वाहनांच्या बिलांचा प्रस्ताव आठव्यांदा फेटाळला
राज्यातील वाहनचालक संतप्त : 31 जुलैपर्यंत बिले न दिल्यास मांडवी पुलावर ठाण मांडणार
पणजी : लोकसभा निवडणूक काळात निवडणूक आयोगाने विविध कामांसाठी वापरलेल्या 1 हजार टॅक्सी, बसेस, मिनी बसेस इत्यादी सुमारे 1 हजार वाहनचालकांची बिले अद्याप फेडलेली नाहीत. लेखा खात्याने बुधवारी सुमारे आठव्यांदा बिलांचा प्रस्ताव फेटाळून लावला. राज्यातील टॅक्सीचालक व इतर वाहनचालक या प्रकारामुळे संतप्त झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार सरकारकडे या टॅक्सी व तत्सम सार्वजनिक वाहन चालकांची बिले फेडण्यासाठी पैसे नाहीत. वाहनचालकांची 20 कोटी रुपयांची बिले फेडायची आहेत. सारी बिले गोवा पर्यटन विकास महामंडळाकडे दिली होती.
महामंडळाने वाहनचालकांकडून आलेली सारी बिले लेखा संचालनालयाकडे पाठविली. आतापर्यंत वेगवेगळी कारणे दर्शवून खात्याने ही बिले फेटाळली होती. प्रत्येकवेळी नवे कारण व त्रुटी दाखविल्या जातात. त्यामुळे यावेळी पर्यटन विकास महामंडळाने नव्याने सर्व प्रक्रिया पूर्ण करून बिले अदा केली. मात्र बुधवारी सायंकाळी लेखा संचालनालयाने पुन्हा नव्याने काही तांत्रिक हरकती घेऊन बिले परत पाठविली. गोव्यातील सुमारे 1 हजार वाहने निवडणूक आयोगाने वापरली होती. त्यांचे पैसे देणे हे काम गोवा सरकारचे. आयोगाने पर्यटन विकास महामंडळावर जबाबदारी सोपविली होती. आता महामंडळाच्या हातात काही राहिले नाही व त्यांना पैसे लेखा संचालनालयाकडून मिळणे आवश्यक आहे.
वाहनचालकांसमोर अनंत अडचणी
गोव्यात 7 मे रोजी निवडणुका झाल्या होत्या. टॅक्सीचालकांचा व्यवसाय हा हंगामी स्वरुपाचा असतो. दररोज पेट्रोल डिझेलसाठी पैसे भरावे लागतात. त्यांना कोणी उधारी देत नाही. निवडणुका पार पडून आता अडीच महिने झाले तरी त्यांची बिले फेडली जात नाहीत. यामुळे वाहनचालक अनंत अडचणीना तोंड देत आहेत. सरकारच्या नावे बोट मोडीत आहेत. सर्व वाहनचालक आता 31 जुलै पर्यंत पैसे मिळणार नसतील तर मांडवी पुलावर वाहनांसह ठाण मांडून बसणार आहेत, असे वृत्त आहे. त्यामुळे पणजीत वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. हा प्रश्न गोवा विधानसभेत चर्चेला येऊन गेला. सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्याप झालेली नाही. त्यामुळे टॅक्सी व बस चालक संताप व्यक्त करीत आहेत.