For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कायद्याची अंमलबजावणी न होणे हीच समस्या

06:43 AM Aug 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
कायद्याची अंमलबजावणी न होणे हीच समस्या
Advertisement

वायनाड भूस्खलनप्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी

Advertisement

वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम

केरळच्या वायनाडमध्ये 30 जुलै रोजी झालेल्या भूस्खलनात 400 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. केरळ उच्च न्यायालयाने या घटनेची दखल घेतली आहे. न्यायाधीश जयशंकरन नांबियार आणि व्ही.एम. श्यामकुमार यांच्या खंडपीठाने शुक्रवारी यावर सुनावणी केली. पर्यावरणाचे ऑडिट करण्यात आले असेल तर आम्हाला याचा अहवाल हवा. आमच्याकडे अनेक कायदे आहेत, परंतु त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसून येत नसल्याचे खंडपीठाने म्हटले आहे. याप्रकरणी आता पुढील सुनावणी दर शुक्रवारी होणार आहे.

Advertisement

भूस्खलनाच्या घटनेनंतर अद्याप 138 हून अधिक जण बेपत्ता आहेत. 10 दिवसांपासून सुरू असलेल्या बचावकार्यात सैन्याच्या पथकाने ढिगाऱ्यांखालून अनेक लोकांना जिवंत बाहेर काढले आहे.

केरळमध्ये अनेक संवेदनशील क्षेत्रे

केरळ उच्च न्यायालयाने गुरुवारी  अवैध खाणकमा आणि पूर यासारख्या गोष्टी रोखण्यासाठी कायदेशीर स्वरुपात काय केले जाऊ शकते याचा विचार सरकारने करावा असे म्हटले होते. केरळमध्ये काही क्षेत्रं पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहेत. यामुळे तेथे शाश्वत विकासशक्य आहे यावर पुन्हा विचार करण्याची गरज आहे. विकासकामे आवश्यक असतील तर या प्रकरणांमध्ये वर्तमान नियम बदलून पर्यावरणाचे रक्षण होऊ शकेल असे नियम लागू करण्यात यावेत असे खंडपीठाने म्हटले होते.

पंतप्रधानांचा उद्या दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी भूस्खलन पीडितांची भेट घेण्यासाठी वायनाड येथे पोहोचणार आहेत. पंतप्रधानांचे विशेष विमान कन्नूरमध्ये उतरणार आहे. कन्नूरहून ते हेलिकॉप्टरमधून भूस्खलनग्रस्त भागांची हवाईपाहणी करणार आहेत. यानंतर ते मदतशिबिरांमध्ये जात पीडितांची भेट घेणार आहेत. या शिबिरांमध्ये 10 हजारांहून अधिक लोकांना आश्रय घेतला आहे.

15 कोटीची मदत स्वीकारा

दिल्लीतील तुरुंगात कैद सुकेश चंद्रशेखरने केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना पत्र लिहून 15 कोटी रुपयांची रक्कम मुख्यमंत्री आपत्ती मदत निधीमध्ये स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. आपत्तीग्रस्तांसाठी 300 घरे निर्माण करणार असल्याचेही त्याने म्हटले आहे.

केरळ सरकारकडून कृतिदल

केरळ सरकारने वायनाड भूस्खलन पीडितांचे झालेले नुकसान पाहता विम्याच्या दाव्याकरता मदत करण्यासाठी कृतिदल स्थापन केले आहे. हे कृतिदल वाहन विमा, जीवन विमा, गृह विमा आणि पीक विमा तसेच पाळीव प्राणी अन् गुरांच्या विम्याविषयी तपशील जमविणार आहे.

5 वर्षांपूर्वी झाले होते भूस्खलन

वायनाडमध्ये मुंडक्कई, चूरलमाला, अट्टामाला आणि नूलपुझा या चार गावांमध्ये यंदा भूस्खलन झाले आहे. 5 वर्षांपूर्वीही 2019 मध्ये देखील अतिवृष्टीमुळे याच गावांमध्ये भूस्खलन झाले होते, ज्यात 17 जणांना जीव गमवावा लागला होता. तर 5 जणांचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यावेळी 52 घरे जमीनदोस्त झाली होती.

Advertisement
Tags :

.