साप हे आपले दागिने आहेत. त्यांचे संवर्धन करणे प्रत्येकाचे काम आहे. कोणताही वन्यप्राणी आढळून आल्यास तात्काळ वनखात्याला संपर्क करावा.
- विनोद अंगडी (काकती आरएफओ)