आचरापार नदीवरील पुलाचा संरक्षक कठडा बनलाय धोकादायक
कठड्याचा काही भाग कोसळला, दोन्ही बाजूच्या कठड्याला गेलेत तडे
आचरा | प्रतिनिधी
आचरापार नदीवरील मालवण व देवगड तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाचा संरक्षक कठडा धोकादायक बनला आहे. या कठडयाचा काही ठिकाणचा भाग कोसळून पडला आहे. तर काही ठिकाणी संरक्षक कठड्यास भेगा गेल्याने दिसत आहेत. आचरा नदीवरील पुलाच्या या दुरवस्थेमुळे पुलाच्या सुरक्षिततेविषयी नागरिकांच्या मनात शंका निर्माण होत आहे. बांधकाम विभागाने तातडीने या पुलाच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होऊ लागली आहे.
धोकदायक कठड्याकडे बांधकाम विभाग करतय दुर्लक्ष
आचरा-पार नदीवरील पूल हा मालवण व देवगड तालुक्यांना जोडतो. या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक दिवस - रात्र चालू असते. लागतच्या गावातील पादचाऱ्यांची नेहमीच रेलचेल असते, या पुलाच्या दोन्ही बाजूकडील संरक्षक कठड्याला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. काही वर्षापूर्वी या कठड्याचा भाग कोसळला होता. स्थानिक ग्रामस्थांनी बांधकाम विभागाचे लक्ष वेधले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. शेवटी अपघात होऊ नये म्हणून स्थानिक ग्रामस्थांनी लाकडी काठ्या बांधून ठेवल्या आहेत. याच भागाकडून काही अंतरावर पुन्हा संरक्षक कठडा पुन्हा तुटून पडला आहे.
गर्दीच्या वेळी दुर्घटना घडण्याचा धोका
आचरा पार नदीच्या पुलावर रोज पर्यटक व स्थानिक ग्रामस्थ फिरण्यासाठी येतात या कठड्याला टेकून जेष्ठ लहान मुले उभी असतात, या पुलावरून आचरा पारवाडीतून करिवणे भागात शेतकरी गुरांची ने-आणही करतात. गणेश विसर्जनवेळीही मोठी गर्दी या पुलावर असते अशावेळी मोठी दुर्घटना होण्याचा संभव आहे. बांधकामं विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.
फोटो परेश सावंत