पार्किंगसाठी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू
प्रशासक के.मंजूलक्ष्मी: केशवराव भोसले नाट्यागृह पुनर्बांधणी दुसऱ्या टप्प्यातील कामांचे नियोजन
बहुमजली पार्कींग लवकरच खुले होणार
कावळानाका येथे होणार खासगी बस पार्कींग, शॉपींग सेंटर
कोल्हापूर
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृहातील पहिल्या टप्प्यातील कामे जलद गतीने सुरू आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये नाटयगृहाच्या शेजारी अद्ययावत पार्कीग केले जाणार आहे. त्यासाठीची जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. संबंधित गाळेधारकांना यासंदर्भातील नोटीस बजावली असल्याची माहिती प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
के. मंजूलक्ष्मी म्हणाल्या, केशवराव भोसले नाट्यागृहाच्या पुनर्बांधणीच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाचे नियोजन सुरू केले आहे. यासंदर्भातील आराखडा हेरिटेज कमिटीकडून मंजूर करून घ्यावा लागणार आहे. यामध्ये नाटयगृहालगत पार्कींग नियोजित आहे. या ठिकाणी असणाऱ्या मनपाच्या जागा गाळेधारकांसाठी भाडेतत्वावर दिली आहे. तालीम संघाचाही जागेचा विषय आहे. ही सर्व जागा ताब्यात घेण्याबाबतची प्रक्रिया सुरू केली आहे. चिमा साहेब चौक, माऊली चौक येथील उद्यान विकसित करणार आहे. कावळा नाका येथील खासगी बसच्या पार्कीगचा विषयही लवकरच मार्गी लावला जाईल. सरस्वती टॉकीज येथील बहुमजली पार्कींगचे तीन मजले तयार आहेत. येथील गाळेधारकांचा विषय मार्गी लावून बहुमजली पार्कींग सुरू करून शहरातील पार्कींगचा प्रश्न मार्गी लावला जाईल, असेही के. मंजूलक्ष्मी यांनी सांगितले.
100 कोटींच्या ठेकेदारावर होणार दंडात्मक कारवाई
नगरोत्थानमधील 100 कोटीतील रस्त्यांच्या कामे दर्जदार होत नसल्यावरून ठेकेदाराला नोटीस बजावली आहे. करारानुसार ठेकेदाराला म्हणणे सादर करण्यासाठी 15 दिवसांची मुदत आह. नोटीसला उत्तर आल्यानंतर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे के.मंजूलक्ष्मी यांनी सांगितले.
नवीन 24 टिपरमुळे कचरा उठावाच्या समस्या मार्गी
सध्याचे टिपर जुने असल्याने वारंवार बिघाड होत आहे. चालकांचा बराच कालावधी दुरूस्तीमध्येच जातो. परिणामी कचरा उठावावर परिणाम होत आहे. नव्याने 30 टिपर खेरदी केले आहेत. त्यापैकी 24 टिपर आले असून आज, शुक्रवारपासून कार्यरत होणार आहेत. मोठे टिपर असल्याने उपनगरात वापर होणार असल्याने शहरातील बरीचशी कचऱ्या उठावाची समस्या मार्गी लागेल, असा विश्वास के.मंजूलक्ष्मी यांनी व्यक्त केला. कचरा उठावाच्या व्यवस्थापनासाठी दोन समन्वयक नियुक्त केले असून त्यांच्याकडे टिपर आणि झुम प्रकल्पातील कचऱ्याचे नियोजन दिल्याचेही त्यांनी सांगितले.
पुईखडीतील कचरा प्रक्रियाचे विस्तरीकरण करणार
झुम प्रकल्पावरील ताण कमी होण्यासाठी पुइंखडी येथील प्रकल्पाची क्षमता वाढविण्यासाठी विस्तारीकरण करण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने येथील रस्त्याची कामे सुरू आहेत. झुम प्रकल्पातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम सुरू आहे. ^बॉयोगॅस, बायोमायनिंग, खत निर्मिती प्रकल्पाचा यामध्ये समावेश आहे. कचरा उठावासाठी 8 ट्रॅक्टरची खरेदी केली आहेत.
मनपाच्या मिळकती विकसित करण्यावरही भर
कोंबडी बाजार, महाराणा प्रताप चौक येथील जागा विकसित करून उत्पन्न वाढीचा प्रयत्न आहे. हॉकी स्टेडियम समोरील इमारत, टेंबलाईवाडी येथील इमारत लवकरच वापरात आणली जाईल. ड्रीमवर्ल्ड येथील जागेच्या आराखडा करण्यासाठी संबंधितांची नियुक्ती केली आहे. या सर्व कामांना गती देण्यावर भर असेल.