For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘370’ गेल्यामुळेच काश्मीरची प्रगती! श्रीनगर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

07:10 AM Mar 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘370’ गेल्यामुळेच काश्मीरची प्रगती  श्रीनगर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
Advertisement

श्रीनगर येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, प्रदेशाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय

Advertisement

वृत्तसंस्था/श्रीनगर

जम्मू-काश्मीरचा वेगवान विकास घटनेतील अनुच्छेद 370 निष्प्रभ केल्यानेच साध्य झाला आहे, असे स्पष्ट प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते गुरुवारी येथे आयोजित एका विराट जाहीर सभेत भाषण करीत होते. हा अनुच्छेद काश्मीरच्या प्रगतीतील एक मोटा अडथळा होता. आता तो दूर झाल्याने या भागातील पर्यटन आणि इतर व्यवसायांमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. केंद्र सरकार या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून काश्मीरच्या युवकांना आता उन्नतीचे सर्व दरवाजे मोकळे झाले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. घटनेतील अनुच्छेद 370 आणि अनुच्छेद 35 अ यांचा प्रभाव आता नष्ट झाला आहे. केंद्र सरकारने उचललेल्या या पावलामुळे जम्मू आणि काश्मीरला आता मोकळा श्वास घेता येत आहे. या अनुच्छेदांचा विकासावर अत्यंत घातक आणि विपरीत परिणाम झालेला होता. या भागातील जनतेमध्ये सर्व सकारात्मक क्षमता असतानाही त्यांना प्रगतीपासून वंचित रहावे लागत होते. आता सर्व अडचणी दूर झाल्या असून या भागातील युवक त्याच्या महत्वाकांक्षा आणि स्वप्ने पूर्ण होण्याचा आशा धरु शकतो, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.

Advertisement

धार्मिक पर्यटनातही मोठी वाढ

जम्मूमध्ये अनेक इतिहासप्रसिद्ध धर्मस्थळे आहेत. अमरनाथ आणि वैष्णोदेवी यांसारख्या धार्मिक स्थळांना भेटी देणाऱ्या भाविकांची संख्या केल्या चार ते पाच वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. या प्रदेशात भयमुक्त वातावरण निर्माण झाल्याने आज देशातील आणि जगातीलही प्रवाशांना येथे येण्यात कोणताही धोका वाटत नाही. तसेच चिंतामुक्त वातावरणात हे प्रवासी आणि भाविक येथील आनंद घेऊ शकतात. केंद्र सरकारनेही अशा स्थळांचा विकास करण्यासाठी अनेक योजनांवर कामे पूर्ण केली आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.

ध्येय केवळ विकासाचे

जम्मू-काश्मीरमध्ये आणि संपूर्ण भारत देशातच विकासाच्या माध्यमातून समृद्धी आणण्याचे केंद्र सरकारचे ध्येय आहे. त्या दिशेनेच आम्ही गेली 10 वर्षे अखंड कार्य केले आहे. येत्या दोन दशकांमध्ये आम्हाला भारताचे विकसीत राष्ट करायचे आहे. यासाठी भारतातील खेडी आणि दुर्गम भागांचाही विकास होण्याची आवश्यकता आहे. देशाला आर्थिक विकासाच्या मार्गावर वेगाने अग्रेसर करण्यासाठी आम्ही विविध योजनांच्या माध्यमांमधून काम करीत आहोत. जनतेच्या सहकार्याने ही स्वप्ने आम्ही पूर्ण करत आहोत, अशी मांडणी त्यांनी भाषणात केली.

भारत ‘विवाह केंद्र’ बनावे

भारतातील लोक विदेशात जाऊन विवाह समारंभ साजरा करतात. त्यांनी भारतातील स्थान शोधून तेथे विवास सभारंभ साजरा करावा. जम्मू-काश्मीर हे त्यासाठी आदर्श स्थान ठरु शकते. ज्यांना मोठा खर्च करुन विवाह साजरा करणे शक्य आहे, त्यांनी विदेशात जाऊन पैसा खर्च करण्यापेक्षा भारतातच उपलब्ध असलेल्या निसर्गरम्य स्थानी असे कार्यक्रम केल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठाच हातभार लागणार आहे. विदेशातील भारतीय किंवा विदेशातील नागरीकांनीही भारतात आपल्या कुटुंबातील विवाह कार्यक्रम करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

विरोधकांवरही टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्ष आणि त्यांच्या आघाडीवर टीकेचे आसूड ओढले. विरोधकांच्या नकारात्मक वृत्तीमुळे विकासाच्या ध्येयपूर्तीत अडथळा निर्माण होत आहे. विरोधी पक्ष जेव्हा सत्तेवर होते तेव्हा त्यांच्या अत्यंत चुकीच्या आर्थिक धोरणामुळे विकासाचा वेग वाढू शकला नाही. परिणामी भारत स्वातंत्र्यानंतर 77 वर्षे होऊनही विकसीत देश बनला नाही. आता सर्व अडथळे दूर करण्यात आले असून जनता बंधनमुक्त झाली आहे, असे अनेक मुद्दे त्यांनी स्पष्ट केले. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी आणि त्यांना पाहण्यासाठीही श्रीनगर येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. लोकांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादासाठी त्यांनी आनंद व्यक्त केला.

प्रथमच जाहीर सभा

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा घटनेतील अनुच्छेद 370 निष्प्रभ करण्याची कृती केंद्र सरकारने केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगरमध्ये जाहीर सभेत भाषण करण्याची हा प्रथमच प्रसंग होता. प्रशासनानेही त्यांच्या जाहीर सभेच्या स्थानी आणि परिसरात मोठ्या सुरक्षा व्यवस्थेची योजना केली होती.

Advertisement
Tags :

.