दुसऱ्या गेटपासूनच्या संरक्षक भिंतीने घेतला मोकळा श्वास
बेळगाव : जिल्हा प्रशासनाकडून अधिवेशनाची जय्यत तयारी करण्यात येत असून, शहर परिसरात विविध कामे करण्यात येत आहेत. स्वच्छतेसह विविध ठिकाणी रंगरंगोटीही करण्यात येत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या रेल्वे गेटनजीक असलेल्या फुटपाथ रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षक भींतीवरची झाडेझुडपे काढण्यात येत आहेत. मात्र सदर काढण्यात आलेली झाडेझुडपे तशीच फुटपाथवर टाकण्यात आली असून यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागला.
यापूर्वी प्रशासनाकडून या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र अधिवेशनकाळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदारांसह मान्यवरांची मांदियाळी बेळगावमध्ये दाखल होते. यामुळे विविध कामे हाती घेऊन ती लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत आहे. मात्र अशाप्रकारची कामे अधिवेशनकाळापुरते न करता नियमितपणे होणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलण्याची आवश्यकता असून यासाठी उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.
शहर परिसरात स्वच्छता-रंगरंगोटी
गेल्या अनेक दिवसांपासून दुसऱ्या रेल्वे गेटपासून फुटपाथला लागून असलेल्या भिंतीवर झाडेझुडपे उगावली होती. मात्र हे काढण्यासाठी प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत होते. मात्र आगामी बेळगाव अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरात स्वच्छता व रंगरंगोटी करण्यात येत आहे. ठिकठिकाणी रस्ता दुरुस्तीची कामेही होती घेण्यात आली आहेत. दुसऱ्या रेल्वे गेटपासून झाडेझुडपेही काढण्यात येत आहेत मात्र काढल्यानंतर तशीच फुटपाथवर टाकण्यात आल्याचे दिसून आले. स्वच्छतेमुळे संरक्षक भिंतीने मोकळा श्वास घेतल्याचे पहावयास मिळाले.