झाल्या सुरु मिरवणुका!
सातारा :
गणपती बाप्पांचे आगमन 27 ऑगस्टला होत आहे. शहरात गतवर्षीपासून आगमन मिरवणुकांचे सोहळे सुरु झाले. याही वर्षी आगमन मिरवणुकांच्या सोहळ्यांना रविवारपासून प्रारंभ झाला. बुधवार पेठेतल्या शिवतेज गणेशोत्सव मंडळ आणि मंगळवार पेठेतल्या जय महाराष्ट्र गणेशात्सव मंडळांच्या मिरवणुका डीजेच्या वाद्यात काढण्यात आल्या. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून सातारा शहर वाहतूक शाखा कार्यतत्पर होती. परंतु रविवार सुट्टीचा वार असून खरेदीनिमित्ताने मार्केटमध्ये सायंकाळी गर्दी होती.
गतवर्षीपासून साताऱ्यात गणपती बाप्पांच्या आगमन सोहळ्यांना एक वेगळेच महत्व आले आहे. गतवर्षी याच आगमन सोहळ्यांमुळे गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते विरुद्ध व्यापारी असा संघर्ष चिघळला होता. गणेशोत्सव मंडळांच्या आगमन मिरवणुकांमुळे व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याने व्यापाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना गतवर्षी निवेदन दिले होते. ही बाब समजताच गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी थेट व्यापाऱ्यांच्या विरोधात बहिष्काराचे हत्यार उपसले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी तक्रारीची उपसलेली तलवार म्यान केली होती. पुन्हा आगमन मिरवणुका कशा असाव्यात, काय नियमावली असावी, या दृष्टीने मंडईच्या राजाच्या मंडपात बैठक पार पडली होती. त्यानंतर त्या वादावर पडदा पडला होता, असा गतवर्षीचा इतिहास असताना याही वर्षी आगमन मिरवणूक सोहळ्याचा शुभारंभ रविवारी सायंकाळी झाला. त्यानिमित्ताने डीजे दिवसभर राजवाडा बसस्थानकात उभा होता. लाईटची मशिनही होती. यामुळे दिवसभर एसटी स्थानकात बसेस लावण्याची समस्या झाली होती.

सायंकाळी उशिरा आगमन मिरवणूक सोहळा सुरु झाला. त्यात रविवार हा साताऱ्याचा बाजाराचा दिवस. सातारकर खरेदी निमित्ताने सायंकाळचे बाहेर पडतात. खरेदी केल्यानंतर चौपाटीवर खाद्यपदार्थांवर ताव मारुन ते घरी जातात. परंतु आगमन मिरवणुका निघाल्यामुळे अनेक सातारकरांची त्रेधा झाली होती. राजवाड्याकडे जाणारे व येणारे लोक मिरवणुकांमुळे अन्य मार्गाचा वापर करत होते. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरता शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन म्हेत्रे यांचे पथक काम करत होते. तर सातारा शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी एपीआय अभिजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते. आगमन मिरवणुकांमध्ये बुधवार नाका येथील शिवतेज मंडळाची मिरवणूक राजवाडा, मोती चौक, मारवाडी गल्ली, कमानी हौद अशी काढली. तर जय महाराष्ट्र गणेशोत्सव मंडळ मंगळवार पेठेची मिरवणूक राजवाडा, गोलबागेला वळसा मारुन गोल मारुती मंदिर, समर्थ मंदिर अशी काढली.
- श्रीमंत व्यापारी मंडळाची आगमन मिरवणूक 15 ऑगस्टला
सातारा शहरातील व्यापारी मंडळाचा आगमन सोहळा 15 ऑगस्ट रोजी आयोजित केलेला आहे. आगमन मिरवणुकीत गणपतीच्या मागे भव्यदिव्य नेत्रदीपक सजावट करणार आहे. शिव-पार्वती विवाहाचा 40 कलाकारांचा लाईव्ह शो साकारुन वरात दाखवण्यात येणार आहे. हा सोहळा राजवाडा ते 501 पाटी दरम्यान काढण्यात येणार असून श्रीमंत व्यापारी मंडळा जवळ250 लीड लाईटचा जुना मोटार स्टॅण्ड ते 501 पाटी येथे स्टेज शो आयोजित केला आहे. त्याचबरोबर मिरवणुकीत शिवरुद्राक्ष वाद्य पथक कराड क्रांती मंडळ नाशिक बाजा सातारा, शिंगवाले, आबदारकी, सनई चौघडा, घोड्यांवरुन छत्रपती शिवाजी महाराजांचा जिवंत देखावा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व भाऊसाहेब रंगारी, लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेची मिरवणूक, आतिषबाजी, संस्कार भारतीचा रांगोळी शो, स्मोक, कोल्ड फायर, पेपर ब्लास्ट शो, त्याचबरोबर कार्यकर्ते व महिलांचा पारंपरिक वेशभूषेत सहभाग असणार आहे, अशी माहिती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिली.