गादीचा अपमान जनता सहन करणार नाही
आदिल फरास : राजेश क्षीरसागरांच्या प्रचारार्थ मिरजकर तिकटी येथे सभा
कोल्हापूर :
विरोधक कधीही आपल्या भूमिकेशी प्रामाणिक नव्हते. लोकसभेवेळी त्यांना गरज होती म्हणून गादीचा मान राखला. आणि आताही त्यांचीच गरज म्हणून त्यांनी गादीचा केलेला अपमान आम्ही सहन करणार नाही. आणि हा अपमान ज्यांच्यामुळे झाला ते उत्तर चे उमेदवार राजेश लाटकर यांनाही जनता माफ करणार नाही. तुम्ही नॉट रिचेबल राहिल्यामुळेच आमची अस्मिता असण्राया छत्रपतींचा अपमान झाला, अशी खदखद आदिल फरास यांनी व्यक्त केली.
कोल्हापूर उत्तर चे महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ मिरजकर तिकटी येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदिल फरास बोलत होते. याप्रसंगी सत्यजित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
फरास पुढे म्हणाले, राजेश लाटकर यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीतील अनेक नगरसेवकांचा विरोध होता. लाटकर हे पक्ष टिकवणारे नाहीत तर पक्ष घालवणारे आल्याची टीकाही त्यांच्यावर करण्यात आली होती. पण तरीही सत्तेची आस काही सुटली नाही. म्हणूनच उमेदवारीचा मान छत्रपती घराण्या कडे गेल्याने लाटकर अस्वस्थ झाले आणि त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. लाटकर यांनी माघार न घेतल्यानेच गादीचा अपमान झाला.
पण महायुतीचे राजेश क्षीरसागर यांची लोकप्रियता पाहून लाटकर यांना आता प्रेशर आले आहे. उत्तर मध्ये केलेली विविध विकास कामे, सामान्यांसाठी प्रसंगी रस्त्यावरची लढाई करणारे आणि गरीब गरजूंना दिलेली आरोग्याची सेवा अशा मजबूत मुद्यांवर राजेश क्षीरसागर यांनी प्रचाराची मोट बांधली आहे. रंकाळा सुशोभीकरण यासह अनेक उत्तम कामे राजेश क्षीरसागर यांनी केली आहेत. तरी उत्तर च्या उत्तरोत्तर विकासासाठी राजेश क्षीरसागर यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन आदिल फरास यांनी केले.