कॅम्पमध्ये देवींची मिरवणूक जल्लोषात
मुखवटाधारी राक्षस आकर्षण : भाविकांची अलोट गर्दी
बेळगाव : बेळगावच्या कॅम्प भागामध्ये दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर पारंपरिक पद्धतीने रथोत्सव साजरा केला जातो. कॅम्पमधील प्रमुख देवींची वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. शनिवारी दुपारपासून सुरू झालेली मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. विविध वेशातील सहभागी झालेले राक्षस हे या मिरवणुकीचे आकर्षण ठरले. कॅम्प येथे अनेक देवींची पुरातन मंदिरे आहेत. फिश मार्केट येथील महामाता कुंतीदेवी, बी मद्रास स्ट्रीट येथील दुर्गामुत्तू मरिअम्मा देवी, खानापूर रोड येथील मरिअम्मा देवी, आर. ए. लाईनची कुलकम्मा देवी, तेलगू कॉलनी येथील मरिमाता-दुर्गामाता यांचे संपूर्ण नवरात्रीत विशेष पूजन केले जाते.
दसऱ्यादिवशी पारंपरिक पद्धतीने कॅम्प परिसरात या सर्व देवींची भल्या मोठ्या रथातून मिरवणूक काढली जाते. रथ तयार करण्यासाठी 15 ते 20 दिवस मेहनत घेतली जाते. दसऱ्यादिवशी दुपारी या मिरवणुकीला सुरुवात होते. ढोल-ताशांच्या गजरात सर्व प्रमुख मार्गांवरून देवीची मिरवणूक काढली जाते. फिश मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, पोलीस क्वॉर्टर्स, धर्मवीर संभाजी चौक, सेंट झेवियर्स, कॅटल रोडमार्गे कॅम्प येथे मिरवणुकीची सांगता होते. मिरवणूक पाहण्यासाठी बेळगाव परिसरातील हजारो नागरिक कॅम्प परिसरात दाखल झाले होते. मुखवटाधारी राक्षस हातामध्ये मोठी हत्यारे घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते. या राक्षसांनी पारंपरिक ढोलाच्या तालावर फेर धरत सर्वांचे मनोरंजन केले.