For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेकवाड येथील लक्ष्मीदेवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम उत्साहात

10:44 AM Mar 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेकवाड येथील लक्ष्मीदेवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम उत्साहात
Advertisement

वार्ताहर /नंदगड

Advertisement

लक्ष्मीदेवी यात्रेनंतर पुन्हा देवीच्या मूर्ती लक्ष्मीदेवी मंदिरात आणून त्या पूर्वीप्रमाणे जोडल्या जातात व पुन्हा देवींची रीतसर पूजा अर्चा चालते. त्यानुसार शुक्रवारी सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत गावातील सर्व लोकांनी, माहेरवासिनी व पै पाहुण्यांनी देवीच्या ओट्या भरल्या. त्यामुळे मंदिरात भाविकांची विशेषत: महिलांची एकच गर्दी झाली होती. बेकवाड येथे लक्ष्मीदेवीच्या दोन मूर्ती आहेत. एक सिंहावर बसलेली तर दुसरी वाघावर बसलेली आहे. 18 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर येथील लक्ष्मीदेवीचा यात्रोत्सव बुधवार 28 फेब्रुवारी ते बुधवार 6 मार्चपर्यंत झाला. या यात्रोत्सवासाठी देवीच्या दोन्ही मूर्तींना रंगरंगोटी करण्यात आली होती. यात्रेच्या पहिल्या दिवशी विवाह सोहळा पार पाडला. त्यानंतर देवीची गावातून मिरवणूक काढून सायंकाळी गदगेच्या ठिकाणी असलेल्या भव्य शामियान्यात विराजमान करण्यात आल्या. त्या ठिकाणी आठवडाभर यात्रोत्सव झाला. हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. यात्रेच्या शेवटच्या दिवशी दोन्ही मूर्तींना गदगेवरून हलवून मंडपाबाहेर आणण्यात आले. त्यानंतर गदगा परिसरात देवींची भव्य मिरवणूक निघाली. सायंकाळी उशिरा देवींचे सिमेकडे प्रस्थान झाले. धार्मिक विधीनंतर दोन्ही मूर्तींचे भाग वेगवेगळे करून मध्यरात्री लक्ष्मीदेवी मंदिरात आणून ठेवण्यात आली. गुरुवार दि. 7 रोजी रात्री देवींच्या मूर्तीचे भाग परंपरेनुसार एकत्रित करून मूर्ती पुन्हा जोडण्यात आल्या. शुक्रवारी रीतसर पूजा करून मानाप्रमाणे पंचांच्या व मानकऱ्यांच्या ओट्या भरण्यात आल्या.

ओटी भरण्यास महिलांची गर्दी

Advertisement

ओट्या भरण्यासाठी मानकऱ्यांच्या घरापासून वाजतगाजत मंदिरापर्यंत आणण्यात आल्या. यात महिला, मुले, युवक व ज्येष्ठ मंडळी सहभागी झाली होती. चांगली वस्त्रs व अलंकार घालून डोक्यावर मोठ्या ताटात ओटीचे साहित्य घेऊन ओटी भरण्यासाठी महिला दाखल झाल्या होत्या. मंदिरात सर्वजण एकाचवेळी आल्यानंतर गर्दी होत होती. पंचांच्या सूचनेनुसार ओळीने येऊन ओटी भरून देवीचा आशीर्वाद घेण्यात आला. ओटी भरण्याच्या कार्यक्रमामुळे बेकवाड येथील लक्ष्मी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

Advertisement
Tags :

.