‘आणीबाणी लादल्यामुळे जनता होरपळली’
पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’ : देशवासियांना प्रचंड यातना झाल्याचा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या रेडिओ शोच्या 123 व्या भागात देशवासियांना संबोधित करताना आणीबाणीच्या मुद्द्यावर परखडपणे भाष्य केले. तत्कालीन सरकारने लादलेल्या आणीबाणीमुळे जनता होरपळून निघाली असे स्पष्ट करतानाच देशवासियांना या काळात अनेक यातना सहन कराव्या लागल्या असे पंतप्रधान म्हणाले. तत्पूर्वी आपल्या भाषणाच्या प्रारंभी त्यांनी योग दिनाबद्दल सांगितले. 21 जून रोजी देश आणि जगातील कोट्यावधी लोकांनी आंतरराष्ट्रीय योग दिनात भाग घेतला. योगाची भव्यता वाढत आहे, लोक दैनंदिन जीवनात त्याचा अवलंब करत आहेत, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले.
आणीबाणीच्या काळात लोकांवर अत्याचार झाले. अनेकांना क्रूर छळ करण्यात आले. कोणालाही विनाकारण अटक करता येत होती. त्यांच्यावर असे अमानुष अत्याचार केले गेले. शेवटी, जनता जिंकली आणि आणीबाणी उठवली गेली. जनता जिंकली आणि आणीबाणी लादणाऱ्यांना हार सहन करावी लागली, असे पंतप्रधानांनी ‘मन की बात’ या आपल्या मासिक कार्यक्रमादरम्यान स्पष्ट केले.
योग दिनाची महती वाढतेय!
यंदाच्या योग दिनाच्या निमित्ताने विशाखापट्टणममध्ये 3 लाख लोकांनी एकत्र योगसाधना केली. आपल्या नौदलाने जहाजांवर योग केला आणि जम्मूमध्ये लोकांनी जगातील सर्वात उंच पुलावर योग केला. वडनगरमध्ये 2,100 लोकांनी एकत्र भुजंगासन करून विक्रम केला. योगसाधनेच्या या वेगवेगळ्या प्रयोगांमधून या दिवसाची महती वाढत असल्याचे स्पष्टपणे दिसते, असे पंतप्रधान म्हणाले. आम्ही या महिन्यात जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. पर्यावरण संवर्धनासाठी लोक उत्स्फूर्तपणे सहभाग घेत असल्याने त्याचा महिमाही वाढत असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.
भारत ‘ट्रॅकोमा’मुक्त
जागतिक आरोग्य संघटनेने भारत ट्रॅकोमामुक्त घोषित केल्याची माहिती पंतप्रधानांनी रविवारी ‘मन की बात’मधून दिली. हे यश आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे आहे. आज प्रत्येक घराला नळाचे पाणी मिळत असल्यामुळे आजारांचा धोका कमी झाला आहे. ट्रॅकोमा हा डोळ्यांचा एक जिवाणूजन्य संसर्ग असल्यामुळे कायमचे अंधत्व किंवा दृष्टीदोष होऊ शकतो. हा विषाणू क्लॅमिडीया ट्रॅकोमॅटिस या जीवाणूमुळे पसरतो. हा विषाणू संक्रमित व्यक्तीच्या अश्रूंद्वारे, त्याच्या संपर्कातून, थंडी, कपडे, अन्न आणि इतर दूषित वस्तूंद्वारे पसरतो. आता ट्रॅकोमाचा धोका कमी झाल्याने लोकांच्या डोळ्यांचे आजार कमी होतील, असे पंतप्रधान म्हणाले.
95 कोटी लोक सरकारी योजनांचे लाभार्थी
देशातील 95 कोटी लोक कोणत्या ना कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. यासंबंधी आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटनेचा अहवाल आला आहे. देश जनसहभागाने पुढे प्रगती करत आहे. या यशांमुळे नजिकच्या काळात भारत अधिक सक्षम होईल, असे पंतप्रधान म्हणाले.
कैलास हे श्रद्धेचे केंद्र
धार्मिक तीर्थयात्रा ही सेवेची एक महान अनुष्ठान आहे. यात्रेत जाणाऱ्या भाविकांपेक्षा जास्त लोक त्यांच्या सेवेमध्ये गुंतलेले असतात. बऱ्याच काळानंतर कैलास मानसरोवर यात्रा सुरू झाली आहे. हिंदू, बौद्ध आणि जैन समाजाच्या परंपरेत कैलासला श्रद्धेचे केंद्र मानले जाते. देशाच्या अन्य भागातही वेगवेगळे धार्मिक सण साजरे करताना भक्तीभाव ओसंडून वाहत असतो, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले.
मेघालयाच्या एरी सिल्कला जीआय टॅग
मन की बातमध्ये आपण देशातील अनोख्या उत्पादनांबद्दल बोलतो. काही दिवसांपूर्वी मेघालयाच्या एरी सिल्कला जीआय टॅग मिळाला आहे. या सिल्कमध्ये असे अनेक गुण असून ते इतर कापडांपेक्षा वेगळे बनवतात. ते बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रेशीम किड्यांना मारले जात नाही. त्याची खासियत अशी आहे की ते हिवाळ्यात उबदारपणा आणि उन्हाळ्यात थंडपणा देते, असेही पंतप्रधानांनी सांगितले.