कापसेला पळून जाण्यास मदत करणारे जेरबंद
सातारा :
अंधारी येथील संजय शेलार खून प्रकरणात मुख्य संशयित अरुण कापसे याला पळून जाण्यास व आश्रय देण्यास मदत केल्याप्रकरणी दोघांना मिरज (ता. सांगली) येथून अटक करण्यात आली आहे. अजिंक्य विजय गवळी (वय 36), प्रशांत मधुकर शिंत्रे (वय 32) अशी त्यांची नावे आहेत.
संजय शेलार यांच्या खूनाची सुपारी अरुण कापसेने दिली. याची कबुली रामचंद्र दुबुले याने मेढा कोर्टात दिली. त्यानंतर अरुण कापसे हा फरार झाला होता. त्याने पोलिसांना लोकेशन सापडू नये म्हणून मोबाईल फोन घरातच ठेवला होता. त्याला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, मेढा व वाई पोलिसांचे विशेष तपास पथक तयार करण्यात आले. या पथकातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, अमोल गवळी, पोलीस उपनिरीक्षक पांगारे, शिंगाडे, सुधीर वाळुंज, तसेच पोलीस अंमलदार हे कापसे यांची गोपनिय माहिती घेत होते. यावेळी कापसेला अजिंक्य गवळी याने पळून जाण्यास व प्रशांत शिंत्रे याने मिरज येथे लपून राहण्यास आश्रय दिल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकानी या दोघांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कापसेची माहिती मिळवण्यासाठी कसून तपासणी केली. यावेळी त्याला पळून जाण्यास व मिरज येथे आश्रय दिल्याचे त्यांनी कबुल केले. त्यानंतर पोलिसांनी कापसेला मध्यरात्री फ्लॅटमधून जेरबंद केले. आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांना पाच जणांना जेरबंद करण्यात यश आले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे करत आहेत.